Sunday 28 May 2017

साधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा!!!



          पावसाच्या वर्षावात न्हायला सर्वांनाच आवडतं. पण मी तुम्हाला आता एक असा खरा घडलेला प्रसंग सांगणार आहे, ज्यात अशा एका गोष्टीच्या वर्षावात काही जणांना न्हायचा योग आला होता, ज्याची कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकणार नाही.

          त्याचे असे झाले, की मी एकदा लोकलट्रेनने सकाळी साधारण सात साडेसात वाजता गर्दीच्या उलट दिशेने प्रवास करीत होतो. अशावेळी गाडीत अगदी तुरळक माणसे असतात. त्यातले बरेचसे रात्रपाळी करून, डुलक्या काढत घरी जाणारे असतात. आणि जे जागे असतात तेही पेंगूळलेल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर बघत शांत बसलेले असतात. गाडी सुसाट पळत असते. नुकताच सूर्योदय होत आलेला असतो. मस्त गार वारा अंगाला झोंबत असतो.

          तर अश्या या रम्य वातावरणात मी गाडीच्या डब्यात तिसऱ्या सीटवर कडेला बसलो होतो. मध्ये, माझ्या बाजूला छान कडक इस्त्री केलेला सफारी घातलेला एक तरुण, आणि त्याच्या बाजूला सुंदर शालू नेसलेली एक तरुणी खिडकीत बसलेली होती. त्यांच्या एकंदर अभिर्भावावरून त्यांचं नुकतंच लग्न झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. ते जोडपं एवढं सजून धजून कदाचित कोण्या नातेवाईकाकडे किंवा देवदर्शनाला चाललेले वाटत होते.

          आणि आमच्या समोरच्याच सीटवर खिडकीच्या कोपऱ्यात एक साधू एकटाच बसलेला होता. काय त्याचे राजबिंडे रूप वर्णावे!! अगदी गोरागोमटा, चांगली सहा फूट उंची, घारे डोळे, डोक्याचे टक्कल केलेले, छोटुशी शेंडी, तुळतुळीत दाढी, बारीक काड्यांचा चष्मा, नाकाच्या मध्यापासून थेट कपाळाच्या सुरवातीपर्यंत चंदनाचा जाडसर गंध ओढलेला, अंगात भडक भगवा सदरा, गळ्यात प्रिंटेड उपरणे आणि कंबरेला धोतर गुंडाळलेले होते. तो लोकलट्रेनमध्ये अगदी नवखा वाटत होता. सारखा बावरून खिडकीबाहेर भिरभिरत्या नजरेने पहात होता. कुठे उतरायचं होतं कोण जाणे त्याला? मी आणि माझे सहप्रवासी अधूनमधून हळूच त्याला चोरट्या नजरेने दबकून पहात होते.

          स्टेशनांमागून स्टेशनस् जात होती. माझ्या बाजूच्या जोडप्याचं आपसात लाडेलाडे बोलणं चालू होतं. माझ्या डोळ्यांवरसुद्धा पेंग यायला लागली होती. गाडी हळूहळू मुलुंड स्टेशनवर येऊन गचका देऊन थांबली. आणि अचानक ते घडलं.....

          त्या साधूने गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. आणि आपल्या समोरील जोडप्यातील तरुणाला विचारलं. "Mulund?" तरुणाने होकारार्थी मान डोलावली. त्याबरोबर तो साधू एकदम बावचळला. गाडी आता सुरू होणार होती. त्याला मुलुंड स्टेशनवरच उतरायचे होते. तो ताडकन् उभा राहिला. काहीतरी आठवल्याबरोबर पुन्हा सीटवर बसला. आणि आपल्या सीटखाली ओणवा झाला. दुधवाल्यांकडे असते तशी, पण साधारण पाच सहा लिटरची, प्योर चकचकीत स्टीलची, धरायला गोल कडी असलेली किटली त्याने सीटखाली ठेवलेली होती. त्याने उतरायच्या घाईत किटलीच्या कडीला धरले आणि किटली पट्कन जोरात बाहेर ओढली.

          आणि हाय रामा!!! जे कधी आयुष्यात पाहिले नव्हते असं आक्रीत घडलं. त्याने किटलीच्या कडीला धरून ओढल्याबरोबर, किटलीच्या झाकणाचे उंच टोक सीटच्या कडेला अडकून फट्कन झाकण उडाले आणि किटलीला जोराचा झटका बसल्याने किटली तिरकी ओढली जाऊन आत असलेला जवळ जवळ निम्मा द्रवपदार्थ समोर बसलेल्या कडक सफारी घातलेल्या आणि सुंदर शालू नेसलेल्या, तरुण आणि तरुणीच्या अंगावर उपडा झाला. कोणता होता तो द्रवपदार्थ सांगू!!!?

          त्या तरुण आणि तरुणीच्या अंगावर उपडा झालेला द्रवपदार्थ होता....आंब्याचा गारेगार रस....'आमरस'....!!!!! होय! तो घट्ट आमरसच होता. ज्यात तो तरुण आणि तरुणी नखशिखांत माखून निघाले होते. त्याचा सफारी आणि तिचा शालू आमरसात पार चिंब भिजले होते. डब्यात सर्वत्र आंब्यांचा सुगंध पसरला. अचानक झालेल्या ह्या 'आमरसाच्या अमृतधारे'च्या वर्षावाने दोघेही अवाक् झाले. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेना. किटली आपटल्याच्या आवाजाने आणि आंब्यांच्या सुवासाने डब्यातल्या सहप्रवाशांचीही डोळ्यावरची झोप उडाली. सर्व एकमेकांकडे काय झाले म्हणून बघू लागले. उपासतापास करणारा एखादा साधू एवढा पाच सहा लिटर आमरस घेऊन प्रवास करत असेल ह्यावर कोणाचाही विश्वास बसेना. कुठे नेत असेल तो एवढा आमरस? कोणाकरिता नेत असेल? एवढया आमरसाचं तो काय करणार असेल? सर्वांनाच प्रश्न  पडला होता. घडलेला प्रसंग पाहून काहींच्या चेहऱ्यावर हसू फुटायचेच तेवढे बाकी राहिले होते.

          झालेल्या गोंधळाचा त्या साधूने फायदा घेतला. त्याला समजायला वेळ नाही लागला, की आपण 'सॉरी' बोलायला थांबलो तर आपणच अडचणीत येऊ. त्याने पडलेली अर्धी रिकामी किटली उचलली. त्याला झाकण लावले. आणि तो उतरण्याकरिता दरवाज्याकडे पळाला. तोपर्यंत गाडीने हळूहळू धावायला सुरवात केली होती. पण त्या साधूने चालू गाडीतून रिकाम्या किटलीसकट स्टेशनवर झट्कन उडी मारली.

          आता आम्हां सर्वांचे लक्ष त्या तरुण आणि तरुणीकडे लागले, जे आपल्याकडील रुमालाने आपल्या अंगावरचा आमरस स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होते. पण पाण्याशिवाय तो स्वच्छ होणे कठीण होते. त्यामुळे पुढील ठाणे स्टेशन आल्याबरोबर दोघांनी गाडीतून उतरून घेतले. आणि इथे गाडीच्या डब्यात आम्ही सर्व एकमेकांना एकच प्रश्न विचारत होतोे. "वो साधू इतना आमरस लेके कहाँ जा रहा था?" नंतर कितीतरी वेळ डब्यात हास्याचा धबधबा कोसळत होता.

          अशातऱ्हेने आम्हाला 'आमरसाच्या अमृतधारां'चा वर्षाव अनुभवायला मिळाला. इतक्या वर्षांनंतर अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या चेहऱ्यावर हसू उमटते.


Saturday 20 May 2017

माझ्या आठवणीतील रीमा लागू.



रीमा लागू यांच्याविषयी माझ्या मनातून कधीच न पुसली जाणारी एक आठवण आहे, जी मी आपणां सर्वांबरोबर शेयर करू इच्छितो. १९८५-८६ साली मी मुंबईत डिग्री कॉलेजमध्ये शिकत होतो. माझे साहित्यिक वाचन भरपूर होतं. सिनेमे, नाटकंही तेवढीच पहायचो. नाटक सादर करताना प्रेक्षकांशी समोरासमोर होणाऱ्या सुसंवादाच्या आकर्षणापायी तेव्हा मला नाटकात काम करण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. मी कॉलेजमध्ये सादर होणाऱ्या नाटकात भाग घेई. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या श्री.कृ.रा.सावंत यांचा 'नाट्य प्रशिक्षण कोर्स'ही मी यशस्वीरित्या पूर्ण केला होता. नाट्याभिनय क्षेत्रात शिरण्याचा माझा मानस असल्याने मी लोकांच्या ओळखी काढत होतो. तेव्हा माझी अशा एका व्यक्तींची ओळख झाली ज्यांची व्यावसायिक नाट्यक्षेत्रात असणाऱ्या निर्मात्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्या व्यक्तींच्या ओळखीने मी एका हॉलमध्ये चालणाऱ्या व्यावसायिक नाटकांच्या तालमी पहायला रोज हजर रहात असे.

असेच एके दिवशी माझी नाटकाची आवड पाहून तालमीत असणाऱ्या एका बॅकस्टेज आर्टीस्टने शिवाजी मंदिर येथे 'सविता दामोदर परांजपे' या नाटकाचा प्रयोग बॅकस्टेजने पहाण्याची मला संधी दिली. नाट्यगृहात मी उशिरा गेलो तेव्हा प्रयोग अर्धा होत आला होता. स्टेजच्या बाजूच्या अंधाऱ्या विंगेमध्ये 'प्रकाश योजना' करणारी व्यक्ती आपल्या साहित्यानीशी हजर असते. त्याच्याबाजूला उभ्याने मी प्रयोग पहात होतो. विंगेमध्ये सर्वत्र अंधार होता. स्टेजवर रीमा लागू आणि राजन ताम्हाणे यांचा प्रवेश चालू होता. संवादांची आतिषबाजी होत होती.

आणि अचानक तो क्षण आला. रीमा लागू यांचा प्रवेश संपला. त्यांनी स्टेजवरून एक्झिट घेतली आणि विंगेमध्ये अंधारात मी उभा होतो तेथून अवघ्या सातआठ फुट पलीकडे त्या सरसर येऊन उभ्या राहिल्या.

बापरे!! काय रोमांचक क्षण होता तो!! गूढ नाटक असल्याने स्टेजवर रंगीबेरंगी प्रकाशात चाललेला राजन ताम्हाणे यांचा गूढ अभिनय आणि संवाद. नाट्यगृह तुडुंब भरलेले असूनही भांबावून चिडीचूप बसलेला एकूणएक प्रेक्षक. बाजूला विंगेच्या आतमध्ये अंधारात उभा असलेला प्रकाशयोजनाकार आणि त्याच्या बाजूला हबकून उभा असलेला मी. आणि माझ्यापासून अवघ्या सात आठ फुटांवर माझ्याकडे रोखून पहाणाऱ्या, पांढऱ्या शुभ्र साडी परिधान केलेल्या रीमा लागू......

तेव्हा त्या ऐन तिशीत असाव्यात. किती करारी आणि लोभसवाणं व्यक्तिमत्त्व दिसत होतं त्यांचं. मला माझ्या काळजाची धडधड जोरात ऐकू येऊ लागली होती.

रीमा लागू यांचा लगेच पुन्हा स्टेजवर प्रवेश होता. फक्त एका मिनिटाकरिता त्या विंगेमध्ये माझ्यासमोर काही न बोलता स्तब्ध उभ्या होत्या आणि मग पुन्हा स्टेजवर गेल्या.

झालेल्या प्रसंगाचे माझ्या मनावर एवढे दडपण आले की मी गुपचूप मागच्यामागे बॅकस्टेजच्या बाहेर पडून नाट्यगृहाच्या बाहेर आलो.

एवढ्या वर्षांनंतरही विंगेच्या अंधारात एका मिनिटाकरिता पाहिलेली रीमा लागू यांची छवी माझ्या डोळ्यांपुढे अजूनही तशीच्या तशी दिसते आहे.

मी रीमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Friday 19 May 2017

बर्गर आणि वडापाव.



ती : "का रे बोलावलंस मला या बागेत? असं काय महत्वाचं सांगायचं आहे म्हणालास? फोनवर बोलता आलं नसतं का आपल्याला? संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी बॉस काही मला सोडायला तयार होत नव्हता. एक अर्जंट लेटर टाईप करूनच जा म्हणत होता. शेवटी आले मी त्याला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं सांगून. त्यालाही माहीत आहे ना, आईच्या कॅन्सरचं! जा म्हणाला."

तो : "अगं हो! हो! जरा दम खाशील की नाही? बस की जरा या बेंचवर. बघ समोरच्या झोपाळ्यावर कशी लहान बाळं खेळताहेत. आणि ते बघ ती मुलगी फुलपाखराच्या मागे पळतेय. अरे! अरे! बघ कशी धपकन् पडली ना ती!!"

ती : "अरेरे! लक्ष कुठे असतं कोण जाणे त्यांच्या आयांचं? हो सरक त्या बाजूला. हुश्श! दमले रे बाबा! बसच्या गर्दीतला प्रवास अगदी नकोसा होतो. तुम्हां आयटीवाल्यांचं बरंय रे! ऑफिसला आणायला, सोडायला तुम्हा लोकांना कॅब असते. आणि कॅब आली नाही तर तुला ऑफिसला पोहोचवायला तुझ्या घरची गाडी आहेच की. मला माझ्या वडिलांचे आश्चर्य वाटतं, मिलमधून रिटायर होईपर्यंत ते सायकलवरूनच जात येत होते. घे! ह्या पुडीतला एक वडापाव खा. येताना त्या नेहमीच्या गाडीवाल्याकडून घेतलाय."

तो : "नको मला. कितीवेळा सांगितलंय रस्त्यावरचं मी काही खात नाही."

ती : "नको तर नको. माहितेय मला. डॉक्टर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ना तू! तुला रस्त्यावरचा वडापाव कसा चालणार. आपलं लग्न झाल्यावरसुद्धा मी गाडीवरचा वडापाव खायचं सोडणार नाही हं! आधीच सांगून ठेवते. मला नाही आवडत बाई तो बर्गर बिर्गर. अरे हो! तू तुझ्या मम्मीपप्पांना आपल्या लग्नाचं विचारणार होतास ना, काय झालं त्याचं?"

तो : "हो, तेच सांगायला मी तुला इथे बोलावलं होतं. तर तुझं आपलं कधीचं वडापावपुराणच चाललंय."

ती : "बरं बाबा! सांग. अरे, परवा मला आपल्या मम्मीपप्पांना भेटवायला घेऊन गेला होता तेव्हा काय भांबावला होतास रे तू. आणि माझा ड्रेस तुझ्या मम्मीला आवडला नाही वाटतं? किती वेळ निरखून बघत होत्या त्या माझ्या ड्रेसकडे. तेव्हढाच तर एक भारीवाला ड्रेस आहे माझ्याकडे."

तो : "अगं पण इस्त्री तरी करून घालायचा होता."

ती : "इस्त्री बिघडलीय. ह्या पगाराला नवीन घेणारच होते. आणि हो! तुझ्या आईच्या हातचे पराठे आवडले हं मला. मस्तं झाले होते."

तो : "हो! पराठ्याबरोबरचं लोणचं तू जसं चटकमटक करून खात होतीस, त्यावरून समजत होतंच की."

ती : "अपना तो बाबा वोह स्टाईलीच है. अरे! चहापण बशीत घेऊन फुरक्या मारून प्यायल्याशिवाय मला गोड लागतच नाही. आणि हो! माझ्या आईचा इलाज तुमच्या ओळखीने स्वस्तात कुठे होतो का बघा, असे मी विचारल्याबरोबर तुझ्या मम्मीपप्पांचा चेहरा किती गोरामोरा झाला होता!"

तो : "अगं पहिल्याच भेटीत असं विचारायचं असतं का कधी?"

ती : "अस्सं होय! मग कधी विचारायचं असतं? आपलं लग्न झाल्यावर का? अरे हो!! ते राहिलंच की? तू सांगणार होतास ना! काय म्हणाले मम्मीपप्पा आपल्या लग्न करण्याविषयी? पण थांब! नको सांगू. मलाच तुला काहीतरी सांगायचंय."

तो : "मला सांगायचंय? काय!!!?"

ती : "मला आठवतंय तो दिवस जेव्हा आपली पहिली भेट झाली होती. एका संध्याकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे सर्व बसेस बंद पडल्या होत्या."

तो : "आणि मी माझ्या कारमध्ये चार जणांना लिफ्ट दिली होती. त्या चौघांमध्ये तूसुद्धा होतीस."

ती : "हो! शेवटचं मला घराजवळ सोडताना मी तुला चहा पिण्याकरीता घरी चलण्याचा आग्रह केला होता."

तो : "आणि मग मी फक्त तुला भेटण्याकरिता काहीना काही निमित्त काढून वरचेवर तुझ्या घरी येत रहायलो."

ती : "हळूहळू आपण एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे समजलंच नाही. आणि एक दिवस तू मला लग्नाची मागणी घातली. आणि मीसुद्धा भावनेच्या भरात तुला हो म्हटलं."

तो : "भावनेच्या भरात!!? म्हणजे म्हणायचं काय आहे तुला?"

ती : "परवा आपल्या मम्मीपप्पांना भेटवायला तू मला घेऊन गेलास. तुझं ते मोठं घर पाहून तर मी प्रथम हबकूनच गेले. तुझ्या घरातल्या महागातल्या वस्तू, तुमचं श्रीमंती राहणीमान, तुमच्या चालीरीती हे सर्व माझ्या कल्पने पलीकडले होते. त्यात तुझ्या मम्मीपप्पांचं माझ्या बरोबरीचं कोरडं वागणं, माझ्या मनाला कुठेतरी टोचलं रे!! नाहिरे!! मी तुमच्या बरोबरीची नाहीए!! आपल्या लग्नानंतर मी तुमच्या घरात सामावू शकणार नाही. आणि म्हणूनच खूप विचार करून मी एक निर्णय घेतलाय."

तो : "कोणता?"

ती : "तुझ्याशी लग्न न करण्याचा!!!"

तो : "काय म्हणतेस!!!!?"

ती : "हो! तुझ्या मम्मीपप्पांनी आपल्या लग्नाला दिलेला नकार मला ऐकवणार नाही. म्हणून मी तुला त्याआधीच सांगतेय. मला विसरून जा. आणि जमलं तर मला माफ कर. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही."

तो : "होय! तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. परवा तू घरी येऊन गेल्यावर मम्मीपप्पांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली. आणि आपले लग्न होणे कदापि शक्य नाही असं मला ठाम शब्दात सांगितलं. आता मम्मीपप्पांचे मन मोडणे मला तर शक्य नाही. म्हणून लग्नाचा नकार तुला कसा कळवायचा याचीच मला चिंता पडली होती. बरं झालं तूच आपल्या लग्नाला नकार दिलास. माझ्या मनावरचं किती मोठं ओझं उतरवलंस तू."

ती : "काय!!!!? खरं म्हणतोयस का तू हे?"

तो : "अगदी खरं!"

ती : "मग मी जाऊ म्हणतोस आता?"

तो : "जातेस तर जा!"

ती : "आपल्यातले संबंध संपले असं समजू का मी?"

तो : "असंच समज. पण ते तुझं रडू थांबव पाहू आता. हा घे रुमाल. डोळे पूस. नाहीतर आपल्याला बघणाऱ्या लोकांना काही तरी भलताच संशय यायचा."

ती : "बरं मी जाते."

तो : "ठीक आहे. पण मम्मीपप्पांनी आपल्या लग्नाला नकार दिल्यानंतर काय घडले ते तर ऐकून जा."

ती : "काय घडले?"

तो : "मी मम्मीपप्पांची फार विनवणी केली. मी त्यांना सांगितलं, की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी लग्न करेन तर तुझ्याशीच. नाहीतर आजन्म अविवाहित राहीन. तरी ते ऐकेना. मग मी त्यांच्याशी अबोला धरला. अन्नपाणी सोडले. आणि मग काय झाले सांगू?"

ती : "काय?"

तो : "आज सकाळी त्यांनी मला बोलाविले. मला म्हणाले, तू आमचा एकुलता एक मुलगा आहे. तुला दुःखी झालेले पाहून आम्हाला राहवत नाहीए. आणि म्हणून आम्ही तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहोत."

ती : "काय!!!?"

तो : "हो! पण एका अटीवर. तुझ्या होणाऱ्या बायकोने आपल्या राहणीमानाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आणि आम्हीसुद्धा तिच्या राहणीमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. तिने एक पायरी वर चढावी, आम्हीसुद्धा एक पायरी खाली उतरू. मग! तू माझ्याकरीता एवढं तर करशील ना?"

ती : "हो! करेन ना मी. तुझे मम्मीपप्पा माझ्याकरीता एवढी तडजोड करत आहेत, तर मी का नाही करणार? पण आपल्या लग्नाला मम्मीपप्पा तयार झालेत, हे तू मला अगोदरच का नाही सांगितलंस? जातेस तर जा म्हणून उगाच रडवलंस ना मला?"

तो : "मग तुसुद्धा मला सोडून जायचं म्हणत होतीस ते!! मनात म्हटलं जरा तुझीपण गंमत करावी. मला माफ कर. मग सांग ना! करशील ना माझ्याशी लग्न?"

ती : "हो रे राजा! मी तुझ्याकरिता काहीही करायला तयार आहे?"

तो : "आणि मीसुद्धा तुझ्याकरिता काहीही करायला तयार आहे? अगदी रस्त्यावरच्या गाडीचा वडापावही खाऊन दाखवेन. हा! हा! हा!"

ती : " आणि मीसुद्धा बर्गर खात जाईन. हा! हा! हा!"

Friday 12 May 2017

भारत पाक युद्धातील एक आठवण.


          भारत पाकिस्तान युद्ध आठवते. तेव्हा आम्ही सायनला रहायचो. शत्रूची विमाने मुंबईवर आली की सगळीकडून जोराने सायरन वाजायचे. घरातून सर्व लोक बाहेर पडून मैदानात जमायची. रात्र असली की ब्लॅक आउट केला जायचा. म्हणजे संपूर्ण मुंबईची लाईट घालवायचे. शत्रूच्या विमानांना दिशाभूल करण्याकरिता सगळीकडे अंधार केला जायचा. सगळ्यांनी आपल्या घराच्या खिडक्यांच्या काचांना ब्राऊन पेपर लावायची ऑर्डर निघाली होती. आम्ही घरात समयीच्या प्रकाशात बसायचो. एवढं करूनही रस्त्यावरून कोणाच्या घरात प्रकाश दिसला तर लोकं आरडा ओरडा करून घरावर दगडफेक करायची.

          एकदा आठवतं सायरन वाजले, ब्लॅक आउट झाला, आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो.  सगळ्यांना भीती आता काय होतंय? आणि मग मागच्या ट्रॉम्बे, BARC येथून शत्रूच्या विमानावर गोळाफेक चालू झाली. एकामागोमाग एक, दहा वीस लालबुंद प्रकाशमान बॉम्ब गोळ्यांची माळ शत्रूच्या विमानाचा वेध घ्यायला आकाशात उडू लागली. लोकं बोलायला लागली, बॉम्बकडे पाहू नका, आंधळे व्हाल. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये शत्रूची दोन विमाने पाडल्याची छायाचित्रे छापून आली होती.

Monday 8 May 2017

लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.


          लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं. आता नवीन नवीन कॉम्प्लेक्स उभे रहाताना दिसताहेत. डोंबिवली गेलं. आज गाडी धावताना जरा जास्तच झोल मारतेय. असंच एकदा एक मुलगी मोबाईलवर काहीतरी करत गाडीच्या दरवाजात उभी होती. आणि अचानक गाडीने जोरात झोल मारल्याबरोबर तिच्या हातातील मोबाईल निसटून गाडीच्या बाहेर फेकला गेला होता. नशीब ती नाही फेकल्या गेली. डोंबिवली सोडल्यावर पुढे मुंब्र्यापर्यंत ट्रॅकच्या दोन्ही बाजूला आसमंतात खाडीचा एक घाण उग्र वास भरून राहिलेला असतो. बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या एक्सप्रेसचा खडखडाट घुमतोय. नीट निरखून पाहिले असता डब्याचे एक चाक जरा जास्तच खड्खड् करतेय. मुंब्रा कळवा लाईनच्या बाजूने समांतर हायवे जातो. त्याच्यावर कायम ट्राफिक जाम असते. कळवा स्टेशन आलेय. बाजूच्या खिडकीतून कोवळं ऊन आत यायला लागलंय. संध्याकाळी परत येताना मी उन्हाच्या बाजूच्या रांगेत बसत नाही. तिथून कडक ऊन आत येतं. आणि ती बाजू दिवसभर उन्हात तापून निघालेली असते. फार गरम होते त्याबाजूला. कितीतरी स्टेशनवर पंखे बिनकामाचे फिरत असतात. त्यांच्याखाली ते बंद करायला बटनं हवी होती. सकाळी सकाळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या तृतीयपंथीयांचा बऱ्याच स्टेशनवर घोळका दिसतो. कुठून कुठे आणि कसल्या कामावर जातात, कोण जाणे! ठाणे स्टेशनवर एक माणूस कामावर बॅग घेऊन जाताना पाहिला. रिटायर व्हायला आला असेल, पण जरा जास्तच म्हातारा झालेला वाटतोय. अंध आणि अपंगांचा डबा प्लॅटफॉर्मवर जिथे येतो, तिथे वर छताला अंधांना कळण्यासाठी एक सतत 'पीक पीक' आवाज करणारे छोटे स्पीकर लावलेत. त्याचा चोवीस तास येणारा आवाज इतरांची छळवणूक करणारा आहे. त्या स्पीकरजवळच जे कॅन्टीनवाले आहेत, त्यांना त्याचा किती त्रास होत असेल. मुलुंड स्टेशनवर बूट पॉलिशवाला पॉलिशचे सामान काढून जमिनीवर व्यवस्थित रचून ठेवतोय. काही स्टेशनच्या भोवतालच्या जागेत छान बगीचे केलेत. तिथे सुंदर फुले उमललेली दिसताहेत. बऱ्याच स्टेशनवरच्या भिंती शाळा कॉलेजच्या मुलांनी छान छान चित्रे काढून सुशोभित केल्या आहेत. मी बऱ्याचदा ही चित्रे निरखून पहात असतो. पुष्कळशा चित्रांमध्ये सामाजिक संदेश दिलेला दिसतो. काही चित्रांमध्ये त्या त्या स्टेशनच्या परिसरात असलेल्या प्रसिद्ध स्थळांची माहिती दिलेली आढळते. फारच छान उपक्रम आहे हा! भांडुप गेले. माझ्या समोरच्या बाकावरील तिघाजणांची मस्तपैकी ब्रह्मानंदी टाळी लागलीय. त्यापैकी एकाचा घोरल्याचा आवाज येतोय. माझ्या बाजूला बसलेला एकजण जोरजोऱ्यात मद्रासीत कसले तरी मंत्र पुटपुटतोय. एक कॉलेजचा विद्यार्थी पुस्तकावर पिवळ्या मार्करने रेघोट्या ओढतोय. अरे! अरे!  रेघोट्या ओढून ओढून सर्वच पुस्तक रंगवतोय की काय? बाकीचे जे जागे आहेत, ते आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेत. काही वर्षांपूर्वी हीच लोकं पुस्तक नाहीतर पेपरमध्ये डोकं खुपसलेली दिसायची. 

          चला! थोड्यावेळाने माझे उतरायचे स्टेशन येईल. उतरायच्या तयारीत रहायला पाहिजे. नाहीतर लिहिण्यात मी एवढा गुंग होऊन जातो, की बऱ्याच वेळा दोन तीन स्टेशन पुढे जाऊन पोहोचतो. अहो, एकदा तर अशावेळी रिटर्न येताना पुन्हा दोन स्टेशन पुढे (की मागे?) गेलो होतो. हा! हा! हा! बाय! उद्या भेटा! नवीन वाचायला!