Tuesday 1 August 2017

हंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा?



          हा! हा!! हा!!! मला माहितेय! वरील शीर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. तुम्हाला वाटलं असेल, काय लिहिलंय हे!!? आफ्रिकेच्या जंगलातील कोण्या आदिवासी लोकांची भाषा दिसतेय ही. वाचताना असं वाटतं की, सर्व आदिवासींनी मिळून एक मोठी शिकार केलीय. मैदानात उघडेबंब, अंगावर चट्टेपट्टे ओढलेले आणि हातात भाले वगैरे घेतलेले लहानथोर सर्व आदिवासी जमलेत. मधोमध मोठ्या शेकोटीवर शिकार भाजायला लावलीय. आणि त्याभोवती सर्व फेर धरून नाचतायत आणि गातायत. "झिंगालाला! होsss!! टुंबक्टू! टुंबक्टू!! टुंबक्टू!!!"

          हा! हा!! हा!!! अहो असं काही नाहीए. ही उटपटांग भाषा कोणतीए, सांगतो! सांगतो! एकदा काय झालं, माझ्या लहानपणी मी माझ्या मित्राच्या घरी अभ्यासाकरिता गेलो होतो. त्यावेळीे त्याचे आईवडिल आणि बहीणभाऊसुद्धा घरात होते. मी आणि माझा मित्र बेडरूममध्ये अभ्यास करत बसलो होतो. अधेमधे मित्राचे आईवडिल आणि बहीणभाऊ काही कामानिमित्त बेडरूममध्ये आले, की त्यांचे माझ्या मित्राबरोबर वरील 'टन् टना टन्' भाषेत बोलणे चाले. मला काही समजेच ना! की ते कोणत्या भाषेत बोलतायत ते! ती मला काही साऊथच्या भाषेसारखी 'अंडूगुंडू', गुज्जूसारखी 'केम छो',  बंगांल्यांसारखी 'की खाबो' किंवा चायनीजसारखी 'च्यांव म्यांव' वगैरे वाटेना. त्यांचे आपसातील बोलणे ऐकताना मला कुठल्यातरी देवळातील घंटा बडवल्यासारखे त्यांच्या तोंडून फक्त 'टन् टन्' ऐकू येत होते. एक अक्षर कळेल तर शपथ!

          त्यांचे 'टन् टना टन्' भाषेतले बोलणे ऐकून मी हैराण झालो होतो. दुसऱ्या दिवशी मित्र शाळेत भेटल्यावर मी त्याला त्याविषयी विचारले. त्याबरोबर तो पोट धरून जोरजोरात हसू लागला. मला म्हटला "अरे वेड्या! आम्ही आपसात बोलत होतो ती काही कुठल्या जातीधर्म किंवा प्रांत वगैरेची भाषा नव्हती. ती आमच्या घरात पूर्वीपासून चालत आलेली एक प्रकारची 'सांकेतिक भाषा' आहे, जी फक्त आमच्या घराणातल्या लोकांनाच माहीत आहे. काय होतं, की जेव्हा आपल्या आजूबाजूला बरीच इतर माणसं असतात आणि आपल्याला आपल्या माणसांबरोबर काही खाजगी बोलायचं असतं, तेव्हा ही 'सांकेतिक भाषा' आपल्याला उपयोगी पडते. इतर लोकांना काहीच कळत नाही आपण काय बोलतोय ते! आहे की नाही गंमत!"

          मला ही कल्पना फारच आवडली. मी माझ्या मित्राला ती सांकेतिक भाषा मला शिकविण्याबद्दल फारच गळ घातली. बरेच आढेवेढे घेतल्यावर त्याने मला ती भाषा शिकवली. आणि मग काय!!? वर्गात आम्ही दोघे त्याच 'टन् टना टन्' भाषेत एकमेकांशी बोलू लागलो. इतर मित्रांना न कळता आमची गुपितं चारचौघात एकमेकांना सांगू लागलो. आता तुम्हालाही ती भाषा शिकण्याची उत्सुकता लागून राहिली असेल ना? हो! ती भाषा मी तुम्हालाही शिकवणार आहे, पण लेखाच्या शेवटी.

          तर मी काय सांगत होतो? सांकेतिक भाषा!!! आमच्या लहानपणी आपली गुपिते चारचौघात उघडपणे बोलता यावीत म्हणून खास बनवलेली अजून एक भाषा होती, ती म्हणजे 'च' ची भाषा. नमुना सांगतो. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर आम्ही हे कसं म्हणायचो पहा! "चजआ चमी चझ्यामा चब्यातड चकए चमतगं चणलीयआ" आहे की नाही मज्जा!!? पण ही भाषा त्यावेळी बहुतेक मुलांमुलींना येत होती. त्यामुळे त्यात एवढं गुपित आणि नावीन्य राहिलं नव्हतं. मग कधी कधी एक गंमतसुद्धा व्हायची. इतरांना ही भाषा माहीत नसेल हे गृहीत धरून आम्ही चारचौघात ती भाषा एकमेकांत मोठ्याने बोलायचो, आणि समोरचा म्हणायचा "मला समजलं!! तुम्ही लोकं काय म्हणतायत ते!" अस्सा पोपट व्हायचा ना आमचा!!!

         त्यावेळी अजून एक सांकेतिक भाषा मी ऐकून होतो, पण बोलणारा कोणी सापडला नाही. त्याविषयी थोडक्यात. त्या भाषेचं नांव होतं. 'राम कृष्ण हरी'. याकरिता आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय" तर ह्या भाषेत आपण कसं म्हणू? ऐका "आजराम मीकृष्ण माझ्याहरी डब्यातराम एककृष्ण गंमतहरी आणलीयराम" ही भाषा बोलताना आपोआप देवाचा जप होई, म्हणून ती आध्यत्मिक लोकांमध्ये बोलली जात असावी.

          चला तर मग मी तुम्हाला मघाची 'टन् टना टन्' भाषा शिकवतो. शिकायला थोडी कठीण आहे. पण एकदा भाषेचं तंत्र समजलं, की बोलायला एकदम सोप्पी आहे. कसं आहे, की ही भाषा प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या स्वरावर अवलंबून आहे. तो स्वर लक्षात ठेऊन त्या अक्षराचा स्वर काढून घ्यायचा. मग स्वर काढून राहिलेल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा. नंतर पहिल्या अक्षराचा काढलेला जो स्वर आहे तो 'ट'ला लावून तो 'ट' स्वर काढलेल्या अक्षराच्या पुढे ठेवायचा. मग बाकी राहिलेला शब्द आहे तसाच 'ट'ला जोडायचा. नाही समजलं? उदाहरण सांगतो. आपण 'कुठे' हा शब्द घेऊ. तर आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. 'कुठे' शब्दाचे पहिले अक्षर आहे 'कु'. 'कु'चा स्वर आहे 'उ'. तो स्वर बाजूला केल्यावर रहातो 'क'. आता 'क'वर अनुस्वार दिल्यावर त्याचा होतो 'कं'. आता काढलेला स्वर जो 'उ' आहे तो 'ट'ला जोडल्यावर त्याचा होतो 'टु'. आता हा 'टु' अगोदरच्या 'कं'च्या पुढे ठेवल्यावर शब्द होईल 'कंटु'. ह्या 'कंटु'च्या पुढे राहिलेला 'ठे' जोडला की शब्द होईल 'कंटुठे'. संपलं! 'कुठे'ला आपण 'टन् टना टन्' भाषेत बोलू 'कंटुठे'. आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर हे वाक्य आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. "अंटाज मंटी मंटाझ्या डंटब्यात एंटेक गंटंमत अंटाणलीय" अगदी सोप्पय!! अहो, आम्हाला असं बोलायची एवढी सवय झाली होती की आम्ही धडाधड ही भाषा बोलत असू. ऐकणाऱ्याला फक्त 'टन् टना टन्' आवाज ऐकू येत असे. आहे की नाही सगळी गंमत!

          तर मित्रांनो! ही 'टन् टना टन्' भाषा शिकून घ्या. सराव करा. आणि आपल्या मित्राबरोबर चारचौघात उघडपणे आपली गुपिते शेअर करा. कोणाला काहीच कळणार नाही, याची फुल्ल गॅरंटी! आणि हो! तुम्हालाही ह्या प्रकारची दुसरी कुठली एखादी सांकेतिक भाषा येत असेल तर येथे आमच्याबरोबर शेअर करा. तेवढीच एक गंमत!

No comments:

Post a Comment