Monday 11 June 2018

एक उनाड संध्याकाळ



एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या"

मग काय? ऍडजस्ट करणे भागच होते. मी विचार केला, कामावरूनच तासभर उशिरा निघू. पण मग आठवले. कामावर थांबलो तर भेटणाऱ्या प्रत्येकाला उशिरापर्यंत थांबण्याचे कारण समजावून सांगताना नाकी नऊ येणार. तसंच घरी जाताना ट्रेनला गर्दीही वाढत जाणार होती. ट्रेनला होणाऱ्या गर्दीचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. म्हणून मी ऑफिसमधून सुटल्याबरोबर माझी नेहमीची गाडी पकडली.

गाडीत बसल्या बसल्या मी हा तास दीडतासाचा वेळ कसा काढायचा याचा विचार करू लागलो. तीनचार तास काढायचे असते तर नाटक सिनेमा वगैरेचा तरी बेत केला असता. पण मला दीडदोन तासच काढायचे होते. बाकीचा वेळ उगाच फुकट गेला असता. बरं दुसऱ्या दिवशी लवकर उठून परत कामावर जायचे होते. त्यामुळे मी तो विचार रहित केला. बाजारात खरेदी वगैरे काही करायची नसल्याने तसाही वेळ काढणे शक्य नव्हते. बरं विंडो शॉपिंग करण्यात मला काही रस नसतो. ज्या गावी जायचे नाही त्या गावचा रस्ता का पहा? देवळात, बागेत वेळ काढायचा म्हटले तरी तिथे एकट्याने जाण्यात काही मजा नव्हती. आणि तसंही म्हटलं तर कल्याणमध्ये देवळं आणि बागांची वानवाच आहे. संसारी माणसाला मित्रमंडळीही अशीही कमीच असतात. आणि आता नेमके ती घरी भेटण्याची शक्यताही नव्हती. वेळ कसा काढायचा हा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलं. पण निर्णय काही होईना.

आणि पहाता पहाता कल्याण स्टेशन आलेसुद्धा. मी प्लॅटफॉर्मवर उतरलो. काहीच ठरलेले नसल्याने मला समजेना की मी डावीकडे जाऊ की उजवीकडे? मी गोंधळलेलो असताना समोरच माझा नेहमीचा घरी जाणारा पूल दिसला. माझे पाय आपोआप तिकडे वळले. मी पूलाच्या पायऱ्या चढू लागलो. आता मला वेळच काढायचा असल्याने एक एक पायरी शक्य तितका सावकाश चढत होतो. पण पायऱ्या त्या असून किती असणार? संपल्या लवकर. मी पूलावर आलो. पूलाचं एक टोक माझ्या घराच्या दिशेने जात होते. तिथून माझे घर मला खुणावत होते. पण मी मोठ्या अनिच्छेनेच दुसऱ्या टोकाच्या दिशेला वळलो. मी शक्य होईल तितके सावकाश पावलं टाकत चालत होतो. पूल जिथे संपतो त्या टोकाला मी जाऊन उभा राहिलो. खाली वाकून पाहिले तर तिथून बाजाराची सुरवात होताना दिसत होती.

मनात म्हटलं, चला! बाजारात चक्कर मारून वेळ काढू. पुन्हा मी शक्य तितके सावकाश पायऱ्या मोजत मोजत खाली उतरलो. बाजार चांगलाच फुललेला होता. रस्त्याकडेला भाजी, फळे विकणारे ओरडून ओरडून माल विकत होते. गिऱ्हाईकांशी हमरीतुमरीवर येऊन मालाचा सौदा करत होते. दुकानांच्या बाहेर माल लटकवलेला होता. त्यांच्या शोकेस नवीन मालांनी सजवलेल्या होत्या. रिक्षा, बस, मोटारगाड्या गर्दीतून हॉर्न वाजवत वाट काढत होत्या. सर्वत्र गडबड गोंधळ चालू होता. आणि मी शक्य तितक्या सावकाश पाय उचलत बाजारात चालत होतो. जो कोणी आडवा येईल, त्याला मोठ्या अदबीने आणि औंदार्याने प्रथम जायला वाट करून देत होतो. निरपेक्ष वृत्तीने दुकानांच्या शोकेसकडे पहात होतो. बाजाराला शक्य तितका मोठ्ठा वळसा घालून पुन्हा स्टेशनच्या पूलाजवळ येऊन पोहोचलो. हातातल्या घड्याळाकडे पाहिले. अरेरे!! मुश्किलीने फक्त अर्धा तास उलटला होता.

म्हटलं, इकडेतिकडे विनाकारण हिंडत बसायला नको. सरळ घरीच जाऊया. सावकाश जाऊ म्हणजे वेळ निघेल. मी पुन्हा पूल चढून वर आलो. आणि घराच्या दिशेने निघालो. पूलावरून रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीचे डब्बे मोजले. उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाचे बारकाईने निरीक्षण केले. यार्डातल्या तीस चाळीस लाईनी मोजून घेतल्या. चांगला वेळ गेला. आता घरच्या रस्त्याला लागलो. दुतर्फा फेरीवाले आपला माल लावून बसले होते. त्यांच्या मालाचे निरीक्षण करत चालू लागलो. कोण काय विकत घेतंय ते पाहू लागलो. दुकानात असलेल्या गिऱ्हाईकांकडे पाहून घेतले. पुन्हा बरा वेळ गेला.

असं करत करत आमच्या बिल्डिंगजवळ येऊन पोहोचलो. बिल्डिंगमध्ये शिरतेवेळी आमचे शेजारी नेमके भेटले. त्यांच्याशी हवापाण्याच्या गोष्टी बोलता बोलता घराच्या दरवाजापाशी पोहोचलो आणि थबकलोच. दरवाजात दहा बारा चपलांचा ढीग पडलेला होता. बंद दरवाजातून बायकांचा जोरजोरात हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. आणि मला आठवले. मिसेस म्हणाली होती, बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या. पण मी शेजाऱ्याशी बोलण्याच्या नादात कधी घरी पोहोचलो होतो ते मला समजलेच नाही. याचा अर्थ सहा वाजून गेले तरी पार्टी अजून संपली नव्हती.

मी उलट्या पावली जिने उतरून बिल्डिंगच्या बाहेर पडलो. मला पुन्हा प्रश्न पडला. आता काय करावे? कुठे जावे? मी वाट फुटेल तिथे रस्त्याने चालत राहिलो. अशीच दहा पंधरा मिनिटे चाललो असेन आणि माझा मोबाईल वाजला. मिसेस बोलत होती. "अहो, कुठे आहात? या घरी, सर्व मैत्रीण गेल्यात." मला किती आनंद झाला म्हणून सांगू! मी परत फिरलो. आणि झपझप चालत घरी गेलो. अक्षरशः उडतच गेलो म्हणाना! हा! हा!! हा!!

Wednesday 9 May 2018

वाचक ते लेखक (माझा साहित्यिक प्रवास)


मी सभासद असलेल्या मायबोली ह्या संकेतस्थळावर आज रोजी माझ्या अक्षय नावाच्या मित्राने 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर सर्वाना एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे.

विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

माझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे. माझ्या लिखाणाचे पुष्कळसे श्रेय मी माझ्या वाचनाला देतो. आपलं वाचन समृद्ध असलं की आपल्याला लेखन करणं सोपं जातं. आपल्या लिखाणाची भाषा समृद्ध होत जाते. आपल्या वाचनाचे प्रतिबिंब नेहमीच आपल्या लिखाणात उमटत असते. अवांतर वाचनानेच आपल्या लिखाणाचा प्रवाह, त्याचे व्याकरण कसे असावे याचे आपल्याला ज्ञान होत जाते. आणि म्हणूनच इथे माबोवर बरेच जण नवलेखकांना सल्ला देत असतात, की ' आपलं वाचन वाढवा', 'आपले वाचन वाढवण्याची गरज आहे'  ते त्याकरिताच.

मला वाचनाचं वेड कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण अवांतर वाचनाला सुरवात केली तेव्हा मी चौथी पाचवीत वगैरे असेन. मी मराठी माध्यमातून शिकलोय. माझ्या अवांतर वाचनाला हातभार लावला तो आमच्या शाळेतल्या लायब्ररीयन बाईंनी. त्या बाईंचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. इतर विद्यार्थ्यांना त्या बाई आपल्या टेबलावर परत आलेलीच पुस्तकेच इतरांना देत. पण माझे वाचनाचे वेड पाहून त्या मला खास उशिरा बोलवत. मी उशिरा गेलो की मग त्या मी सांगेल ते कपाट उघडून मला पुस्तकं चाळू देत. आणि मला आवडेल ते पुस्तक माझ्या नावावर मला देत. इतरांना सात दिवसातून एक पुस्तक मिळे तर त्या मला रोज एक पुस्तक वाचायला देत. ५ वी ते १० पर्यंत आमच्या शाळेतल्या लायब्ररीमधील वीसेक कपाटातली एकूणएक पुस्तकं माझी वाचून झाली होती. अगदी भा. रा. भागवत, रत्नाकर मतकरी यांच्या बालसाहित्यापासून ते गदिमा, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथासंग्रहापर्यंत लहानथोर लेखकांची सर्व पुस्तके मी वाचून काढली होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मी एका कपाटावर एकावर एक रचून ठेवलेली यजुर्वेद, सामवेद आणि भगवद्गीता यांची पाच सहा किलो वजनाची गलेलठ्ठ पुस्तकं वाचायला मागितली. त्या लायब्ररीयन बाईंनी मला कोपरापासून हात जोडले. "बाळा रे! हे सर्व वाचण्याचं तुझं आता वय नाहीये". त्यावेळी उठता, बसता, जेवता माझ्या हातात गोष्टींचं पुस्तक असे. माझे वडील माझ्यावर चिडत. "अरे! जरा जेवणाकडे लक्ष दे, नाहीतर नाकात घास जाईल". रस्त्याने चालतानाही माझं लक्ष खाली असे. आणि कुठलाही छापील कागद दिसला की मी तो बिनदिक्कत उचलून वाचत असे. कधीतरी वाचायला काही नसलं तर वाचलेलंच पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचे. अशी त्याच त्याच पुस्तकांची कितीतरी पारायणं मी तेव्हा केली होती. माझी आत्या एका म्युनिसिपल शाळेत शिक्षिका होती. मे महिन्याच्या सुट्टीत आमची शाळा बंद असल्याने मला वाचायला काही नसे, तेव्हा ती आत्या तिच्या शाळेच्या लायब्ररीतील पुस्तकांची थप्पीच्या थप्पी मला वाचायला घरी आणून देत असे.

शाळा संपली. पुढे शिक्षण पूर्ण केलं. नोकरीला लागलो. लग्न झालं. त्याकाळात दादर सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद झालो होतो. रोज दोन पुस्तकांचा वाचून फडशा पाडायचो. जवळ स्कुटर होती. पुटूपुटू जाऊन पुस्तकं बदलून आणायचो. पुढे कल्याणला आलो. २९ व्या वर्षी मूल झालं. आणि सगळा घोटाळा झाला. संसार, नोकरी, आणि मूल यांच्यात पूर्ण गुरफटलो गेलो. लायब्ररीत जाणेयेणे होत नसे. माझं अवांतर वाचन पूर्णपणे ठप्प झालं. पण एक मात्र झालं. रोज ट्रेनने येऊन जाऊन दोन तासाचा प्रवास सत्कारणी लावला. तेव्हा प्रवासात मी रोज दोनेक तरी वर्तमानपत्र वाचत असे. त्याबरोबर येणाऱ्या पुरवण्या मी आधाश्यासारखा वाचून माझी अवांतर वाचनाची भूक शमवे.

अशातच काही वर्षांपूर्वी मोबाईलचे आगमन झाले. मोबाईलवर सर्फिंग करता करता मला मायबोली संकेतस्थळाचा शोध लागला. माबोचा सभासद होण्यापूर्वी मी दोन वर्षे फक्त माबोचा वाचनमात्र होतो. माबोवरसुद्धा पुष्कळ वाचन केले. वाचता वाचता मला असे वाटू लागले की आपणही आपल्या आवडलेल्या लेख, कथांना प्रतिसाद द्यावा. आपलेही मत नोंदवावे. म्हणून मी मायबोलीचा रीतसर सभासद झालो. आवडलेल्या लेख, कथा, कवितांना प्रतिसाद देऊ लागलो. सुरवातीला मी एका ओळीचा प्रतिसाद लिही. 'आवडले, छान लिहिलंय, झकास आहे, वगैरे'. मग हळूहळू माझी भीड चेपली. मी चारपाच ओळीत माझे मत मांडू लागलो.

मी माबोचा सभासद होऊन चार एक महिने झाले होते. दीडवर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१६ साली तो दिवस नव्हे रात्र उजाडली, जेव्हा माझ्यासारख्या वाचकाचे एका नवलेखकात रूपांतर झाले. एका सुरवंटाने कात टाकली. त्याचे एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झाले आणि माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला. त्या रात्री माबोवर मी एक धागा वाचत होतो. त्यामध्ये रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील रामायण मालिकेचा उल्लेख होता. आमच्या लहानपणी दूरदर्शनवर ही मालिका फारच प्रसिद्ध झाली होती. त्यासंबंधीच्या माझ्याही काही आठवणी उचंबळून येऊ लागल्या. मी प्रतिसादात दोनचार आठवणी सलग लिहून काढल्या. पण पाहतो तर प्रतिसाद चांगलाच मोठा झालेला. एक प्रकारे लेखच झाला होता. मग माझ्या मनात आले, हे सर्व आपण प्रतिसादात न लिहिता त्याचा नवा धागाच का काढू नये?

पण माझी नवा धागा काढायची हिम्मत काही होईना. माझ्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. प्रतिसादात काही लिहिणे वेगळे आणि स्वतंत्र लेखन करणे वेगळे. लेख सर्वच जण वाचणार. लोकं काय म्हणतील? लोकं माझ्या लिहिण्यावर बरेवाईट टीका करणार. कोणी वाद घालणार. कोणी माझ्या मागे हसणार. टिंगल करणार. मग मला शरमेने मेल्याहून मेल्यासारखे होणार. माझ्या मनावर भयंकर ताण येऊ लागला. तरीही मी स्वतःला धीर दिला. जे व्हायचे ते होऊन जाऊ दे. मी नवा धागा काढणारच. मग मी त्या प्रतिसादात थोडाफार बदल करून त्याचा मध्यरात्री १ वाजता एक स्वतंत्र धागा काढला. आणि त्याला नाव दिले 'दूरदर्शनवरील रामायण मालिकेची एक आठवण'

पुढचे दोन दिवस माझे कठीण गेले. मी गुपचूप माझा तो लेख उघडून बघायचो, की काही प्रतिसाद आलाय का? आणि माझ्याकरिता आनंदाची गोष्ट होती, की सर्व प्रतिसाद सकारात्मक आले होते. काहींनी माझ्या लिखाणाचे कौतुकही केले होते. ते पाहून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. मग कालांतराने मी छोटे छोटे लेख, कथा लिहून माबोवर प्रसिद्ध करू लागलो. ते वाचून त्यावर काही नकारात्मक प्रतिसादही येत होते. पण तोपर्यंत माझीही भीड चेपली होती. तशा प्रतिसादांनाही तोंड द्यायला मी शिकलो होतो. माझे लिखाण बऱ्याच जणांना आवडू लागले होते. काही लोकं व्यक्तिशः भेटल्यावर माझे अभिनंदन करू लागले. मी विविध मराठी संकेतस्थळावरही लिहू लागलो. माझा स्वतंत्र ब्लॉग तयार केला. व्हाट्सएप, फेसबुकद्वारे माझे लेख, कथा मी विविध वाचकांपर्यंत पोहोचवू लागलो.

मला निव्वळ वाचक या भूमिकेतून लेखकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचवण्यामध्ये मायबोलीवरील लेखक आणि वाचकांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. मायबोलीवरील 'आपला कट्टा' भाग १ या धाग्यावरील अक्षय, मेघा, च्रप्स, सायुरी, पंडित, अंबज्ञ आणि धागामालक र।हूल यांनी वेळोवेळी माझ्या लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहनाचा मी शतशः ऋणी राहीन. अक्षय यांचे मी पुन्हा आभार मानतो की त्यांनी मला हा निबंध लिहिण्यास प्रवृत्त केले. तसेच फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माझ्या मित्रमैत्रिणींचेही मी आभार मानतो, की ते माझे मोडके तोडके लेख, कथा गोड मानून मला लिखाण करायला नेहमीच प्रोत्साहित करीत असतात. धन्यवाद.


Sunday 14 January 2018

माझी झुंज (घरात शिरलेल्या पशु, पक्षी आणि कीटकांबरोबरची)



आपले घर हे काही फक्त आपले नसते. आपल्या घरात पुष्कळसे लहान प्राणी, कीटक आपल्याबरोबर सुखाने नांदत असतात. पण ते आपल्या नजरेआड गुपचूप रहात असतात. कधीतरी अचानक आपल्याला त्यांचे दर्शन होते. आणि आपली घाबरगुंडी उडते. कधी कधी बाहेरून वाट चुकलेले पशु पक्षी आपल्या घरात शिरू पहातात. मग सुरू होते आपली झुंज, त्यांना घराबाहेर हाकलण्याची, नाहीतर त्यांना धारातीर्थी पाडण्याची. पशु, पक्षी आणि कीटक यांच्याशी माझ्या घरात दिलेल्या अशाच काही झुंजींची कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे.

१. खारुताई.
आमच्या सोसायटीत बदामाची पुष्कळ झाडे आहेत. त्यामुळे बदाम खायला त्या झाडांवर पुष्कळ पोपट आणि खारूताई रहातात. सगळ्यांच्या गॅलरीला ग्रील असल्याने खारुताई खालून वर सातव्या मजल्यापर्यंत ग्रीलला पकडून धावत असतात. आपण गॅलरीत उभे राहिले की बऱ्याचदा आपल्या ग्रीलवर खारुताई खेळताना दिसते. ती सहसा घरात शिरत नाही. पण एकदा एक खारुताई आमच्या घरात शिरली होती. कपाटाच्यामागे जाऊन लपली होती. ती आम्हाला आणि आम्ही तिला घाबरून ह्या खोलीतून त्या खोलीत उड्या मारत होतो. मोठ्या मुश्किलीने मी तिला घराबाहेर हुसकावू शकलो. एकदा तर आमच्या घराचा मेनडोअर उघडल्याबरोबर डोअर आणि ग्रीलच्या मधोमध एक खारुताई बसलेली दिसली होती. पट्कन डोअर लावून घेतला. पण आमची पंचाईत झाली ना! घराबाहेर जायचं कसं? दरवाजा उघडल्याबरोबर घरात शिरली तर! चांगलं तासभर घरात अडकलो होतो. आणि खारुताईसुद्धा जाईना. दरवाजात मध्येच खुडखुड आवाज यायचा. मग काय केलं!!? यूपीवाल्या शेजाऱ्याला मोबाईल करून सांगितलं. "हमारे दरवाजेके पासमें जल्दी आव. वो हमारे दरवाजेके ग्रीलमें खारुताई बैठेला है, उसको जरा हाकलताय क्या?" पुढची पंधरा मिनिटे तर खारुताई म्हणजे काय हेच त्याला समजावण्यात गेली. "ओ झाडपे रहताय ना उंदीरके माफिक, ओईच बैठेलाय!" त्याचे थोर उपकार की त्याने येऊन आमची खारुताईच्या तावडीतून सुटका केली.

२. कबुतर.
आजकाल कबुतरांची संख्या फार वाढलीय. आमच्या सोसायटीतसुद्धा पुष्कळ कबुतरं झालीत. बिल्डिंगवर अडचणीच्या उंच जागी त्यांनी वस्ती केलीय. तर एका कबुतराशी मी कशी झुंज दिली त्याचा एक किस्सा सांगतो.
आमच्या मजल्यावरचा एक फ्लॅट बरेच दिवस बंद होता. त्या फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीची काच तुटलेली असल्याने कबुतरांनी त्या रिकाम्या घरात बस्तान ठोकले होते. एकदा एके सकाळी त्या फ्लॅटच्या घरमालकाने घराची हालहवाल पहाण्याकरिता मेनडोअर उघडले. त्याबरोबर एक कबुतर खिडकीतून बाहेर उडून न जाता, घाबरून उलटे मेनडोअरमधून घरमालकाच्या डोक्यावरून जिन्यामध्ये शिरले. घरमालकाने कबुतराच्या फडफडीने बावचळून घराच्या आत जाऊन पट्कन मेनडोअर बंद करून घेतला. झालं! कबुतर आता जिन्यात अडकलं. प्रत्येक मजल्यावरचे ओपनिंग सिमेंटच्या जाळीने बंद होते. तर वरच्या गच्चीचा दरवाजाही कुलूपबंद होता. कबुतर फडफडत वरच्या मजल्यावर जायचे. कोणाच्या तरी दरवाज्यावर बसून रहायचे. तिथून कोणी हाकलले तर फडफडत खालच्या मजल्यावर यायचे. लोकांची घाबरून ही पळापळ! कबुतराला बाहेर पडायचा रस्ता काही दिसेना. बिचारे फार घाबरून गेले होते.

संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आलो तर मला कबुतराचा दिवसभराचा धुमाकूळ माहीत पडला. माझी काही कबुतरला पकडायची डेअरिंग होईना. पण कबुतराला बिल्डिंग बाहेर काढणे तर आवश्यक होते. मग मला एक युक्ती सुचली. मी सौ.ना आमच्या घराचा मेनडोअर उघडून ठेवायला सांगितला आणि त्या कबुतरला काठीने हुश्श हुश्श करत आमच्या मजल्यावर आणत अलगद आमच्या घरात ढकलले. कबुतर आमच्या घरात शिरले आणि समोरच उघड्या दिसलेल्या गॅलरीच्या दरवाजातून मस्तपैकी बाहेर उडून गेले. अशातर्हेने माझे 'कबुतर भगाओ' मिशन सक्सेसफुल झाले. 

३. झुरळ.
असं म्हणतात की ह्या पृथ्वीतलावर मनुष्यजन्माआधीपासून झुरळं अस्तित्वात आहेत. सगळे टक्के टोणपे खाऊन झुरळं तग धरून जगताहेत. कुठल्याही विपरीत परिस्थितीत जीवंत राहण्याकरिता त्यांनी आपल्या प्रत्येक पुढच्या पिढीच्या जीन्समध्ये बदल करत आणलेला आहे. पण ह्या गोष्टीचे मानवाला काही कौतुक नाही. कारण सगळ्या मानवजातीला ह्या झुरळांनी अगदी नको नकोसं केलंय. जबरदस्ती त्यांनी आपल्या घरात घुसखोरी केलीय. आपल्या किचनचा, बेडरूमचा, अहो झालंच तर आपल्या टॉयलेट, बाथरूमचाही ते हक्काने वापर करतात. आता आपण टॉयलेटमध्ये अवघढलेल्या स्थितीत असतानाच त्यांना तिथे दबक्या पावलांनी फिरायला येण्याची हुक्की का येते, हे तर माझ्या समजण्यापलीकडचे आहे. नाहीतर आपण सोफ्यावर आराम फर्मावत असतानाच विमानासारखं उडत येऊन आपल्या अंगावर ठोकर मारण्यात काय मजा आहे हे त्यांचे तेच जाणोत. सुपच्या बाउलमध्ये बॅकस्ट्रोक मारत स्विमिंग करणं हा तर छोट्या झुरळांचा आवडता कार्यक्रम. जसं काय पुढच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनाच स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. आपण घरात चालताना आपल्या पायाखाली टचकन एखादं झुरळ चिरडलं गेलं तर अशी काही शिसारी येते ना! काय सांगू तुम्हाला!? मला तर त्यांचा एपीअरन्संच फार किळसवाणा वाटतो. जरा काही सुंदरता नाही त्यांच्यात. मी म्हणतो, झुरळं फुलपाखरांसारखी सुंदर असायला काय हरकत होती. मग आपणही हौसेने आसरा दिला असता की त्यांना!! पण कसचं काय!

तर ऐका माझी झुरळांशी दिलेल्या झुंजीची कहाणी. आमच्याही घरात नेहमी झुरळं व्हायची. जीव अगदी नको नकोसा करून सोडला होता त्यांनी. त्यांना हाकलण्याचे गेल्या पंचवीस वर्षांत नाही नाही ते उपाय करून झाले. पैशापरीस पैसा गेला पण उपयोग शून्य. मग अचानक दोन वर्षांपूर्वी टीव्हीवर एक ऍड पाहिली. तीच ती! एक कोक्रोच दुसरेको खा जाता है. 'HIT' चं इंजेक्शन वाली! विचार केला, चला आता हेही करून पाहू. आणलं बाजारातून. प्रॉडक्ट् जरा महाग वाटलं. पण घेतलं. करणार काय? मग एका रात्री निजानीज झाल्यावर फक्त एक एक थेंब किचनचा ओटा आणि जिथे जिथे झुरळांचा त्रास आहे तिथे तिथे टाकला. आणि काय आश्चर्यम!!! दुसऱ्याच दिवसापासून झुरळं टपाटप मरायला चालू झाली. मरणाऱ्या झुरळांची संख्या एव्हढी झाली, की झाडूने कचरा गोळा केल्यासारखी सुपड्यावर गोळा करावी लागत होती. एक झुरळ दुसऱ्याला खाऊन मरत होता की नाही, ते माहीत नाही. मला तर काही तसं दिसलं नाही म्हणा. पण मेलेली झुरळं अक्षरशः ड्राय झालेली दिसली. एकदम कुरकुरीत! फुंक मारली तर उडतील अशी. बस्! त्या दिवसापासून गेली दोन वर्षे आमच्या घरात झुरळ नावालाही उरलं नाही. अगदी माळ्यावरची जुनी पेटी जरी काढली किंवा किचनचा ओटा, मांडणी, फर्निचरमध्येसुद्धा एकही झुरळ उरलं नाही. सगळी गायब झालीत. मला वाटतं त्यांना माहीत झालंय, की आमच्या घरात काहीतरी डेंजर गोष्ट आहे. त्यामुळे ती आता आमच्या घराकडे फिरकतच नाहीत. आमचं घर आता १०० टक्के झुरळमुक्त झालंय. आणि मी निवांतपणे टॉयलेटचा वापर करू शकतोय. थँक्स टू इंजेक्शनवालं HIT!

४. उंदीर.
उंदरांचा आणि माझा संबंध पंचवीस वर्षांपूर्वी डोंबिवलीत आला होता. मी नुकताच स्वतंत्र संसार थाटला होता. घर घेताना काय बघून घ्यावे ह्याचीही मला तेव्हा अक्कल नव्हती. बस! नगाला नग मिळालं म्हणून एका बैठ्या कौलारू चाळीत भाड्याने घर घेतलं. त्या चाळीत दहा बाय वीसच्या दहा खोल्या होत्या. चाळीच्या चारही बाजूला मातीची भुसभुशीत जमीन. खोल्यांची अवस्था अत्यंत बेकार होती. पावसात भिंतींना बुरशी यायची. झोपताना भितींना गुढघा लागला तर सरसर प्लास्टर पडायचे.  ट्युबलाईट फिटिंग सहा इंची लांब खिळ्यांनी बोटांनी दाबून भिंतीमध्ये अडकवली होती. पावसाची जोराची झड आली तर कौलांतून तुषार घरात यायचे. पलंगाच्या गादीचा कापूस तुषार पिऊन चपटा झाला होता. शेजारच्या खोलीतला माणूस सेकंड शिफ्ट करून रात्री घरी आल्यावर, जेऊन झोपेपर्यंत नवराबायकोचे सर्व संभाषण कानी पडायचे.

त्यामुळे साहजिकच अशा चाळीत उंदरांचा भयंकर सुळसुळाट होता. रात्रभर उंदरांची फौज कौलारू छपराच्या आढ्यावर ह्या खोलीतून त्या खोलीत पकडपकडी खेळायची. भिंतींला लागून असलेल्या मांडणीला पकडून खाली उतरायची. खुडबुड करून डबे उघडायची. खायची कमी पण नुकसान जास्त करायची. रात्री त्यांच्या खुडबुडीने आमची झोपमोड व्हायची. आम्ही त्यांना शुकशुक करायचो. मग ते शहाण्या उंदरासारखे हळूच निघून जायचे. थोड्यावेळाने उंदरांची दुसरी फौज आढ्यावर मोर्चा सांभाळायची. मग पुन्हा रणकंदन सुरू. अंधारात त्यांना जास्त चेव चढायचा म्हणून रात्रभर ट्युबलाईट चालू ठेवायला लागे. हो! एक मात्र होतं. कदाचित ते डोंबिवलीतले उंदीर असल्याने सुसंस्कारित होते. आम्हाला ते कधीच चावले नाहीत, की त्यांनी कधी घरभर लेंड्या टाकल्या नाहीत. आणि ते अंगांनीही सुबक आणि सडपातळ होते. ढोले नव्हते. त्यामुळे आम्हां उभयतांना त्यांची कधी भीती वाटली नाही. कालांतराने आम्ही त्यांना ओळखुही लागलो होतो. फक्त त्यांचं नामकरण करणंच तेव्हढं बाकी होतं.

कर्मधर्मसंयोगाने आमच्या एका नातेवाईकाचा कल्याण येथे फ्लॅट रिकामा होता. त्यांना खात्रीशीर भाडेकरू हवा होता. मग अवघ्या नऊ महिन्यातच आमची रवानगी चाळीतून त्या फ्लॅटमध्ये झाली. आणि आमची चाळीतल्या उंदरांशी ताटातूट झाली. आजही त्या उंदरांबरोबर एकत्र काढलेल्या दिवसांच्या आठवणीने माझा जीव कासावीस होतो आणि डोळे डबडबतात. कुठे असतील आणि काय करत असतील ते आता, कोण जाणे!!!?

५. गोम.
जसा 'गोम' हा शब्द ऐकायला विचित्र वाटतो, तशीच तीसुद्धा विचित्र दिसते. अंग अगदी एव्हढूसं, पण पाय किती? तर शंभराच्यावर!!! अरे एव्हढा मोठा साप, बिना पायांचा सरसर चालतो. अन् हिला एव्हढे पाय असताना ही धडपणे चालते तरी कुठे? चालते आपली लचकत, मुरडत, नागमोडी वळणं घेत. तर अशा ह्या गोम नाहीतर तिच्या पिल्लांचे महिन्यातून एकदा तरी आमच्या बाथरूममध्ये, नाहीतर त्याच्या आजूबाजूला दर्शन होत असते. मग काय!? मी तिथेच ठेवलेलं कपडे धुवायचं धोपटणं घेतो आणि त्यांना चिरडून टाकतो. पण गोम मारणं जेव्हढं वाटतं तेव्हढं सोपं नाही बरंका! आपण तिला मारायला गेलो की आपल्या शंभर पायांनी ती शंभरच्या स्पीडने अशी काही नागमोडी सुसाट पळत सुटते, की आपल्या धोपटण्याच्या फटक्यात ती सापडतच नाही. पट्कन कुठल्यातरी फटीत गायब होऊन बसते. आणि मग पुढचे दोन तीन दिवस आपण घाबरत घाबरत टॉयलेट, बाथरूममध्ये जातो. आणि आपले महत्वाचे कार्य उरकत असताना आजूबाजूच्या फरशीच्या फटींवर एक डोळा ठेवतो. न जाणो गोम कुठूनही बाहेर आली तर! आपण धूम पळण्याच्या तयारीत राहिलेलं बरं!

६. मधमाशी.
आमच्या सोसायटीत कुठल्या ना कुठल्या बिल्डिंगला नेहमी एखादं मधाचं पोळं चिकटलेलं असतं. त्यामुळे अंधार झाला, की बऱ्याचदा एखादी मधमाशी ट्युबलाईटच्या प्रकाशाकडे आकर्षून आमच्या घरात शिरते. आणि सारखी घुंss घुंss करत घरभर फिरत रहाते. एकदा तर मी झोपेत असताना माझा हात मधमाशीवर पडला असता ती माझ्या बोटाला चावलीसुद्धा आहे. अक्षरशः बोटाचं हाड तुटल्यासारख्या टेरिफिक वेदना झाल्या होत्या. म्हणून आता मधमाशी घरात शिरली रे शिरली, की तिला झाडूचा रट्टा हाणून धारातीर्थी पाडतो. ना रहेगा बाँस, ना बजेगी बांसुरी!

७. पाल.
पालीचं आणि माझं काही वाकडं नाही. ती घरात असली काय, आणि नसली काय, मला काही फरक पडत नाही. पण समस्त स्त्रीवर्गाप्रमाणे आमच्या सौ.नासुद्धा पालीचे प्रचंड वावडे आहे. काय माहीत नाही, पण तिला पाल गुळगुळीत वाटते. पालीला पाहून तिला यक्क्क होते. म्हणून पाल दिसली रे दिसली, की सौ. पालीला धारातीर्थी पाडण्याची ऑर्डर सोडते. आणि तुम्हाला माहीतच आहे, की होममिनिस्टरच्या ऑर्डरला कधीच अपील नसते. Do or die!! बस्!!

मग काय मी पाल मारण्याच्या मोहिमेवर निघतो. पाल मारण्याची मी तुम्हाला एक टीप देतो. पाल मारायला झाडू कधीच वापरू नये. झाडू मुळमुळीत असतो, आणि पाल कडक. पाल लवकर मरत तर नाहीच, उलट पळून जाते. पण झाडूचे उगाच दीड दोनशे रुपयांचे नुकसान होते. त्याऐवजी पाल मारायला खराटा वापरावा. आता तर प्लास्टिकचे खराटे आलेत. एकदम मजबूत. तर मी असा एखादा प्लास्टिकचा खराटा घेतो आणि देतो ठेऊन, पालीच्या एक मुस्कटात. खराट्याच्या एका फटक्यात पालीचे काम तमाम होऊन जाते. अजून एक, तुम्ही पाहिलेय ना, आपण पालीला मारायला गेल्यावर तिची अर्धी शेपूट तुटून खाली जमिनीवर कशी पडते, आणि बराच वेळ वळवळत रहाते. किती अजब, विचित्र वाटते न पहायला!!!? पण घाबरायचं नाही. पालीने आपलं लक्ष विचलित करायला ती शेपूट सोडलेली असते.

तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती माझ्या घरात शिरलेल्या पशु, पक्षी आणि कीटकांबरोबर मी दिलेल्या झुंजींची कहाणी. ह्या भागाबरोबरच मी येथे माझ्या मालिकेची समाप्ती करतोय. आशा करतो, की तुम्हाला मालिका आवडली असेलच. आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा हं! मी वाट पाहतोय.