Monday 16 January 2017

चला डोकावूया - भाग १. अंध व्यक्तींच्या जीवनात!!!


          काही दिवसांपूर्वी लोकलट्रेनने प्रवास करीत असताना एका स्टेशनवर ५-६ अंधव्यक्ती, गाडी सुटता सुटता माझ्या डब्यात चढले. मी त्यांच्या शेजारीच ऊभा असल्याने मला त्यांचे आपापसातील बोलणे ऐकू येत होते. आपण सर्वसामान्य जेव्हा एकत्र प्रवास करतो, तेव्हा आपल्या बोलण्यात आपल्या पोराबाळांचे, ऑफिसचे, राजकारणाचे वगैरे विषय येत असतात. तर त्या अंधव्यक्तींच्या बोलण्यात कोणते विषय होते? तर कोणता डबा कुठे येतो. डब्यात चढताना पकडायचा मोठा दांडा कुठल्या डब्याचा कुठे असतो. कुठल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म फार वर आहे. कुठला फार खाली आहे. कोणता डबा पुलाच्या अगदी जवळ येतो. म्हणजे घराबाहेर वावरताना ज्या गोष्टी आपल्याला अगदी शुल्लक वाटत असतात, त्याच गोष्टी अंधांना फार अडचणीच्या वाटत असतात. त्यांच्या बोलण्यात नेहमी त्या संबंधीचेच विषय येत असतात. घराबाहेरच्या जगात वावरायचे कसे याचीच चिंता कायम त्यांचे डोके पोखरीत असते. 

          ह्या आलेल्या अनुभवाने मला अंधांच्या जीवनाविषयी, त्यांच्या अडचणींविषयी जाणून घ्यावेसे वाटू लागले. त्याकरीता मी बरेचसे वाचन केले. आणि जे काही वाचले, समजले ते तूम्हालाही सांगावेसे वाटतेय. म्हणून हा लेखन प्रपंच.

          अंध व्यक्तींची दोन प्रकारात वर्गवारी करता येईल. १. पूर्णतः अंध व्यक्ती - हे अंधार व प्रकाश यातला फरक ओळखू शकत नाहीत. यांना एका अंधाऱ्या खोलीत बसवले आणि तेथील दिवा लावला तरी त्यांना प्रकाशाची थोडीसुद्धा जाणीव होत नाही. २. अंशतः अंध व्यक्ती - डोळ्याला एखादी इजा झाल्यामुळे किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रमाणात अंध झालेल्या व्यक्ती. यांना दिसण्याची टक्केवारी प्रत्येक व्यक्तीनुसार कमीजास्त असू शकते.

          एक आकडेवारी सांगते कि संपूर्ण जगात असलेल्या ३.७ कोटी अंधांपैकी १.५ कोटी अंध एकट्या भारतातच आहेत. आणि योग्य उपचार मिळाले असते तर त्यापैकी ७५ टक्के रुग्ण अंध होण्यापासून टाळता आले असते. भारताला दरवर्षी २.५ लाख नेत्रदान केलेल्या डोळ्यांची आवश्यकता भासते. पण भारतात असलेल्या १०९ नेत्रपेढींमधून दरवर्षी फक्त २५ हजारच नेत्र जमा केले जातात. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांपैकी ३० टक्के नेत्र हे विविध कारणांमुळे वापरता येत नाहीत.

          बहुतेकांना प्रश्न पडतो कि जन्मतः पूर्ण अंधव्यक्तींना काय दिसते? काहीच दिसत नाही. साधा अंधारही दिसत नाही. त्यांना अंधार, प्रकाश, काळापांढरा रंग म्हणजे काय हेच माहित नसते. त्यांना फक्त एक लांबच लांब निर्वात पोकळी दिसत असते. काहींना डोळे चोळल्यावर दिसतात तशा चांदण्या दिसतात.

          अंधव्यक्ती आपल्या स्वप्नात काय बघतात? एक म्हण आहे. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे'. आपण रोजच्या जीवनात जी दृश्ये बघतो, त्यांना आपला मेंदू वेगवेगळ्या स्वप्नाच्या रुपाने आपणांस पुन्हा दाखवत असतो. पण मग एखादा जन्मतः अंध असेल आणि त्याने डोळ्याने कुठलेच दृश्य कधीही पाहिलेच नसेल, काय आणि कसे दिसते याचे त्याच्या मेंदूने कधी अवलोकनच केले नसेल तर त्याला स्वप्नेही कशी पडणार? पण ज्याला साधारणतः वयाच्या ५-७ व्या वर्षांनंतर अंधत्व आलेले असेल, त्याने जग म्हणजे काय हे पाहिलेले असते. त्याला स्वप्ने पडू शकतात.

        अंधव्यक्ती पापण्यांची उघडमीट करतात का? ज्यांना आपल्यासारखी बुब्बुळं आहेत ते आपल्या पापण्यांची उघडमीट करतात. पण ज्यांना डोळ्यांच्या ठिकाणी फक्त खाचा आहेत त्या अंधव्यक्तींना पापण्यांची उघडमीट करता येत नाही.

          अंधव्यक्तींच्या मूलभूत गरजांकडे समाजाचे एक नागरिक म्हणून दुर्लक्ष करणे आणि त्यांना आपल्यासारखेच एक सामान्यव्यक्ती म्हणून समाजाने न स्वीकारणे हे फक्त भारतातच नाही तर अगदी जागतिक स्तरावरसुद्धा दिसून येते. 

          अंधव्यक्तींना घराबाहेर लोकांच्या गर्दीत वावरायला सहज सोपे पडतील अशा मूलभूत सुविधा उभारण्यात सरकारी खात्यांत बऱ्याचदा अनास्था दिसून येते. अंधांकरिता असलेल्या विविध सरकारी योजनांच्या माहितीबाबत स्वतः अंधांच्यातच अज्ञान असते.

          शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक वाचनालयांमध्ये ब्रेललिपीतील पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. सर्व सोयींनी युक्त अशा अंधशाळांची कमतरता असते. शाळा कॉलेजातील अभ्यासक्रम बनवताना अंधही सहजरीत्या शिकू शकतील याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होते आणि ते शिकवताना पुरेसे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसल्याने अंधांचे मूलभूत अधिकार डावलले जातात. अंधांमधील असणाऱ्या शारीरिक कमतरतेमुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने साहजिकच बेरोजगारीचे प्रमाणही त्यांच्यात जास्त आहे.

          भारतातील बऱ्याचशा मागासलेल्या भागात एखादी व्यक्ती अंध असणे हे त्याचे पूर्वजन्मीचे पाप समजून त्याला सामाजिक त्रासही दिला जातो. लहान खेडेगावात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आणि लोकांना डोळ्यांना होणाऱ्या आजारांची माहिती नसल्याने, तसेच त्यांनी आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंध झालेल्यांचे प्रमाणही वाढत असते.

          अंधत्वामुळे ते समाजामध्ये जास्त मिसळू शकत नसल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. ते स्वतःच्या नजरेतून उतरतात. काहीवेळा लोकं अंधांच्या समोरच त्यांच्या अंध असण्याविषयी चर्चा करतात. त्यांच्या मनाचा जरासुद्धा विचार करीत नाहीत. काही निपुत्रिक अंधांना ते बाळाची योग्य काळजी घेऊ शकणार नाहीत या शंकेने काही देशांत त्यांना मुल दत्तक देणे नाकारले जाते. अंधांवर आपण फार मोठे उपकारच करीत आहोत अशा भावनेतून त्यांना रोजगार दिला जातो, शिवाय त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही न देऊन त्यांची पिळवणूकही केली जाते.

          अंधव्यक्ती सामान्य लोकांसारखे मैदानी खेळ, व्यायामाचे काही प्रकार करू शकत नाहीत. त्यांच्या शारीरिक हालचाली एकदम मंद असतात. त्यामुळे साहजिकच त्यांची पचनसंस्था मंद झाल्याने त्यांना शारीरिक तक्रारी जास्त प्रमाणात जाणवत असतात. सर्वसामान्यांचं रोजचं २४ तासांचं जीवनचक्र घड्याळ्याबरोबर पळत असते. त्याप्रमाणेच त्यांना तहान, भूक, झोप लागत असते. पण अंधांना वेळेची तितकीशी जाणीव नसल्याने त्यांचे रोजचे जीवनचक्र कधी २० तासांचे तर कधी २८ तासांचे असू शकते. त्यामुळे अंधव्यक्ती आपणांस अवेळी झोपताना, जेवताना दिसू शकतात. ह्यामुळे त्यांना समाजाच्या धावपळीबरोबर जुळवून घेताना किती अडचण येत असेल याची तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता.

          सध्याच्या काळात मोबाईलफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. तूर्त तरी ज्यांना मोबाइलची स्क्रीन बघता येते, अशा लोकांकरीताच मोबाईलफोन बनविला जातो. आयफोन सोडल्यास कोणत्याही कंपनीच्या गावीही नाही कि आपला फोन अंधांनाही वापरता येऊ शकेल असा बनवावा.

         पण सध्या अंधांकरीता फार आशावादी चित्र दिसते आहे. अंधांकरीता सरकारी नोकऱ्यांमध्ये, सार्वजनिक प्रवासांच्या वाहनांमध्ये आरक्षण ठेवले जाते. प्रवासभांड्यामध्ये त्यांना सवलत दिली जाते. आज काही अंध upsc, mpsc पास होऊन सरकारी अधिकारीही झालेले दिसताहेत. अंधशाळांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढते आहे. फक्त अंधांसाठी असलेल्या काही निवासी सेवाभावी संस्थांमध्ये त्यांच्या रहाण्या खाण्यासहित शिशुवर्ग ते आठवीपर्यंत शिक्षणाची मोफत सोय होत आहे. तेथे त्यांना गायन, वादन, मल्लखांब, शारीरिक कसरत करण्याकरिता प्रोत्साहित केले जाते. तेथे फक्त अंधांकरिता खेळांच्या स्पर्धांही घेण्यात येतात. त्यांना काही स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते. 

          अंधांचे जीवन सुखकर होण्याकरिता आज माहितीतंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. कॉम्पुटरच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशनच्या मदतीने अंधव्यक्ती आता लिहू, वाचू आणि शिकूही शकतायत. कॉम्पुटर प्रोग्रामर बनून नोकऱ्याही पटकावताहेत. टायपिंग करून विंडोजचे वर्ड आणि एक्सेल वापरतायत. खास ब्रेल लिपीचे प्रिंटर वापरून पुस्तकेही लिहिताहेत.

         एखाद्याच्या आयुष्यात अंधत्व येणे हे खरोखरीच दुर्दैवी आहे. पण अंधांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोण आता हळूहळू बदलतोय. सरकार, समाजसेवी संस्था आणि समाजही त्यांना विश्वास देऊ पाहतोय कि चिंता करू नका. तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आता आमचीही आहे. तुमचे जीवन सुखकर करण्याकरिता आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर असणार आहोत.

Friday 13 January 2017

आणि मी 'अंकल'चे प्रमोशन गुपचूप स्वीकारले.


                 तो दिवस मला अजून आठवतोय जेव्हा मला 'अंकल'चे प्रमोशन मिळाले होते. मी २४-२५ वर्षांचा असतेवेळी एकदा एका केमिस्टच्या दुकानात औषधे घ्यायला गेलो होतो. काउंटरवर एक १६-१७ वर्षाचा मुलगा उभा होता. पैसे परत देताना तो मला "अंकल, यह ले लो आपका पैसा" असं म्हणाला. त्यावर त्याने 'अंकल' म्हटल्याचा मला इतका भयंकर राग आला कि मी त्याच्यावर जोरात खेकसलो. "क्या मैं तुझे अंकल दिखता हूँ क्या?" वास्तविक तोपर्यंत मला कोणीही 'अंकल' म्हटले नव्हते. मला वाटलं तो मुद्दामहून माझी टिंगल करण्याकरीताच मला 'अंकल' म्हणतोय. तो एवढा भेदरला होता कि नाही!! पण थोड्याच दिवसांत सगळेच मला 'अंकल' म्हणू लागले. आणि मग मला जाणवले कि मी आता खरोखरच 'अंकल' दिसायला लागलोय. तो मुलगा मला 'अंकल' म्हणाला होता ते बरोबरच होते. मी उगाच त्याच्यावर रागावलो होतो. आणि मी 'अंकल'चे प्रमोशन गुपचूप स्वीकारले. न स्वीकारून करतो काय?

Tuesday 3 January 2017

आणि त्याने माझा पोपट केला होता कि हो!


          बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा रेल्वेच्या प्रवासाची तिकिटे काढण्याचे संगणकीकरण झाले नव्हते. बाहेरगांवच्या प्रवासाची अनारक्षित तिकिटे हि तिकीटखिडकीवरच रांग लावून मिळत.

          असेच एकदा मला कामानिमित्त पुण्यास जावयाचे होते. काही कारणाने अगदी गाडी येण्याची वेळ होता होता मी स्टेशनवर पोहोचलो. बघतो तर काय!!? तिकीटखिडकीवर हि भली मोठ्ठी रांग! तिकिटे काढायला लोकांची ढकलाढकली चाललेली. आरडाओरडा चालू होता. काही लोकं रांग मोडून पुढे घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याशी इतर लोक वाद घालत होते. त्यात भर म्हणजे गर्दीचे नियंत्रण करायला दंडुकावाले पोलीसमामापण नव्हते. आता मला तिकिटे काढून गाडी पकडता येईल कि नाही, याचीच चिंता सतवायला लागली. तरी दैवावर हवाला ठेऊन तिकिटे काढायला मी रांगेच्या शेवटी जाऊन उभा राहिलो.

          हळूहळू रांग पुढे सरकत होती तसतशी माझ्या मनाची चलबिचल वाढत होती. तिकिटे काढणारी आता फक्त तीन चारच लोकं माझ्या पुढे राहिली होती. त्यांचे तिकीट काढून झाले कि आता माझाच नंबर होता. तेव्हढ्यात एक बावीस तेवीस वर्षांचा तरुण माझ्याजवळ आला. आणि मला गयावया करून म्हणू लागला "मला तळेगावला जायचे आहे. बरोबर माझी म्हातारी आई आणि लहान भाऊ आहे. आईची तब्येत बरोबर नाही. फारच आजारी आहे. आजच तिची तळेगावमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट आहे. रांगेत तर एवढी गर्दी आहे कि लवकर तिकीट मिळणे मुश्किल दिसते आहे. आता येणारी गाडी चुकली आणि जरका आम्हाला हॉस्पिटलला जाता आलं नाही तर आईची तब्येत अजून बिघडू शकते. कृपा करून आपण माझी तळेगावची तीन तिकिटे काढून द्याल का?" आधीच माझा भिडस्त स्वभाव आणि त्यात माझ्या संसाराची नवीनच सुरवात झालेली. त्यामुळे मला जगाचा अनुभव शून्यच होता. मी दया येऊन त्याला त्वरित होकार दिला. त्याने तीन तिकिटांचे पैसे माझ्या हातात दिले आणि दूर कोपऱ्यात जाऊन उभा राहिला.

          रांग मुंगीच्या गतीने सरकत होती आणि गोंधळ दुप्पट वाढलेला होता. तेवढ्यात मागे कोणीतरी रांगेत घुसण्याचा प्रयत्न करू लागला. त्याबरोबर रांगेत उभ्या असणाऱ्या इतर लोकांनी त्याच्यावर जोरजोरात आरडाओरडा करायला सुरवात केली. तेवढ्यात कुठून कसे काय कोण जाणे, पोलिसमामा आपला दंडुका आपटत हजर झाले. त्यांनी रांगेत पुढे घुसू पहाणाऱ्या त्या व्यक्तीचे बखोट धरून त्याला बाहेर ओढून काढले. सर्वांना दमात घेऊन रांग सरळ केली. आणि सगळ्यांना तंबी दिली कि कोणीही रांगेत पुढे घुसायचे नाही. तेवढ्यात रांगेत माझ्या मागे उभ्या असलेल्या दोन चार लोकांनी पोलिसमामांकडे माझी तक्रार केली कि बघा! बघा हो साहेब! ह्यांनीपण आत्ता आलेल्या त्या तरुणाकडून तिकिटे काढून देण्याकरिता पैसे घेतलेत. झाले! पोलिसमामा माझ्याकडे आले. त्यांनी माझे बखोट धरले. आणि "दुसर्यांची तिकिटे काढून देतोस काय? चल तूसुद्धा रांगेच्या बाहेर हो!" असे म्हणत मलाही ओढून रांगेच्या बाहेर काढले. मी गुपचूप रांगेच्या बाहेर पडलो. कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या तरुणाला त्याच्या तिकिटांचे पैसे त्याला परत देऊन म्हणालो. "माफ कर मित्रा, मी तुझे तिकीट काढू शकलो नाही" त्यावर "ठीक आहे, बघतो काय करायचे ते!" असं म्हणून तो तरुण निघून गेला.

          आता मला तर तिकीट काढायचेच होते म्हणून मी पुन्हा रांगेच्या शेवटी जाऊन उभा राहिलो. ह्यावेळी नशिबाने रांग लवकर पुढे सरकली आणि गाडी यायला अवघे पाच मिनिटे शिल्लक असताना माझ्या हातात तिकीट पडले. मी पुलावरून धावत पळत धापा टाकत प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. आता गाडी येण्याची उद्घोषणा होत होती. मी सहप्रवाशांचे निरीक्षण करू लागलो आणि माझ्या नजरेस ते दृश्य पडले. मला तळेगावची तिकिटे काढून मागणारा मघाचाच तो तरुण आणि त्याच्यासारखाच दिसणारा कदाचित त्याचा लहान भाऊ प्लॅटफॉर्मवरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरून काही खायला प्यायला घेत होते. पण त्यांच्या शेजारी त्यांची आजारी, म्हातारी आई मला काही दिसेना. तेवढयात त्या तरुणाने स्टॉलवरून खरेदी केलेला कसला तरी एक पुडा पलीकडे उभ्या असलेल्या एका तरुण स्त्रीच्या हाती नेऊन दिला. तिने तो आपल्याजवळील पिशवीत ठेवला. त्यांच्या एकंदर अभिर्भावावरून ते दोघं आपसात पतीपत्नी असल्याचं स्पष्टपणे प्रतीत होत होतं.

          अरे देवा! म्हणजे त्या तरुणाने मघाशी आपल्या आजारी, म्हाताऱ्या आईविषयी जे काही सांगितले होते ते सर्व काही खोटे होते तर! माझी त्याने काकुळतीला येऊन विनंती केली, ती फक्त मला त्याची दया वाटून त्याला तिकीट काढून द्यावे म्हणून! मोठी रांग लावण्याचा त्याचा त्रास वाचावा म्हणून! दुसरी गोष्ट म्हणजे तो माझ्या अगोदर येऊन गाडीत चढतोय म्हणजेच त्याच्याकडे प्रवासाची तिकिटेही असावीत. मग त्याला माझ्या अगोदर तिकिटे कशी काय मिळाली? याचा अर्थ पोलीसमामाने मला रांगेतून बाहेर काढल्यावर, त्याने पुन्हा दुसऱ्या कोणाला तरी आपल्या म्हाताऱ्या आजारी आईचं कारण सांगून, त्याच्याकडून तिकिटे काढून घेतली असावीत. आणि माझ्या अगोदर प्लॅटफॉर्मवर येऊन गाडीची वाट बघत होता. अरेरे! त्याने माझा पोपट केला होता कि हो!