Sunday 10 December 2017

Making of photo and status : १०. अंतिम भाग (समारोप)

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://sachinkale763.blogspot.in/2017/11/making-of-photo-and-status.html


समारोपाचे मनोगत :
काही अपरिहार्य कारणास्तव (कोणतेही कारण न सांगण्याकरिता हे एक चांगले कारण असते, नाही!!!? हा! हा!! हा!!) माझी ही मालिका मी थांबवत आहे. तरी मी असे करण्याचे कारण सांगतो. गेले दहा आठवडे म्हणजे अडीच महिने मी ही मालिका चालवत असताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, की दर रविवारी मी मालिकेचा नवीन भाग प्रसिद्ध करतो. रविवार ते मंगळवार, बुधवार प्रतिक्रियांना उत्तरे देण्यात जातात. गुरुवार ते शनिवार पुन्हा नवीन भाग लिहितो. आणि रविवारी तो प्रसिद्ध करतो. गेले अडीच महिने हे असेच चक्र चालू आहे. त्यामुळे होतंय काय, की एकाच प्रकारच्या लिखाणात मी अडकून पडलोय. माझे इतर लिखाण आणि वैयक्तिक वाचन बंद झालेय. जरका मी अजून पुढील दहा भाग लिहिले तर पुन्हा पुढील अडीच महिने त्या चक्रात अडकून पडण्याची निश्चिंती झाली. आणि हे लेखक म्हणून मला नक्कीच परवडणारे नाही. लेखकाने नेहमी चौफेर लिखाण करावे या गोष्टीला माझ्या स्वतःकडूनच बाधा येत आहे.

आणि म्हणूनच खालील ११ फोटो आणि त्यांचे स्टेटस एकत्रच प्रसिद्ध करून माझ्या ह्या मालिकेला मी आज पूर्णविराम देत आहे. खालील फोटो आणि स्टेट्सना मी मेकिंग लिहिले नाही, याकरिता आपण नाराज व्हाल याची मला कल्पना आहे. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. नऊ मेकिंगसहित वीस फोटो आणि त्यांचे स्टेटस अशा या मालिकेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, माझ्या कार्याचे कौतुक केलेत, एका नवीन प्रयोगाला पाठिंबा दिलात, याकरिता मी आपणां सर्वांचा आभारी आहे.

माझ्या एका वैयक्तिक ग्रुपवर चर्चा करताना मला making of photo and status ची कल्पना सुचली. आणि आपण ती उचलून धरली याचा मला फार आनंद आहे. दर आठवड्याला एक मेकिंग लिहिणे आणि रविवार सकाळची बरोबर नऊची वेळ पाळून ते प्रसिद्ध करणे हे कार्य माझ्याकरीता खरोखरच आव्हानात्मक होते, जे पूर्ण करताना मला फार आनंद मिळाला. पुष्कळ काही शिकायला मिळाले. वैयक्तिक अडचणींवर मात करून, Dead line पाळून आणि लेखाची गुणवत्ता सांभाळून लिखाण कसे करावे, याचा मला चांगलाच सराव झाला. याचे संपूर्ण श्रेय मी आपणां सर्वांना देतो. महिन्यातून एखादा लेख लिहिणाऱ्या मला, लागोपाठ नऊ रविवार लेख लिहिता येण्यामागे आपण दिलेल्या प्रोत्साहनाचाच मोठा सहभाग आहे. त्याकरिता आपले पुन्हा एकदा आभार!

यापुढील माझ्या लिखाणालाही आपले असेच प्रेम, आशीर्वाद आणि आश्रय मिळेल याची मला खात्री आहे.
कळावे, लोभ असावा ही विनंती.

--- सचिन काळे.

१) भाजीवाली.

हियां तो हम बहुत खुस हैं। ऐसन लागत है के हम अपन के खेत मांही बैठें है। हां! तरकारी के खेत मां। और बतावा, गईयान को कोई बछडा वछडा होई के नाही?

२) फुलपाखरू.

फुलपाखरु म्हणे, सोडवेना मज साथ ह्या सुंदर हातांची, स्पर्शुनी येतसे आठवण माझ्या प्रियतमेची !!!!

३) पपई.

पपई नांव आहे माझं. पण मला पालक भारी आवडतो. I am a sailor man. माझ्या हाताची बेंडकुळी पाहिलीत का ? एक ठोसा लगावला ना तर समोरचा थेट ढगात जातो.

४) घोडा.

छान झालं, माझ्या मालकाचं तंगडं मोडलं ते! ढोल्या कुठचा! जणू गव्हाचं पोतंच कि हो! आता काही दिवस फुकटच्या रपेटीतून माझी सुटका! हिं हिं हिं हिं !!!

५) मछली.
खालील स्टेटस मी सहज गंमत म्हणून लिहिलं होतं. whatsapp करिता नव्हतं. त्यामुळे ते जरासं मोठं झालेलं दिसेल.

1- ए शेंबड्या !!! हो बाजुला, नाहीतर मला स्वाईन फ्लूचा प्रसाद देशील.
2- हे राम !!! फक्त एका फोटोकरता, नाही त्या गोष्टीचा मला मुका घ्यावा लागतोय.
3- ए भवाने !!! पडून रहा की गुमान. कशापायी वळवळतेय, गुदगुल्या होतायत् ना मला.
4- कधीचा XXणाला चावतोय मेला !!!

६) डोळा.

काय भौ? ठिक हाए ना? का म्हून माझ्या डोळ्यात बघतायसा? लई आवडल्याले दिसत्यात. हाइतच झ्याक ! आमची मिशेस तर लई जीव टाकते बघा माझ्या डोळ्यांवर.

७) ताट.

मटकीच्या ऊसळीचा रस्सा, नुकत्याच तव्यावरुन काढलेल्या चपात्या, पापड आणि कैरीचं लोणचं असा जेवणाचा खासा बेत. वाह्! स्वर्ग! स्वर्ग! म्हणतात तो हाच.

८) माय क्रश.

मोटरसायकलवाल्या आज्जीबाई !!!..... My Crush !!!...... Please, don't tell anybody, हां !!!...... It's my dammmmn secret !!!.....

९) कामवालीबाई.

बघा बाईजी, सक्काळच्या वखताला तुमची खिटपिट नाय पायजेल. म्या सांगतो, जमतंय तर ठेवा, नायतर आत्ताच्याला माझा हिसाब चुकता करून टाका. बात फिनीस्!

१०) अवतार.

"नको ! नको !! नको ना काढू माझा फोटो !!! माझा अवतार काही बरोबर नाहिए."..... मी आपला प्रेमाने फोटो काढायला गेलो तर सौ.ने माझा असा पोपट केला.

११) स्टाईल.



असं करायचं नाही बाळा. स्टाईल मारायची होती तर दुसरं कोणतंही झाड पकडायचं. बिचार्या जोडप्यांना त्रास दिलास. त्यांचं आपलं चाललं होतं, गुलुगुलु.

(समाप्त)

--- सचिन काळे.



Sunday 3 December 2017

Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.




येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी. पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!

Making of photo and status :
वरच्या फोटोत काय दिसतंय ते पहा बरं!!? त्यात एक जोडपं दिसतंय ना? त्यांच्या गळ्यात असलेल्या हारावरून आणि एकंदर पेहरावावरून त्यांचं नुकतंच लग्न झालेलं वाटतंय ना? जोडपं जरा गावकडचं असावं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे अभिर्भाव तर किती मजेदार दिसतायत नाही!!? डोक्यावर पदर घेतलेली नवरी कित्ती नाजूक साजूक वाटतेय. तिचे टपोरे डोळे नववधूसारखे बावरलेले वाटतायत. ओठांचा केलेला चंबु तर खासच दिसतोय. आणि चेहऱ्यावर रुळणार्या बटेने तर नागिणीसारखे वेटोळे घेतलेत. तसेच डोक्याला मुंडासे बांधलेल्या नवरदेवाच्या जाड भुवया, सुपासारखे कान, आणि फुगीर नाक त्याच्यातील राकटपणा दर्शवितोय.

हा फोटो पाहून मला असं वाटलं, की नुकतेच लग्न झालेले त्यातील नवरा नवरी हनिमूनला जाताना कोणाचातरी निरोप घ्यायला दोन क्षण थांबलेत. बस्! मी ठरवलं की आपण ह्या त्यांच्या निरोप घेण्याच्या प्रसंगावरचंच स्टेटस लिहावं. दोघेही गावाकडचे वाटत असल्यामुळे स्टेटसची भाषा मी मुद्दाम गावरान निवडली आणि स्टेट्सच्या सुरवातीलाच पहिलं वाक्य लिहिलं "येऊ का आता?" आपण निरोप घेताना म्हणतो ना अगदी तसं! पुढे लिहिलं "लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी." या वाक्यावरून वाचकांना मी कन्फर्म करून दिलं, की या जोडप्याचं नुकतंच लग्न झालंय आणि ते खंडाळ्याला हनिमूनला जायला निघताना आपला निरोप घ्यायला थांबलेत.

आता मी त्या जोडप्यांकरिता 'खंडाळा' हेच हनिमूनचं ठिकाण का निवडलं असावं? कारण मला स्टेटसमध्ये जराशी गंमत आणायची होती. खंडाळा म्हटलं तर आपल्याला काय आठवतं बरं? अगदी बरोब्बर!! आपल्याला 'आमिर खान'चं तुफान गाजलेलं 'आती क्या खंडाला?' हे गाणं आठवतं. बस् ! मी त्या गाण्याचा आणि आपल्या स्टेटसचा संबंध लावून टाकला. आणि नवरदेवाच्या तोंडी उपहासाने एक वाक्य टाकून दिले, की "पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!" म्हणजे पहा! नवरदेव किती खोडकर आहे ते!! त्यालाही माहितेय ते आमिर खानचं गाणं आणि त्यातील गंमत.

इथे झालं की मग आपलं फोटोवरून स्टेटस तयार! फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश लिहिलेले नसतानाही मी त्या फोटोला अजूनच मजेदार करून टाकलं. प्रत्येकाचा एकाच गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. तुम्हीही तुमची कल्पनाशक्ती वापरून ह्याच फोटोवर एक संपुर्ण वेगळं स्टेटस लिहू शकता. बघा बरं प्रयत्न करून. पण ते मला कळवायला विसरू नका हं!

Sunday 26 November 2017

टकाटक!



गेल्या रविवारी आपल्या लब्बाड 'गोलुमोलु'वर मी लिहिलेला लेख वाचल्याचे तुम्हाला आठवत असेलच. मज्जा आली ना वाचायला!? बऱ्याच वाचकांनी लेख आवडल्याचे मला कळविलेसुद्धा आहे. त्याकरिता मी सर्वांचा आभारी आहे.

सदर लेखात मी 'टकाटक' हा शब्द वापरला होता. बऱ्याच वाचकांना तो शब्द फारच आवडला. फारच गंमत वाटली त्यांना तो शब्द वाचताना. कित्येकांनी तर प्रतिसाद देताना फक्त 'टकाटक' हाच एक शब्द लिहून आणि पुढे 'खो! खो!' हसण्याची स्मायली टाकून मला पाठविले होते. ज्या लोकांना तो शब्द समजला आणि ज्यांना नाही समजला, त्यांनाही ह्या 'टकाटक' शब्दाची मजा लुटताना काहीच अडचण आली नाही. उलट मला खात्री आहे, की बऱ्याच वाचकांनी आता आपल्या बोलण्यात 'टकाटक' हा शब्द वापरायला सुरवात सुद्धा केली असेल. हा! हा!! हा!!

एका मराठी संकेतस्थळावरसुद्धा आपल्या 'गोलुमोलु'चा लेख मी प्रसिद्ध केला होता. काल तेथील एका वाचकाने मला प्रश्न केला, की हा 'टकाटक' शब्द काय आहे? मी तर पहिल्यांदाच ऐकला हा शब्द!! त्यांच्या शंकेवर लिहिलेले स्पष्टीकरण मी जसेच्या तसे खाली देत आहे.

मी तर पहिल्यांदाच ऐकला हा शब्द. >>> काय म्हणता!!!!??? आमच्याकडे तर नेहमीच म्हणतात बुवा!!
'टकाटक' हा बहुउपयोगी शब्द आहे. त्याला आपण कसाही आणि कुठेही वापरू शकतो. कसा वापरायचा त्याची एकदोन उदाहरणे मी तुम्हाला सांगतो.

१) त्या गवंड्याचं काम एकदम 'टकाटक' असतं बरं!! (तो गवंडी उत्कृष्ट काम करतो)

२) साडीमध्ये आज काय मस्तं दिसत होती रे ती, एकदम 'टकाटक'!! (साडीमध्ये ती आज फार सुंदर दिसत होती.)

३) त्याने गाडी काय मेंटेन केली आहे बाप!! एकदम 'टकाटक'!!! (त्याने गाडी एकदम कंडिशनमध्ये ठेवलीय)

समजलं ना कसं!!? तुम्हीही 'टकाटक' हा शब्द वापरत जा बरं! फार मज्जा वाटेल बघा बोलताना. आणि आपल्याला काय सांगायचंय ना, ते समोरच्याला ह्या एका शब्दात बरोब्बर समजतं. त्याला जास्त काही सांगायची गरजच पडत नाही.

तर वाचकहो! असा आहे 'टकाटक' शब्दाचा महिमा. मग बोलताना वापरणार ना हा शब्द? बिनधास्त वापरा आणि त्यातून किती आनंद मिळतो पहा. पण मला आपला अनुभव कळवायला विसरू नका बरं!

Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.




'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी. 
वाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी' 
आपल्या मनीचे हितगुज आपल्या बापाला सांगू पहाताना एक तरुणी.


Making of photo and status :
मी एकदा माझ्या पत्नी आणि मुलीला घेऊन अलिबाग येथे सहलीला गेलो होतो. समुद्रकिनारी वसलेले अलिबाग हे खरोखरीच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथे सुंदर सुंदर समुद्रकिनारे, नारळीपोफळीच्या बागा आणि खाण्यापिण्याची रेलचेल आहे. तीन दिवस आम्ही हिंडलो फिरलो, भरपूर मजा केली.

आम्ही खास एक दिवस समुद्रस्नानाकरिता राखून ठेवला होता. त्याप्रमाणे सकाळी हॉटेलवर दाबून नाष्टा केला आणि स्विमिंग कॉश्च्युम घालून समुद्रावर पोहोचलो. ऑड डे असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर अगदी तुरळक गर्दी होती. पाच सहाच कुटुंबे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होती. आमचे त्रिकोणी कुटुंब आहे. मुलीला भाऊ बहीण नसल्याने बिचारी एकटीच तिच्यापरीने सहलीचा आनंद ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करीत होती.

बराच वेळ समुद्राच्या पाण्यात खेळून झाल्यावर मी आणि सौ. किनाऱ्याच्या वाळूवर पहुडलो होतो. आमच्या बाजूलाच मुलगी तिथेच सापडलेल्या एका काठीने ओल्या वाळूवर रेघोट्या ओढीत होती. मला उत्सुकता वाटली की ती वाळूवर काय लिहितेय ते पहावे. मी जवळ जाऊन पाहिले तर तिचे वाळूवर उभ्या आडव्या रेघोट्या मारणे चालू होते. मी सहजच तिचा एक फोटो काढून घेतला.

काही दिवसांनी मी आमच्या अलिबागच्या सहलीचे फोटो पहात असताना हाच फोटो माझ्या पहाण्यात आला. आणि माझ्या मनात कुठेतरी क्लिक झालं. मला वाटलं की ह्या फोटोवर काहीतरी स्टेटस लिहावं. मी विचार करू लागलो. आणि मला एक कविकल्पना सुचली. मी कल्पना केली, की एका लग्नाच्या वयाला आलेल्या मुलीच्या बापाला तिच्याकरिता सुयोग्य वर शोधायचाय. त्यापूर्वी तो मुलीच्या हृदयात कोणी राजकुमार भरलाय का याची तिच्याकडे चौकशी करतो. पण मुलगी स्त्रीसुलभ लज्जेने आपल्या मनातले बापाला सांगू शकत नाही. म्हणून ती समुद्रकिनाऱ्यावरल्या ओल्या वाळूवर रेघोट्या ओढून आपल्या बापाला सांगू पहाते. आणि बाप ते जाणण्याचा प्रयत्न करतो. यावरून मला कवितेच्या पुढील ओळी स्फुरल्या. 
'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी. 
वाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी'...........

Making of photo and status : ७. गोलुमोलू

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.



काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!

Making of photo and status : 
कार्टून चित्रांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेल्या चित्रांपैकी हे एक आहे. पहाताक्षणीच ह्या रांगणाऱ्या बाळाच्या मी प्रेमात पडलो होतो. बघा ना, आपल्याकडे पाहून कित्ती गोड हसतंय ते. त्याचं स्माईल बघा कसं ह्या कानापासून त्या कानापर्यंत पसरलंय. त्याच्या वाटोळ्या टकलावर उभा असलेला एकुलता एक कुरळा केस पाहिलात का? cute ना!! अगदी जवळ जवळ आलेले इवलेसे त्याचे दोन डोळे आणि भुवया किती खट्याळपणाचा भाव दर्शविताहेत. आणि  छोटुकले कान तर त्याच्या गोलमटोल चेहऱ्यावर अगदी शोभून दिसताहेत. चित्रात अगदी त्याच्या कंबरेला बांधलेल्या लंगोटीची गाठसुद्धा दिसून येतेय. त्याचा गोल चेहरा आणि गुबगुबीत हातपाय पाहून मी त्याचे नांव काय ठेवलंय माहितेय का? गोलुमोलू! हा! हा!! हा!!

हा खट्याळ आणि गुबगुबीत गोलुमोलू मला एवढा आवडला की मला त्याच्यावर काहीतरी स्टेटस लिहावेसे वाटू लागले. गोलुमोलुकडे पाहिल्यावर असं वाटतंय की तो आपल्याशी काहीतरी बोलू पहातोय. हो की नाही!!!? आणि म्हणून मी त्याने आपल्याशी साधलेल्या संवादाचेच स्टेटस लिहायचे ठरवले. 

माझ्या मनात विचार आला की आपण गोलुमोलुच्या तोंडी मोठ्याव्यक्तींच्या बोलण्याचा टच देऊन पाहिला तर किती मज्जा येईल!! आता पहा! गोलुमोलु आपल्याकडे पहातोय, आपण सुद्धा त्याच्याकडे पहातोय, त्याबरोबर आपले आपसात पहिले बोलणे काय असेल? बरोबर!! आपण एकमेकांना अभिवादन करू. होय ना!!? इथे तर गोलुमोलुच पुढाकार घेऊन विचारतो, "काय कसं काय ठिक आहे ना ? " हा! हा!! हा!! 

आता गोलुमोलू पुढे काय म्हणतोय पहा! "येता का सोबतीला?" गोलुमोलु आपल्याला सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि ते पण कसं? तर "जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत" आपल्या गोलुमोलुला चालता येत नाही, म्हणून तो म्हणतोय, जाऊ सावकाश रांगत रांगत." आणि ते पण कसं? तर जोडीनं!! म्हणजे तो आपल्यालाही जोडीनं नाक्यापर्यंत रांगत रांगत सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि नाक्यावर जाऊन आणायचं काय? तर दूध!! गोलुमोलुचं फेवरेट!! वर आपल्यालाच तो सांगतोय, "टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!" बघा ना! आपला गोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय.
        
तर असा आहे आपला लब्बाsssड गोलुमोलु. आवडला ना तुम्हाला? मग!!?.... जाताय ना गोलुमोलुच्या सोबतीने रांगत रांगत जोडीनं नाक्यापर्यंत? दूध आणायला हो!!! टकाटक!! हा! हा!! हा!!

Making of photo and status : ६. च्यामारी !!!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.




च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला ?

Disclaimer : सदर लेखामध्ये 'मॉर्डनआर्ट' कलेला कोणत्याही तऱ्हेनं कमी लेखण्याचे लेखकाचे प्रयोजन नाही.

Making of photo and status :
हा! हा!! हा!! ! नेटवर सर्फिंग करत असताना अचानक माझ्या नजरेस हे चित्र पडले. आणि मला खुद्कन हसू आले. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात येणारे विचार, आपली होणारी प्रतिक्रिया किती सुंदर तऱ्हेने ह्या चित्रात रेखाटलेय. जरा बारकाईने चित्रातल्या व्यक्तीकडे पहा बरं!, त्याने कसा हनुवटीवर हात ठेवलाय. त्या हाताला आधार द्यायला दुसरा हात पोटावर कसा आडवा ठेवलाय. त्याचे डोळे कसे गरगरल्यासारखे दिसताहेत. भुवया उंचावल्याहेत. आणि चित्र बघता बघता कसा तो उभ्याने मागच्या बाजूला इतका झुकलाय की आत्ता मागे पडेल की काय असं वाटतंय.

पण कशाने झालीय त्याची ही दारुण अवस्था? तर समोरच्या भिंतीवरील चित्र पाहून झालीय. कल्पना अशी आहे की ती व्यक्ती आर्ट गॅलरीत एक चित्र प्रदर्शन पहायला आलीय, आणि फिरता फिरता ती व्यक्ती अशा एका चित्रापुढे येऊन उभी रहाते, की ज्या चित्रामध्ये फक्त गोल गोल रेषा, वाकडे तिकडे आकार, रंग आणि मधोमध एक मोठ्ठा टपोरा डोळा चित्तारलेला आहे. बरं, चित्रामध्ये कशाचा कशाशी संबंधसुद्धा वाटत नाहीए. चित्रामध्ये फक्त एक डोळा सोडला तर तिच्या ओळखीचं असं काहीही दिसत नाहीए. आणि असं चित्र पाहून ती व्यक्ती पुरती हबकून गेलीय, निराश झालीय.

मॉर्डनआर्टसारखी काही चित्रे अशी असतात, जी समजणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असतात. ती समजायला दर्दी रसिक आणि त्यातील जाणकारच हवा. सामान्य व्यक्तीला असल्या चित्रात फक्त उभ्या आडव्या रेषा आणि रंग दिसतील. पण दर्दी आणि जाणकार व्यक्तीला त्यामध्ये जीवनाचे सार सापडेल. तर कधी त्यात त्याला विश्वरूपाचे दर्शनसुध्दा घडेल.

हे चित्र पाहिल्याबरोबर मलाही असं वाटलं होतं, की त्या चित्रातली व्यक्ती मीच आहे. आणि समोरील भिंतीवरील समजण्यापलीकडचं असे चित्र पाहून माझीसुद्धा त्या व्यक्तीसारखीच अवस्था झाली होती. ह्या चित्रावर काहीतरी स्टेटस लिहिण्याची उर्मी माझ्या मनात उसळून आली. आणि मग मी लिहिले "च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला!?"

Making of photo and status : ५. गगनभरारी!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.



तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत..... गोव्याच्या समुद्रकिनार्यावर पॅरासेलींगचा आनंद लुटताना तरुणी.

Making of photo and status : 
हा फोटो मी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर काढला होता. फोटोमध्ये आकाशात उंचावर पॅराशूटला लटकलेली दिसते ती माझी मुलगी आहे. खरं तर एका फोटोत सर्व गोष्टींचा अंतर्भाव व्हावा म्हणून मी तो थोडा एडिट केला आहे. डावीकडे समुदकिनारा आणि वाळूवर रमलेली माणसं, उजवीकडे अथांग समुद्र, वरती निळेभोर आकाश आणि त्यावर तरंगणारे कापसासारखे दिसणारे पांढरे ढग. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दिसणारे पॅराशूट हा मूळ फोटो आहे. त्यामध्ये पॅराग्लायडिंगकरीता सुरक्षिततेची साधने मुलीच्या शरीराला बांधतानाचा दुसरा फोटो इन्सर्ट केला आहे. आणि मग मुलगी आकाशात किती उंचावर गेलेली आहे, हे सांगायला बाण वगैरे दाखवण्याचे त्यावर संस्कार केले आहेत.

पॅराशूटने माझी मुलगी आकाशात अंदाजे पंधरा माळेतरी उंचावर गेली होती. एकुलती एक असूनसुद्धा, धोका पत्करून आम्ही तिला उंच आकाशात विहारण्याचा आनंद लुटण्यास प्रोत्साहन दिले. त्यावरून मला वरील स्टेटस बनवावेसे वाटले, की माझ्या मुली! तू तुझ्या आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत याची आम्ही तुला खात्री देतो.

Making of photo and status : ४. टम्म् फुगीर जॅकेट

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.



लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या मुलाचे जॅकेट पहा, कसे वारा भरल्याने फुग्यासारखे टम्म् फुगले आहे ते !!! जम्माडी गंमत आपली.

Making of photo and status :
मी रोज लोकलट्रेनने प्रवास करतो. प्रवास करीत असताना मला आजूबाजूचे निरीक्षण करण्याची सवय (खोड??? हा! हा!! हा!!!) आहे. नकळत माझे अंतर्मन तेव्हा दिसणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टी टिपत असते. त्यांचा मला लेखन करताना उपयोगही होत असतो.

असाच एकदा मी लोकलट्रेनने जात होतो. पावसाळी दिवस होते. दुपारची वेळ असल्याने डब्यात तुरळकच गर्दी होती. आपण डब्यात शिरतो त्या मोठ्या पॅसेजमध्ये दरवाजाच्या एका बाजूला रेलिंगला रेलून मी उभा होतो. समोरच्या दुसऱ्या दरवाजाच्या रेलिंगच्या इथे समोरासमोर दोन माणसं उभी होती. एक तरुण दरवाजात उभा होता. गाडी तुफान वेगात धावत असल्याने चाकांचा जोराचा खडखड आवाज येत होता. गाडी गदागदा हलत होती. दरवाजातून सोसाट्याचा वारा डब्यात शिरत होता.

दरवाजात बाहेर तोंड करून हवा खात जो तरुण उभा होता, त्याच्याकडे माझे सहजच लक्ष्य गेले आणि मी आश्चर्याने आणि गंमतीने त्याच्याकडे पहातच राहिलो. पावसाळी दिवस असल्याने त्या तरुणाने अंगात विंडचिटरचे जॅकेट आणि खाली रेनकोटची पॅन्ट घातली होती. आणि त्याच्या जॅकेटच्या कॉलर आणि बटनांमधून आत शिरणार्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्याच्या जॅकेटला मोठ्या फुग्याचा आकार देऊ केला होता. जो फारच गमतीदार दिसत होता. मला तर असं वाटत होतं की एक सुई घ्यावी आणि तो फुगा फाट्कन फोडून टाकावा. तुम्ही फोटो पुन्हा पहा ना! बघा बरं काय गंमत दिसतेय ती! तरुण डब्याच्या दरवाजाला डोकं चिकटवून बाहेर बघत उभा आहे. त्याने एका हाताने वर दांडा पकडलाय. वाऱ्याने त्याचे जॅकेट फुग्यासारखे टम्म फुगवलेय, ज्यामुळे त्याच्या पाठीचा आकारच दिसेनासा झालाय. आणि त्याखाली त्याच्या ढगळ पँटीचा आकार विचित्र दिसतोय. आहे की नाही मजेदार दृश्य! दरवाजातून डब्यात शिरणारा सोसाट्याचा वारा त्या तरुणाबरोबर एक जम्माडी गंमत करत होता हे त्याच्या गावीही नव्हते. त्याचे मस्तपैकी बाहेर बघणे चालू होते.

हे दृश्य मला एवढे आवडले, की ते मला कोणालातरी दाखवावेसे वाटू लागले. पण तिथे माझे कोणीच ओळखीचे नव्हते. म्हणून मी हळूच माझा मोबाईल काढला आणि ते दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.

आणि हो!! असला बालिशपणा करायला मला भयंकर आवडतो बरं का!! माझ्या बालिशपणाचे अजून किस्से पुन्हा कधीतरी. हा! हा!! हा!!!

Making of photo and status : ३. ए सागर कि लहरों!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://sachinkale763.blogspot.in/2017/11/making-of-photo-and-status.html



'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!!
माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'
गोव्याच्या समुद्रकिनारी मायलेकी लाटांशी खेळताना.

Making of photo and status :
समुद्र! नुसतं नांव काढलं तरी मनात गोड खळबळ न माजणारी व्यक्ती निराळीच. आपण पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समुद्राच्या कित्येक सुखद आठवणी आपल्या मनात कोरल्या गेलेल्या असतात. त्या सर्व  उचंबळून वर येऊ लागतात. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एकामागोमाग येऊन खळकन फुटणाऱ्या लाटा. तो खाऱ्या पाण्याचा अथांग सागर. मनमोहक वाळू आणि शंखशिंपल्यांचा समुद्रकिनारा. किनाऱ्यावरची ओळीने उभी असणारी उंच उंच झाडे. आपल्या सभोवताली घोंगावणारा खारा वारा. लांब दूरवर समुद्राला स्पर्शणारे विस्तीर्ण निळे आकाश. आणि समुद्रात बुडी मारू पहाणारा सुर्यास्ताचा लालबुंद सूर्य. ही सर्व दृश्ये आपल्या मनात रुंजी घालू लागतात. आणि आपसूकच आपली पावले समुद्राकडे धाव घेऊ पहातात. मग कधी मित्रमंडळींबरोबर, तर कधी आपल्या कुटुंबाबरोबर आपण समुदकिनाऱ्याची सहल काढू पहातो.

गोव्याला सुंदर सुंदर समुद्रकिनारे आहेत. आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वरील फोटो मीसुद्धा एकेवेळी माझ्या कुटुंबाबरोबर गोव्याला समुद्रकिनारी सहलीकरिता गेलेलो असताना काढलेला आहे. आपण समुद्रकिनारी फिरतो आहोत, आणि आपण आपल्या पायाचा पाण्याला स्पर्श करणार नाही, असे होणे नाही. मी आणि मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा पाहून मोहून गेलो होतो. बदलण्यास कपडे आणले नव्हते, निदान गुढघ्याभर पाण्यात तरी जाऊ म्हणून चपला काढून हातात घेतल्या आणि आम्ही तिघे पाण्यात शिरलो.

लाटांचा थंडगार स्पर्श पायांना झाल्याबरोबर अंगात एक गोड शिरशिरी उठली. पाण्याने आमच्या पायांना वेढा टाकला. लाटा पायांना स्पर्शून परत जाताना आमच्या पावलांखालची वाळू सरसर काढून घेत होत्या. त्याने आमच्या पावलांना गोड गुदगुल्या होत होत्या. मागे गेलेल्या लाटा पुन्हा पुन्हा आमच्याकडे झेपावत होत्या. लाटा आणि पायाखाली सरकणार्या वाळूचा हा खेळ निरंतर चालू होता. मायलेकी भावविभोर होऊ लागल्या. आणि आपसूकच त्यांचे मन गाऊ लागले. 'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!!
माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'

Making of photo and status : २. जावळ

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.






छायाचीत्राचा खालचा भाग पहा बरं ! काय दिसतंय ? काळ्या कातळावर केसासारखं काहीतरी दिसतंय ना ? फसलात ! ते आहे हत्तीच्या टाळक्यावर उगवलेलं जावळ !

Making of photo and status :
हा! हा!! हा!!! आहे की नाही सगळीच गंमत. आपलं डोकं कितीही लढवलं तरी ह्या फोटोवरून कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कसला फोटो आहे. मी केरळला गेलो असता तिथे हत्तीची राईड केली होती. आम्ही हत्तीच्या पाठीवर बसलो होतो, तर समोरच हत्तीचं भलं मोठं डोकं डुगुडुगू डुगुडुगू हलताना दिसत होतं. आणि त्याच्या डोक्यावर जावळासारखे दिसणारे काळेभोर विरळ केससुद्धा! It was so cute looking!! मी पट्कन हत्तीच्या डोक्याचा आणि त्याच्या केसांचा फोटो काढून घेतला. काय सुंदर दिसत होते ते केस!! एकेका केसांमध्ये चांगलं अर्ध्या सेंटिमीटरचं अंतर! आणि उंचीने भरपूर वाढलेले! खरं सांगू! मला त्या केसांवरून हात फिरवावासा वाटत होता. पण माझी हिंमतच झाली नाही. न जाणो त्याला ते आवडलं नाही तर!!? माझंच जावळ धरून उपटायचा. हा! हा! हा! पण काहो!? जशी सिंहाची आयाळ असते तसे हत्तीच्या डोक्यावरचे केस हे त्यांच्यात सौन्दर्याचे लक्षण मानले जाते का? Hmmm! कोणाला तरी विचारायला पाहिजे.

हत्तीच्या राईडची एक गंमत सांगतो. हत्तीची राईड ही घोड्याच्या राईडसारखी उडी मारून टांग टाकून बसायची नसते काही!! हत्ती पार्किंग करण्याच्या जागी एका बाजूला कायमस्वरूपी एक उंच मचाण बांधलेलं असतं. त्याला टेकूनच हत्तीला उभं करतात. आपण शिडीने मचाणावर चढायचं आणि डायरेक्ट हत्तीच्या पाठीवर बसायचं. पण मांडी ठोकून नाही. हत्तीच्या पाठीवर रेक्झिनची जाड गादी टाकलेली असते. आपण एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे टाकून बसायचे असते. ते बसणेपण सुखाचं नसतं हो! हत्ती काही घोड्यासारखा बारीक नसतो. हत्तीची ही मोठ्ठी पाठ आणि हे मोठ्ठं पोट. आपला एक पाय डावीकडे आणि दुसरा पाय उजवीकडे असा १८० कोनात ताणले जातात. थोड्यावेळाने आपल्या पायाच्या दोन्ही जांघेत जोराची कळ मारायला लागते. अर्ध्यातासाने जेव्हा आपली राईड संपल्यावर आपण हत्तीवरून खाली उतरतो ना, तेव्हा कितीतरी वेळ आपण फेंगडेच चालत असतो. हा! हा!! हा!! मग बघणार ना कधीतरी हत्तीची राईड करून!!!?

Making of photo and status : १. गंप्या आणि झंप्या

प्रस्तावना :
तीन वर्षांपूर्वी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पूर्ण शंभर दिवस मी एक मालिका चालवली होती. मी रोज माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये एक फोटो डकवत असे, आणि स्टेटसमध्ये त्या फोटोसंबंधी काही चविष्ट लिहीत असे.

प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा. मग मी तो माझ्या संग्रहात ठेवायचो आणि रोज एक फोटो घेऊन पाऊण तासाच्या माझ्या लोकल प्रवासात त्यावर स्टेटस लिहायचो.

स्टेटस लिहिण्याकरिता फक्त एकशेचाळीस इंग्रजी अक्षरांची मर्यादा होती. अर्थात मराठी करिता त्याहून कमी. कारण इंग्रजीतील दोन ते तीन अक्षरांची जागा फक्त एक मराठी अक्षर घेते हे आपणांस माहीतच आहे. मी स्टेटस लिहिताना १४० अक्षरं बसतील एवढाच गाळा दिसायचा, पुढे लिहिताच येत नव्हते. त्यामुळे स्टेटस कधी फार मोठं व्हायचं, तेव्हा काही शब्द गाळावे लागायचे. त्याने वाक्याचा अर्थ बदलून जायचा. मनासारखं व्हायचं नाही. मग पुन्हा लिहिणे आले. तसेच, इतर वेळी लेख वगैरे लिहिताना आपण कॉमा आणि प्रश्न चिन्ह वगैरेंचा मुक्तहस्ते वापर करत असतो. पण १४० अक्षरांच्या जागेमध्ये स्टेटस बसवताना कधी कधी अक्षरशः एखादा कॉमा किंवा प्रश्नचिन्ह टाकण्याची गरज असायची. पण जागाच शिल्लक उरलेली नसायची. आणि नाही टाकला तर स्टेटसच्या अर्थाचा अनर्थ व्हायची शक्यता निर्माण व्हायची.

प्रोफाइल फोटो आणि स्टेटस टाकण्याकरिता वर्तमानपत्रवाले पाळतात तशी मी डेडलाईन पाळायचो. रोज बरोबर सकाळी सात वाजता मी ते प्रसिद्ध करायचो. वेळ पाळण्याकरिता मी दोन चार फोटो आणि स्टेटस ऍडव्हान्समध्ये तयार करून ठेवत असे. अशा पद्धतीने मी विनाखंड शंभर दिवस ती मालिका चालवली होती. लोकांनाही ते फोटो पहायची आणि स्टेटस वाचायची एव्हढी सवय झाली होती, की ते माझी फोटो आणि स्टेटस टाकण्याची वाट पहात असत.

नमनाला घडाभर तेल वाहून झालेय. आता मूळ मुद्द्यावर येतो. हिंदी सिनेमावाले आपला सिनेमा प्रदर्शित करताना एक छोटीशी फिल्मही बनवतात. ते त्यात तो मूळ सिनेमा बनवतानाची संपूर्ण प्रक्रिया दाखवतात. उदा. Making of chennai express किंवा Making of bahubali वगैरे. काही दिवसांपूर्वी माझे फोटो आणि स्टेटस मी पुन्हा पहात असताना माझ्या मनात विचार आला, की त्याच धर्तीवर माझ्या काही निवडक २० फोटो आणि स्टेटसवर  Making of foto and status लिहून पाहिलं तर कसं वाटेल!!? अर्थातच मराठीतून. आणि एक नवीन प्रयोगही केल्यासारखे होईल.

तर त्याला अनुसरून मी आजपासून ह्या मालिकेला सुरवात करत आहे. या प्रयोगाला मात्र वेळेचे बंधन नसेल. जसजसे माझे लिखाण पूर्ण होईल तसतसे मी ते प्रसिद्ध करेन. तसेच आपल्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरूनसुद्धा २० Making of foto and status ची मालिका पूर्ण करायची की नाही हे अवलंबून असेल. काही चुकभुल झाल्यास आपण सांभाळून घ्यालच याची खात्री आहेच. तरी कुठल्याही क्षणी आपणांस कंटाळा आला तर मला फक्त एक hint द्या. मी ते प्रसिद्ध करायचं थांबवेन.

तर ह्या मालिकेतलं पहिलं पुष्प मी खाली देत आहे. आपणांस आवडल्यास नक्की सांगा. आणि न आवडल्यास तेही कळवा हं!!!!


गंप्या : हे सर्व आपल्याकडे एवढे घुरून घुरून का बघतायत रे ?
झंप्या : अरे, आपल्या चेहर्यात ते त्यांचा पुर्वज शोधतायत. खी:, खी:, खी:, खी:,

Making of foto and status :
हा फोटो मला आंतरजालावर मिळाला. ह्या फोटोने माझे लक्ष वेधून  घेण्याचे कारण म्हणजे कलाकाराने त्यात साधलेली भडक रंगसंगती! लालजर्द माकडं, हिरवंगार झाड आणि पार्श्वभूमीला असलेला गडद पिवळा रंग! बरं ही दोन माकडं इतर सर्वजण सर्वसाधारणपणे रेखाटतात त्यापेक्षा फारच वेगळी आणि cute दिसताहेत. पहा ना! त्यांच्या शरीराचा दिसणारा एकंदर गोल गरगरीतपणा, त्यांच्या डोक्यावरचे उभे राहीलेले छोटुकले केस, त्यांचं चमकणारं डोकं, त्यांची उघडी तोंडे आणि त्यातून दिसणारे त्यांचे शुभ्र दात, त्यांची छोटी छोटी आणि गोल गोल पोटं! तसंच त्यांची छोटुकली उंची पहा, जशी लहान बाळंच जणू!! ह्या फोटोने मला स्टेटस लिहिण्याकरीता लगेच मोहात पाडलं.

मी विचार करू लागलो की काय लिहिता येईल बरं!! आणि तेव्हढ्यात मला त्या दोन माकडांच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव दिसले. मला असं जाणवलं की उजवीकडचा माकड समोर पाहून टिंगल केल्यासारखं काही तरी सांगतोय आणि ते ऐकून डावीकडील माकड खदाखदा हसतोय.

बस्! मी त्यांच्या बोलण्यावरच स्टेटस लिहायचं ठरवलं. माकडांच्या जीवनाशी, त्यांच्या आयुष्याशी संबंधित बरेच लिहिता आले असते. पण मला असे लिहायचे होते, की त्यात मानव आणि माकड या दोघांचा संदर्भ यायला हवा होता. आणि मला पट्कन आठवलं. आपण पूर्वीपासूनच शाळेत शिकत आलोय की माकड हे मानवाचे पूर्वज होते. मग मी कल्पना केली की काही माणसं अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण करायला आलेत. आणि फिरताना त्यांना झाडावर नेमकी हीच दोन माकडं दिसतात. त्याचवेळी ती माकडंही त्या माणसांकडे पहात असतात. त्या दोन माकडांची नांवेही मी काय ठेवलीयत पहा! गंप्या आणि झंप्या!! तर, त्यातले एक माकड मानवांना पाहून दुसऱ्या माकडाला विचारते, गंप्या : हे सर्व आपल्याकडे एवढे घुरून घुरून का बघतायत रे ! झंप्या : अरे, आपल्या चेहर्यात ते त्यांचा पुर्वज शोधतायत. खी:, खी:, खी:, खी:,
हा! हा!! हा!!!

Thursday 19 October 2017

चला! आपणही काही लिखाण करूया.



आपण नेहमी पहातो की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. उदाहरणार्थ हस्तकला, चित्रकला, शिवण, टिपण, झालंच तर घरगुती कुंड्यात फुलझाडांची लागवड करणे वगैरे. ते आपला छंद जोपासत असताना पुष्कळ काही छान छान सर्जनशील गोष्टी निर्माण करीत असतात. जसे की सुंदर चित्रे, भरतकाम केलेले कपडे, वेगवेगळ्या नक्षीदार वस्तू किंवा कुंड्यात फुलवलेली सुंदर फुले इ. इ. आणि मग साहजिकच आहे, की आपण बनवलेली वस्तू चारचौघांना दाखवावी असे त्यांना वाटू लागते. लोकांकडून आपले कौतुक करून घ्यावेसे वाटते. म्हणून सर्जनशीलतेने निर्माण केलेल्या त्या वस्तूंचा फोटो काढून तो फेसबुकवर अपलोड करतात. पण त्या फोटोविषयीची थोडीफार माहिती वॉलवर लिहीत नाही. नुसताच फोटो अपलोड करतात.

परवाही असंच झालं. फेसबुकवर माझी एक छोटी मैत्रीण आहे. तिनेही खाली दिसतोय तो फोटो वॉलवर अपलोड केला. बाकी काही नाही. ना त्याची माहिती दिली, ना काही! वास्तविक त्या फोटोमध्ये 'ओरीगामी' नावाच्या एका जपानी कला प्रकाराने पेपर फोल्डिंगद्वारे छानशी फुलपाखरे करून दाखवलेली होती.

मी आपणांस सांगू इच्छितो, की मी थोडंफार लिखाण करतो, आणि इतरांनाही लिखाण करायला प्रवृत्त करत असतो, तसेच नवोदित लेखकांना प्रोत्साहनही देत असतो. असे केल्याने माझ्या मनाला कुठेतरी समाधान लाभत असते.

ह्या निमीत्ताने मला संधी आली होती माझ्या त्या छोट्या मैत्रिणीला लिहितं करण्याची. मी त्या मैत्रिणीला मेसेज केला. "अगं! तू टाकलेल्या नुसत्या फोटोवरून तो पहाणाऱ्या व्यक्तीला कसे समजणार की ते काय आहे ते? तू त्या संबंधीची काही माहिती का लिहीत नाहीस?"

ती म्हणाली "अहो काका! पण मला लिहिता येत नाही हो! आजपर्यंत मी कधी लिहिण्याचा प्रयत्नच केलेला नाही. सुरवात कुठून करायची आणि काय लिहायचं हेच मला समजत नाही"

मी म्हणालो " अगं त्यात काय मोठं! लिहायचं! आपण बनवलेल्या त्या वस्तूला काय म्हणतात, त्या कलेचं नांव काय आहे, कलेचा थोडक्यात इतिहास लिहायचा, ती वस्तू कशी बनवलीय, काय काय साहित्य लागलं, करायला किती वेळ लागला. त्याला किती खर्च आला, करताना काय काय अडचणी आल्या, मग त्या अडचणींचे निवारण कसे केले. वगैरे! वगैरे!"

ती म्हणाली "बघते प्रयत्न करून."

काल पुन्हा तिचा मला मेसेज आला, तो तसाच खाली देत आहे.

"नमस्कार सचिन काका!
मी काल थोडाफार प्रयत्न केला 
लिहिण्याचा. पण जमत नाही आहे.
मी जे काही बनवलंय त्यांची 
कृती कशी लिहू तेच समजत 
नाहिये. त्यामुळे दुसऱ्या 
कुठल्यातरी विषयावर लिहायचा 
प्रयत्न करतेय. बघूया आता ते 
तरी जमतंय का ते.. 
लिहून झालं कि तुम्हाला आधी 
मेल करेन :)


तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक 
शुभेच्छा!!"


आता मी म्हटलं, लिहिता येत नाही म्हणून ती फारच निराश झालेली दिसतेय. तिचा उत्साह वाढवण्याकरिता काहीतरी करायला हवे. म्हणून मी तिला पुन्हा खालीलप्रमाणे मेसेज केला.

" XXX हिस,

सप्रेम नमस्कार, अगं तू लिखाण करण्याचं फार टेन्शन वगैरे घेतलंयस की काय!!!? मला माफ कर, मी तुला जरा जास्तंच आग्रह केला असे वाटते. तू लिहिती व्हावी ही माझी इच्छा होती. आणि लिहिण्याचा विषयही तुला चालून आला होता. असो, तू लिहिण्याचा प्रयत्न करून पाहिलास याचाच मला फार आनंद आहे.

लिखाण करणं अगदीच सोपं असतं गं! आपण मनात बोलतो ना? बस्! तेच फक्त भराभर लिहून काढायचं असतं. आपण शाळेत नाही का निबंध लिहीत होतो. अगदी तसंच! लिहिणं सोपं व्हावं म्हणून मी तुला मुद्दाम काही प्रश्न दिले होते. त्या प्रश्नांची फक्त तू सलग उत्तरंही जरी लिहिली असती तरी चालले असते. काहीतरी एक छोटाखाणी लेख तयार झाला असता.

त्याचं काय आहे, की आपण इतर लोकं काय म्हणतील यालाच घाबरत असतो गं! पण आपल्याला कधीतरी सुरवात करावी लागतेच ना!? नाहीतर आपल्या मनातल्या इच्छा मनातच राहून जातात. अगं, मीसुद्धा पूर्वी ह्याच परिस्थितीतून गेलेलो आहे.

आता तू दुसरा विषय घेऊन लिहायचा प्रयत्न करतेयस ही फारच चांगली गोष्ट आहे. लिहायचं टेन्शन मात्र घेऊ नकोस. पाहिजे तेवढा वेळ घे. पण लिखाण पूर्ण केल्यावर आपल्याला कित्ती आनंद मिळतो याचा अनुभव मात्र नक्की घे.

पुढील लिखाणाच्या तुला खूप खूप शुभेच्छा! आणि हो! तुला शुभ दीपावलीसुद्धा!

एक गंमत सांगू!!? तुला हे सर्व सांगताना माझ्याकडून 'एका नवोदित लेखिकेला लिहिण्यास उत्तेजन देणारे पत्र लिहा' असा एक निबंधच लिहून झाला की !!!?

बघ!!! एवढं सोप्प आहे लिखाण करणं. खालीपिली टेन्शन लेनेका नाय!!!
हा! हा!! हा!!


--- सचिन काळे."

तिला मी वरील मेसेज पाठवून दोन दिवस झालेत, पण अजूनपर्यंत तिचे पुढे काही उत्तर आलेले नाही. पण लवकरच तिने काहीतरी छान लिखाण केल्याचा मेल येईल याची मला शंभर टक्के खात्री आहे.

आता आमच्यात झालेलं हेे संभाषण तुम्हां सर्वांना सांगण्याचे कारण म्हणजे हे वाचून वाचकांपैकी कोणी एकानेही दोन शब्द लिहिण्याकरिता स्फूर्ती घेतली आणि लिखाण करण्यास सुरवात केली, तर माझ्या हातून काही चांगले घडल्याचे मला नक्कीच समाधान मिळेल.

तर मग!? करताय ना सुरवात लिखाण करायला. आणि हो! तुमचा शुभारंभाचा लेख मला पाठवायला मात्र विसरू नका बरं का!! सर्व वाचकांना माझ्याकडून सुंदर लिखाणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ दीपावलीसुद्धा!!!

Wednesday 18 October 2017

लाचार, बेबस कुत्रा आणि मी!!



मुंबईच्या लोकल प्रवाश्यांच्या परिस्थितीशी किती अचूक जुळतोय ना हा फोटो!

फोटोतल्या त्या कुत्र्याचा चेहरा पहा ना, किती लाचार आणि बेबस झालेला दिसतोय बिचारा. अगदी माझ्यासारखा!!!


मीसुद्धा गेली २८ वर्षे लोकल प्रवास करतोय. सहन होत नाहीये, आणि सांगताही येत नाहीये.

माझ्या बोलण्याची तीव्रता समजायला एक घटना सांगतो. एकदा भर गर्दीच्यावेळी मी लोकलमध्ये वरच्या कुत्र्यासारखा कळकट मळकट लोकांमध्ये चारीबाजूने दबला गेलो होतो. माझ्या समोरच्या उंच आणि जाड्या माणसाचा पार्श्वभाग माझ्या पोटावर जोऱ्याचा दाबला जात होता. आणि त्या उंच आणि जाड्या माणसाने परपर परपर करून एक मोठ्ठा अपानवायू माझ्या पोटावर सोडला. त्याचे vibration एवढे जोऱ्याचे माझ्या पोटापर्यंत पोहोचले, की माझ्या पोटातलं अक्षरशः सगळं ढवळून वर आलं.  मीसुद्धा त्यावेळी वरील कुत्र्यासारखाच लाचार आणि बेबस झालो होतो.

Tuesday 19 September 2017

Jokes आणि मला पडणारे प्रश्न.


जोक्स वाचून मला नेहमी पडणारे प्रश्न... हे जोक्स कोण बनवत असतं? जोक बनवणारे, लेखक म्हणून आपलं नांव का टाकत नाहीत? कथा, लेख लिहिल्यासारखे जोक मुद्दाम बनवावे लागतात का? की कवितेसारखे आपोआप स्फुरतात? जोक्स बनवण्याची प्रोसेस कशी असते? म्हणजे शेवटाचा पहिले विचार करतात की सुरवातीचा? आपल्यालाही जोक्स लिहिता येतील का? जोक्स मधली भाषा कशी ठरवली जाते? जोक्स लिहिणारा अगोदर लिहून कोणावर चाचणी करून पहातो का, की हसायला येतंय की नाही? आणि नाही हसायला आलं तर त्या जोकला तो पुन्हा कसं सुधरवतो? जोक्सलाही इतिहास आहे का? म्हणजे पुराणकाळापर्यंतचा वगैरे? तेव्हाही लोकं एकमेकांना जोक्स सांगायचे का? प्रश्न, प्रश्न, प्रश्न.......
मी असे प्रश्न विचारले, हा पण एक जोक झाला ना? हा! हा!! हा!!!

Friday 25 August 2017

सोसायटीतला पाऊस




          आमच्याकडे सकाळपासून धो धो पाऊस पडतोय. गॅलरीतील ग्रीलच्या पत्र्याच्या शेडवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब जोरात ताशा वाजवताहेत. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केलीय. सगळीकडे अंधारून आलंय. समोरचा डोंगर मुसळधार  पावसात दिसेनासा झालाय. सगळी झाडं पावसाच्या पाण्यात न्हाऊन निघून त्यांची पाने गोरी गोरी हिरवीगार झालीत. झाडांच्या पानावर पडणारे मुसळधार पावसाचे थेंब सरसर आवाज करताहेत. वातावरण मस्तं गारेगार झालंय. 

       पॅन्ट गुढघ्यापर्यंत फोल्ड करून, छत्री घेऊन मी खाली दुकानात जाऊन आलो. छत्री, पिशवी, पाकीट सांभाळताना त्रेधा उडाली. अर्धा अधिक भिजलो. चेहऱ्यावर मस्तं तुषार उडत होते. जागोजागी जमिनीवर पाण्याची डबकी साचली होती. रस्त्यावर तुरळक गर्दी होती. कुत्री भिजून दुकानांच्या पायऱ्यांवर घोळक्याने कुडकुडत बसली होती. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कार, स्कुटर धुवून निघाली होती. कोण म्हणतो पाऊस अनुभवायला डोंगर दर्यातच जायला पाहिजे? मला आमच्या सोसायटीत खाली पावसात फिरतानाही जाम मज्जा आली.

(समाप्त)

Tuesday 1 August 2017

हंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा?



          हा! हा!! हा!!! मला माहितेय! वरील शीर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. तुम्हाला वाटलं असेल, काय लिहिलंय हे!!? आफ्रिकेच्या जंगलातील कोण्या आदिवासी लोकांची भाषा दिसतेय ही. वाचताना असं वाटतं की, सर्व आदिवासींनी मिळून एक मोठी शिकार केलीय. मैदानात उघडेबंब, अंगावर चट्टेपट्टे ओढलेले आणि हातात भाले वगैरे घेतलेले लहानथोर सर्व आदिवासी जमलेत. मधोमध मोठ्या शेकोटीवर शिकार भाजायला लावलीय. आणि त्याभोवती सर्व फेर धरून नाचतायत आणि गातायत. "झिंगालाला! होsss!! टुंबक्टू! टुंबक्टू!! टुंबक्टू!!!"

          हा! हा!! हा!!! अहो असं काही नाहीए. ही उटपटांग भाषा कोणतीए, सांगतो! सांगतो! एकदा काय झालं, माझ्या लहानपणी मी माझ्या मित्राच्या घरी अभ्यासाकरिता गेलो होतो. त्यावेळीे त्याचे आईवडिल आणि बहीणभाऊसुद्धा घरात होते. मी आणि माझा मित्र बेडरूममध्ये अभ्यास करत बसलो होतो. अधेमधे मित्राचे आईवडिल आणि बहीणभाऊ काही कामानिमित्त बेडरूममध्ये आले, की त्यांचे माझ्या मित्राबरोबर वरील 'टन् टना टन्' भाषेत बोलणे चाले. मला काही समजेच ना! की ते कोणत्या भाषेत बोलतायत ते! ती मला काही साऊथच्या भाषेसारखी 'अंडूगुंडू', गुज्जूसारखी 'केम छो',  बंगांल्यांसारखी 'की खाबो' किंवा चायनीजसारखी 'च्यांव म्यांव' वगैरे वाटेना. त्यांचे आपसातील बोलणे ऐकताना मला कुठल्यातरी देवळातील घंटा बडवल्यासारखे त्यांच्या तोंडून फक्त 'टन् टन्' ऐकू येत होते. एक अक्षर कळेल तर शपथ!

          त्यांचे 'टन् टना टन्' भाषेतले बोलणे ऐकून मी हैराण झालो होतो. दुसऱ्या दिवशी मित्र शाळेत भेटल्यावर मी त्याला त्याविषयी विचारले. त्याबरोबर तो पोट धरून जोरजोरात हसू लागला. मला म्हटला "अरे वेड्या! आम्ही आपसात बोलत होतो ती काही कुठल्या जातीधर्म किंवा प्रांत वगैरेची भाषा नव्हती. ती आमच्या घरात पूर्वीपासून चालत आलेली एक प्रकारची 'सांकेतिक भाषा' आहे, जी फक्त आमच्या घराणातल्या लोकांनाच माहीत आहे. काय होतं, की जेव्हा आपल्या आजूबाजूला बरीच इतर माणसं असतात आणि आपल्याला आपल्या माणसांबरोबर काही खाजगी बोलायचं असतं, तेव्हा ही 'सांकेतिक भाषा' आपल्याला उपयोगी पडते. इतर लोकांना काहीच कळत नाही आपण काय बोलतोय ते! आहे की नाही गंमत!"

          मला ही कल्पना फारच आवडली. मी माझ्या मित्राला ती सांकेतिक भाषा मला शिकविण्याबद्दल फारच गळ घातली. बरेच आढेवेढे घेतल्यावर त्याने मला ती भाषा शिकवली. आणि मग काय!!? वर्गात आम्ही दोघे त्याच 'टन् टना टन्' भाषेत एकमेकांशी बोलू लागलो. इतर मित्रांना न कळता आमची गुपितं चारचौघात एकमेकांना सांगू लागलो. आता तुम्हालाही ती भाषा शिकण्याची उत्सुकता लागून राहिली असेल ना? हो! ती भाषा मी तुम्हालाही शिकवणार आहे, पण लेखाच्या शेवटी.

          तर मी काय सांगत होतो? सांकेतिक भाषा!!! आमच्या लहानपणी आपली गुपिते चारचौघात उघडपणे बोलता यावीत म्हणून खास बनवलेली अजून एक भाषा होती, ती म्हणजे 'च' ची भाषा. नमुना सांगतो. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर आम्ही हे कसं म्हणायचो पहा! "चजआ चमी चझ्यामा चब्यातड चकए चमतगं चणलीयआ" आहे की नाही मज्जा!!? पण ही भाषा त्यावेळी बहुतेक मुलांमुलींना येत होती. त्यामुळे त्यात एवढं गुपित आणि नावीन्य राहिलं नव्हतं. मग कधी कधी एक गंमतसुद्धा व्हायची. इतरांना ही भाषा माहीत नसेल हे गृहीत धरून आम्ही चारचौघात ती भाषा एकमेकांत मोठ्याने बोलायचो, आणि समोरचा म्हणायचा "मला समजलं!! तुम्ही लोकं काय म्हणतायत ते!" अस्सा पोपट व्हायचा ना आमचा!!!

         त्यावेळी अजून एक सांकेतिक भाषा मी ऐकून होतो, पण बोलणारा कोणी सापडला नाही. त्याविषयी थोडक्यात. त्या भाषेचं नांव होतं. 'राम कृष्ण हरी'. याकरिता आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय" तर ह्या भाषेत आपण कसं म्हणू? ऐका "आजराम मीकृष्ण माझ्याहरी डब्यातराम एककृष्ण गंमतहरी आणलीयराम" ही भाषा बोलताना आपोआप देवाचा जप होई, म्हणून ती आध्यत्मिक लोकांमध्ये बोलली जात असावी.

          चला तर मग मी तुम्हाला मघाची 'टन् टना टन्' भाषा शिकवतो. शिकायला थोडी कठीण आहे. पण एकदा भाषेचं तंत्र समजलं, की बोलायला एकदम सोप्पी आहे. कसं आहे, की ही भाषा प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या स्वरावर अवलंबून आहे. तो स्वर लक्षात ठेऊन त्या अक्षराचा स्वर काढून घ्यायचा. मग स्वर काढून राहिलेल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा. नंतर पहिल्या अक्षराचा काढलेला जो स्वर आहे तो 'ट'ला लावून तो 'ट' स्वर काढलेल्या अक्षराच्या पुढे ठेवायचा. मग बाकी राहिलेला शब्द आहे तसाच 'ट'ला जोडायचा. नाही समजलं? उदाहरण सांगतो. आपण 'कुठे' हा शब्द घेऊ. तर आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. 'कुठे' शब्दाचे पहिले अक्षर आहे 'कु'. 'कु'चा स्वर आहे 'उ'. तो स्वर बाजूला केल्यावर रहातो 'क'. आता 'क'वर अनुस्वार दिल्यावर त्याचा होतो 'कं'. आता काढलेला स्वर जो 'उ' आहे तो 'ट'ला जोडल्यावर त्याचा होतो 'टु'. आता हा 'टु' अगोदरच्या 'कं'च्या पुढे ठेवल्यावर शब्द होईल 'कंटु'. ह्या 'कंटु'च्या पुढे राहिलेला 'ठे' जोडला की शब्द होईल 'कंटुठे'. संपलं! 'कुठे'ला आपण 'टन् टना टन्' भाषेत बोलू 'कंटुठे'. आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर हे वाक्य आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. "अंटाज मंटी मंटाझ्या डंटब्यात एंटेक गंटंमत अंटाणलीय" अगदी सोप्पय!! अहो, आम्हाला असं बोलायची एवढी सवय झाली होती की आम्ही धडाधड ही भाषा बोलत असू. ऐकणाऱ्याला फक्त 'टन् टना टन्' आवाज ऐकू येत असे. आहे की नाही सगळी गंमत!

          तर मित्रांनो! ही 'टन् टना टन्' भाषा शिकून घ्या. सराव करा. आणि आपल्या मित्राबरोबर चारचौघात उघडपणे आपली गुपिते शेअर करा. कोणाला काहीच कळणार नाही, याची फुल्ल गॅरंटी! आणि हो! तुम्हालाही ह्या प्रकारची दुसरी कुठली एखादी सांकेतिक भाषा येत असेल तर येथे आमच्याबरोबर शेअर करा. तेवढीच एक गंमत!

Sunday 16 July 2017

तुमचेही काही नवीन शिकणे अर्धवट राहिले आहे का?



        ह्या लेखाद्वारे आज मी तुमच्याशी थोडेसे हितगुज करणार आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनुभवाला येणाऱ्या एका गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे.

          आपल्या प्रत्येकाला काहीना काही गोष्टींची आवड असते. त्याकरिता आपण त्या गोष्टी शिकायला सुरवात करतो. कोणी गाणं गायला, कोणी एखादे वाद्य वाजवायला, कोणी पेंटींग करायला, कोणी समाजकार्य करायला तर कोणी एखादे वाहन चालवायला शिकत असतो.

        पण काहीना काही कारणाने त्या शिकण्यात खंड पडतो. त्याची कारणे प्रत्येक व्यक्तीपरत्वे अनेक असू शकतात. कधी योग्य सुरुवात नसते. तर कधी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कधी शारीरिक, आर्थिक किंवा इतर अनेक अडचणी येतात. आणि आपण हातात घेतलेले कार्य सोडून देतो. आपल्या मनातली काही नवीन शिकण्याची इच्छा अपूर्ण राहून जाते. जसजसे दिवस, वर्षे जातात तसतसे आपले मन आपल्याला सतत खाऊ लागते. मनाला एक हुरहुर लागून रहाते. सारखं वाटत रहातं, की अरे! तेव्हा आपण ते शिकणं अर्धवट सोडलं नसतं तर आतापर्यंत कुठल्या कुठे पोहोचलो असतो. आता आपलं आयुष्य किती वेगळं असतं. त्या संबंधित विषयात आपण आतापर्यंत कितीतरी निपुण झालेलो असतो.

         मीसुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वी एक नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केली होती पण काही कारणाने माझे ते शिकणे अर्धवट राहिले होते. लहानपणापासूनच मला वाचनाचा भयंकर नाद. वाचण्याच्या प्रकारात खास आवडनिवड होती असे काही नाही. जे दिसेल ते, जे मिळेल ते मी वाचत असे. मित्रमंडळींकडून त्यांच्या पालकांनी वाचायला आणलेली पुस्तके, मासिकेही मी मागून आणून वाचत असे. बऱ्याचदा रस्त्यावर पडलेले कागदाचे चिटोरेही उचलून मी वाचत असे. कधीकधी काही वाचायला नसेल तर अगोदर वाचलेलं साहित्य मी पुन्हा पुन्हा वाचत असे. अशा प्रकारे बऱ्याचदा एकाच पुस्तकाची माझी असंख्य पारायणे झालेली आहेत.

       तीस वर्षांपूर्वी किंग्जसर्कल (आजचे महेश्वरी उद्यान) येथे विक्रेते रस्त्यांवर जुनी पुस्तके घेऊन विकायला बसत. त्यांच्याकडे अगदी स्वस्तात जुनी पुस्तके विकत मिळत. दर दोन चार दिवसांनी त्यांच्याकडे माझी एखादी फेरी ठरलेली असे. तेव्हा असेच एकदा मला तिथे 'Learn urdu in 30 days' हे पुस्तक मिळाले. ते वाचून मला उर्दू शिकण्याची भयंकर उर्मी झाली. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्यातील सर्व पाठ मी गिरवले. सर्व मूळाक्षरांचा लेखी सराव केला. मला उर्दू लिहायला आणि वाचायला येऊ लागले. पण त्याचा अर्थ समजत नसे. म्हणून मी भेंडीबाजार येथून १ली ते ४थी पर्यंतची मदरसा आणि बालभारतीची उर्दू मिडीयमची पुस्तके आणली. त्यांचा अभ्यास केला. आता मला थोडे थोडे उर्दू समजू लागले. तरी काही शब्द समजायला कठीण पडत. म्हणून पुन्हा भेंडीबाजार येथे जाऊन उर्दूची भली मोठी डिक्शनरी घेऊन आलो. काही शब्द अडले की मी त्यात बघायचो. उर्दू जाणणारे दोन मुस्लिम मित्र बनवले. त्यांच्याकडून मी शंका निवारण करून घेई. ते 'इन्कलाब' उर्दू वृत्तपत्र व इतर उर्दू पुस्तकं वाचीत, तेव्हा मी त्यात डोकावे. तेव्हा मित्रमंडळींनी मला फार पिडलं. गमतीत मला म्हणायचे "काय रे? कोण्या मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडलायस का?" कोणी म्हणे "धर्मांतर करणारेस वाटतं?" पण मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. आणि शेवटी मी बऱ्यापैकी उर्दू लिहायला, वाचायला आणि समजायला लागलो.

       पण थोड्याच दिवसांत माझे लग्न झाले. आणि घरसंसारात पडल्यावर जे सर्वांचे होते तेच माझे झाले. गेली तीस वर्षे माझा उर्दूशी संपर्कच राहिला नाही. मी बरचसं विसरून गेलोय. हातातोंडाशी आलेला घास खायचा राहून गेला.

      आता सारखं वाटू लागलंय, की उर्दूचा पुन्हा सराव करावा. मोबाईलच्या जमान्यात आता तर उर्दू शिकणे फारच सोपे झालंय. अँड्रॉइडवर उर्दू शिकण्याचे विविध प्रकारचे अप्लिकेशन, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आहेत. संसारातून जरा मोकळा झालो की मी माझी ही अपूर्ण राहिलेली 'उर्दू' आणि 'मोडी लिपी' शिकण्याची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे.

        तुम्हीही तुमच्या आयुष्यात काही गोष्टींची शिकायला सुरवात केली असणार, पण काहीना काही कारणाने ते पूर्ण करण्याचे राहून गेले असणार याची मला खात्री आहे. मला आशा आहे, की माझ्या ह्या लेखाने आपण प्रेरित होऊन, आपल्याला आपले नवीन शिकणे अर्धवट राहिलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण होईल. आणि ती पूर्ण होण्याच्या दिशेने आपली पाऊले पुन्हा पडू लागतील. चला तर मग, आपण सर्वांनी मिळून निश्चय करू आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ, की आपल्या अर्धवट राहिलेल्या नवीन गोष्टी शिकणे पूर्ण होवो.

Friday 14 July 2017

म्यांव! म्यांव!! म्यांव!!!



          माझ्या लहानपणी माझ्याबाबतीत शाळेत घडलेला हा एक गमतीदार किस्सा मी आज तुमच्या बरोबर शेअर करतोय.

          मी तेव्हा इयत्ता चौथीत होतो. आणि वर्गात इतिहासाचा तास चालू होता. वर्गात वीसेक मुलं आणि वीसेक मुली असतील. सर्व चिडीचूप बसून सरांचे शिकवणे ऐकत होते. मी वर्गातल्या मधल्या भागातील बेंचवर बसलो होतो. हातातल्या पेन्सिल आणि खोडरब्बरशी माझा चाळा चालू होता.

         आणि अचानक माझ्या हातातला खोडरब्बर माझ्या हातातून निसटून माझ्या बेंचखाली कुठेतरी पडला. मी बेंचखाली वाकून दोन पायावर बसलो आणि माझा खोडरब्बर शोधू लागलो. मी इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय. पण तो मला काही सापडेना. मी बसल्या बसल्या सरकत पुढच्या बेंचखाली गेलो.

         मी खोडरब्बर शोधण्यात इतका गुंग होऊन गेलो, की मी कुठे आहे आणि काय करतोय याचे मला भानच राहिले नाही. मी माझ्या मनातच एवढा रमलो की खोडरब्बर शोधता शोधता माझ्या तोंडून मी हळूहळू आवाज करू लागलो. कसा माहितेय!!? 

         "म्यांव! म्यांव!! म्यांव!!!" असा मांजरीसारखा! मला हे 'म्यांव म्यांव' फारच आवडले. हळूहळू माझं 'म्यांव म्यांव' फारच जोरात व्हायला लागले. मी बेंचखाली रांगु लागलो. सर तिकडे शिकवत होते आणि इथे माझे तोंडाने 'म्यांव म्यांव' करत खोडरब्बर शोधणे चालू होते.

         आणि कोण जाणे मला अचानक सारं शांत शांत वाटायला लागलं. सरांचा शिकवण्याचा आवाज मला ऐकू येईनासा झाला. मी भानावर आलो. म्हटलं सगळे गेले कुठे? म्हणून मी बेंचखालून डोके बाहेर काढून वर बघितले तर काय!!?......

          सरांसकट सर्व मुलं मुली माझ्या बेंचभोवती कोंडाळं करून मला गुपचूप पाहताहेत. माझी बोलती बंद!!! हे पाहून सर्व मुलं मुली माझ्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागले. सरांनी माझ्या कानाला धरून मला उभे केले. आणि मग त्यांनी माझे काय हाल केले असतील याची तुम्ही कल्पनाच न केलेली बरी!!!

Sunday 9 July 2017

आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे



          मी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.

         आणि अचानक एक गृहस्थ माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. मला म्हणाले "नमस्कार! कसे आहात तुम्ही?" त्यांच्याकडे मी पाहिले पण माझ्या काही लक्ष्यात येईना की मी पूर्वी त्यांना कुठे भेटलोय ते! बरं त्यांना त्यांची ओळख विचारायला मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. न जाणो खरंच ते माझ्या ओळखीचे असतील आणि मी त्यांना विसरून गेलो असेल, तर उगाच त्या बिचार्यांना वाईट वाटायचं.

          मीसुद्धा नमस्कार केला "नमस्कार! काय म्हणताय?" पुढे दोन चार मिनिटे आमच्यात त्या कार्यालयातील असणाऱ्या आमच्या कामाबद्दल सर्वसाधारण बोलणे चालले. पण अजूनही माझी ट्यूब काही पेटेना की मी त्यांना अगोदर कुठे भेटलोय ते! मीसुद्धा भिडेखातर ते गृहस्थ जसे बोलतील तसे त्याला अनुसरून माझे संभाषण सुरू ठेवले.

         आणि अचानक त्या गृहस्थांनी मला विचारले "तुमच्या ऑफिसमधले ते अमुक अमुक रिटायर झाले का हो?" मी विचारले "कोण हो?"  गृहस्थ "ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे?" मी "छे हो! अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही?" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले "तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना?" मी "नाही हो! मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय." गृहस्थ "तुम्ही जोशी ना?" मी "नाही हो! मी काळे." गृहस्थ "माफ करा हं! मी तुम्हाला जोशीच समजलो. पण तुम्ही अगदी डिट्टो त्या जोश्यांसारखेच दिसता हो, म्हणून माझा गैरसमज झाला. माफ करा." असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला आणि मी अवाक् होऊन  त्यांना जाताना पहात बसलो.

         बऱ्याचदा असे होते की एखादी व्यक्ती आपल्याला कोणीतरी दुसराच समजून आपली त्याच्याशी घनिष्ठ ओळख असल्यासारखी आपल्याशी बोलू लागते. आपली चौकशी करू लागते. आणि आपल्याला जेव्हा समजते की समोरच्याला अपेक्षित असणारी व्यक्ती आपण नाही आहोत, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की त्या व्यक्तीचा आपल्याविषयी गैरसमज कसा काय झाला? आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल? कोण असेल ती? काय करत असेल? असा अनुभव आपल्या सर्वांनाच बहुतेक वेळा आला असेल याची मला खात्री आहे.

          असे का होते? याचे उत्तर मी बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते. तेव्हा केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले होते की संपूर्ण जगभरात एकसारखी दिसणारी, एकाच वयाची, एकाच रंगरूपाची आणि अंगकाठीची किमान सात व्यक्ती एकाचवेळी जगत असतात. फक्त त्या सात व्यक्ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्याने आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ न शकल्याने त्यांना समजतच नाही की आपल्यासारखीच दिसणारी जगभरात एकूण सात माणसं फिरताहेत. माझ्या मनात कधी कधी एक गमतीदार विचार येतो, की कदाचित विधाता वेगवेगळे मॉडेल बनवून बनवून आता थकला असेल. त्याची कल्पनाशक्तीसुद्धा आता बोथट झाली असेल. कदाचित कंटाळलाही असेल. म्हणूनच विधाता आता मनुष्यप्राणी बनवायला पुन्हा पुन्हा तोच तो साचा तर वापरत तर नसेल!?

          अहो, पूर्वीतर माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की माझ्या भावाने तुला मुंबईत इथे पाहिला, माझ्या बाबांनी तुला मुंबईत तिथे पाहिला. आणि मी तर तिथे तेव्हा गेलेलोच नसायचो. मला फार आश्चर्य वाटायचे. मुंबईत फिरणाऱ्या माझ्या डुप्लिकेटला भेटण्याची तेव्हा मला फार उत्सुकता असायची. पण मला तो कधी भेटला नाही.

          हो! माझ्या तरुणपणी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला एक चित्रपट कलावंत मात्र होता. जो अगदी शेम टू शेम माझ्यासारखाच दिसायचा. मी जिथे जाईल तिथे लोकं मला त्याच्या नावाने बोलवायचे. अगदी माझं लग्न ठरलं तेव्हाही माझ्या सासुरवाडीची लोकं एकमेकांना म्हणायची. "आपला होणारा जावई ना, अगदी डिट्टो त्या हिरोसारखा दिसतो हो!!!" हे ऐकले की माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. खी: खी: खी:

         असो. आपण नेहमीच वर्तमानपत्र आणि मासिकांत वेगवेगळ्या हिरो हिरोईनच्या डुप्लिकेटचे फोटो पहात असतो. चित्रपटावरून एक आठवलं. १९७८ साली 'नसबंदी' नावाचा आई. एस. जोहर यांचा एक चित्रपट आला होता. ज्यामध्ये पाच नायक होते. पण ते सर्वच्या सर्व त्या काळातील प्रसिद्ध हिरोंचे डुप्लिकेट होते. चित्रपट निर्माते असे डुप्लिकेट कुठून शोधून आणतात कोण जाणे? आमचेच डुप्लिकेट आम्हाला कसे भेटत नाहीत ते!!!

         चित्रपटाप्रमाणे राजकारणातसुद्धा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर केला जात होता. मी तर कुठेतरी वाचलं होतं की 'हिटलर'नेसुद्धा आपल्यासारखेच दिसणारे सात आठ हिटलर जमवले होते. अतिमहत्वाच्या व्यक्ती ऐतिहासिक (की पुराण?) काळापासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना फसवण्याकरिता आणि त्यांना नामोहरम करण्याकरिता आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर करीत असत.

         पुन्हा असो. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की ह्या भूतलावर आपल्या प्रत्येकाचे सात सात डुप्लिकेट अस्तित्वात आहेत. ना जाणो कधी ते आपल्यासमोर येऊन उभे ठाकतील ह्याचा काय भरवसा? त्यामुळे, जागे रहा. रात्र वैऱ्याची आहे. नाहीतर त्या 'अंगुर' चित्रपटातील संजीवकुमारसारखं आपणसुद्धा इकडचा त्या घरात आणि तिकडचा ह्या घरात अदलाबदली व्हायचो.

Sunday 2 July 2017

नियतीचे वर्तुळ



       रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती.

        रेखाचे वडील तीन वर्षांपूर्वीच एका खाजगी शाळेतून शिपाई म्हणून रिटायर झाले होते. त्यांना रिटायरमेंटच्या मिळालेल्या पैशाचा बराचसा भाग त्यांच्या स्वतःच्याच आजारपणावर खर्च होत होता. दोन वर्षांपूर्वी रेखा बीए बीएड झाल्यावर त्यांनी तिला आपल्याच शाळेत शिक्षिका म्हणून कामाला लावले होते.

       सुरवातीला एक वर्ष रेखाचे शाळेेत शिकवण्यात मन रमायचे नाही. तिचे शाळेत फक्त पाट्या टाकण्याचे काम चालू होते. रोज सकाळी उठायचे, आपलं आवरायचं, ट्रेन पकडून शाळेत जायचं, तिथे पाचसहा तास शिकवून परत ट्रेनने घरी यायचं. घरी येऊन घरची रोजची कामं उरकायची, की संपला दिवस. आयुष्य अगदी निरस झाल्याचं वाटत होतं. ती तरुण होती. अविवाहित होती. आपल्या तारुण्यातील उमेदीचे दिवस शाळेच्या चार भिंतीत वाया जात असल्याचे तिला सतत वाईट वाटे.

      आणि अचानक एके दिवशी तिच्या आयुष्यात आनंद फुलला. एका वर्षांपूर्वी शिपायाने तिला प्रिन्सिपल मॅडमनी बोलावल्याचा निरोप दिला. आज क्लार्क कामावर आला नव्हता. मंत्रालयातून काही महत्वाच्या कागदपत्रांवर आजच्या आज सह्या करून आणणं आवश्यक होतं. मॅडमनी रेखाला विनंती केली. शाळेच्या कटकटीतून एक दिवस सुटका होईल म्हणून रेखा आनंदाने मंत्रालयात जायला तयार झाली.

       रेखा एका हातात कागदपत्रांची पिशवी, दुसऱ्या हातात छत्री आणि खांद्यावर पर्स अडकवून बसस्टॉपवर जायला निघाली. बघते तर काय? बसस्टॉपवर मंत्रालयाला जाणारी एक डबलडेकर बस नुकतीच निघण्याच्या तयारीत होती. तिने बसकडे धाव घेतली. त्याबरोबर बस चालू लागली. रेखा धावत धावत बस पकडायला गेली. बसचा दांडा तिच्या हातात आला पण फुटबोर्डवर चढताना तिचा एक पाय घसरला. ती अर्धी फुटबोर्डवर आणि अर्धी खाली लटकू लागली. रेखाचा जीव खालीवर झाला. वाटलं आता सगळे संपले. पण तेवढ्यात एका राकट हाताने तिच्या कंबरेला विळखा घातला आणि तिला अलगद वर उचलून खेचले. रेखाची छाती धडधडत होती. तिचा श्वास जोरजोरात चालत होता. जीवनमरणाचा फक्त एका क्षणाचा तो खेळ होता. तिने थँक्स म्हणायला आपल्या उपकारकर्त्याकडे पाहिले, आणि ती पहातच बसली.

        एक रांगड्या व्यक्तिमत्वाचा, उंचपुरा, गोरा, घाऱ्या डोळ्यांचा आणि कपाळावर मस्त केसांची झुलपं असलेला तो एक तरुण होता. त्याने तिची पडलेली पिशवी उचलून तिला सीटवर बसायला मदत केली. तिची परवानगी घेऊन तो तिच्या बाजूच्याच सीटवर बसला. सहज रेखाचे त्याच्या हातांकडे लक्ष गेले तर त्याच्या हातातसुद्धा रेखाकडे असलेल्या कागदपत्रांच्या पिशवीसारखीच एक पिशवी होती. तिने त्याची चौकशी केली. त्याचे नांव प्रदीप होते. जवळच्याच एका शाळेत तोही शिक्षक होता. रेखाप्रमाणेच प्रदीपही मंत्रालयात कागदपत्रांवर सह्या आणायला चालला होता.

       तो संपूर्ण दिवस रेखा आणि प्रदीप एकत्र होते. मंत्रालयातून कागदपत्रांवर सह्या मिळायला फारच उशीर झाला. ते मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये जेवले. त्यांच्यात दिवसभर शाळेविषयी गप्पा झाल्या. तिने आडून आडून प्रदीपची चौकशी केली. तो अविवाहित होता. एके ठिकाणी पेईंगगेस्ट म्हणून रहात होता. घरी परत येताना ते एकत्रच आले. त्याने तिला तिच्या घराजवळ सोडले. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले. रेखाला तिची संगत प्रदीपच्या डोळ्यात आवडलेली दिसली.

         आणि तिचा होरा खरा ठरला. दोनच दिवसात प्रदीपचा सहजच तिच्या चौकशीचा फोन आला. आणि मग वरचेवर येत गेला. दोघं एकमेकांत मनाने गुंतत गेले. संध्याकाळचं एकत्र हिंडणेफिरणे होऊ लागले. प्रेमाच्या आणाभाका दिल्या आणि घेतल्या गेल्या. रेखाचे चांगलेचुंगले कपडे घालणे, प्रदीपसोबत हॉटेलिंग करणे होऊ लागले. आता तिचे मन शाळेत चांगलेच रमू लागले.

        असेच दोनचार महिने गेले, आणि अचानक एके दिवशी प्रदीपची संस्थेच्या दूरच्या शहरातील एका शाळेत बदली झाली. आता महिनोन्महिने त्यांची गाठभेट होत नव्हती. फोनवरच कधीतरी त्यांचे थोडेफार बोलणे होई. एकमेकांना भेटायला त्यांचा जीव तरसे.

       हळूहळू रेखाचे पूर्वीचे एकाकी आणि निरस जीवन पुन्हा सुरू झाले. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस ती प्रदीपच्याच विचारात रस्ता ओलांडत होती, आणि अचानक एका कारखाली ती येतायेता वाचली. कारने अगदी तिच्याजवळ येऊन ब्रेक मारला. पण तिला कारचा हलकासा धक्का लागलाच आणि ती रस्त्यावर तोल जाऊन पडली. लगेच कारमधून तीस बत्तीस वर्षाचा एक सुंदर आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण उतरला. त्याने रेखाला हाताचा आधार देऊन उभे केले. रस्त्यावर पडल्यामुळे तिच्या उजव्या पायाच्या ढोपराला फक्त थोडंसं खरचटलं होतं. अपघात पाहून आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. लोक तावातावाने त्या तरुणाला बोलू लागले. लगेच रेखाने आपलीच चूक असून आपण पूर्ण सुरक्षित असल्याचे लोकांना सांगितले. गर्दी पांगली. त्या कारवाल्या तरुणाने रेखाला डॉक्टरकडे उपचाराकरिता चलण्याची विनंती केली आणि तिला आपल्याच कारमध्ये बसवले. कारमध्ये त्या तरुणाची एक पाच वर्षांची गोड मुलगीही बसली होती. त्या तरुणाने रेखाला आपली ओळख संजय आणि आपल्या मुलीचं नांव निहारिका अशी करून दिली. संजयने रेखाला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्या जखमांवर मलमपट्टी करून तिला तिच्या घराजवळ आणून सोडले.

         रेखाचा गुढगा दुखत असल्याने ती शाळेत जाऊ शकत नव्हती. तिच्या तब्येतीची विचारपूस करायला संजय निहारिकाबरोबर रोज तिच्या घरी येत होता. निहारिका फार गोड मुलगी होती. ती नुकतीच शाळेत जायला लागली होती. ती आपल्या शाळेच्या गमती जमती रेखाला सांगून फार हसवत असे. त्या दोघांची लवकरच छान गट्टी जमली. पण संजयने जेव्हा सांगितले की तीची आई दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने वारली, तेव्हा रेखाला फार वाईट वाटले. संजयने रेखाला रोज संध्याकाळी एखादा तास निहारिकाच्या शाळेचा अभ्यास घ्यायला घरी येण्याची विनंती केली.
काही दिवसांनी रेखा रोज संध्याकाळी निहारिकाचा अभ्यास घ्यायला संजयच्या बंगल्यावर जाऊ लागली. बंगला श्रीमंत वस्तीत आणि राजेशाही होता. नोकर चाकर, दोन तीन गाड्या, सुखासीन वस्तूंनी परिपूर्ण होता. संजय पिढीजात श्रीमंत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तो दोन चार कंपन्यांचा एकुलता एक वारस होता. पण कंपन्यांची जबाबदारी व्यवस्थापकांवर टाकून मित्रमैत्रिणींबरोबर छानछौकी करण्यात, आयत्या मिळालेल्या श्रीमंतीचा उपभोग घेण्यातच त्याचा जास्त कल होता.

      रेखा निहारिकाचा अभ्यास घेतेवेळी संजय बर्याच वेळा घरी दिसे. कधी कधी निहारिकाच्या अभ्यासाच्या निमित्ताने रेखाशी बोलण्याचा प्रयत्न करे. कधी उशीर झाल्यास रेखाला कारने घरी सोडवे. काहीना काही निमित्ताने रेखाला महागड्या वस्तू भेटीदाखल देई. रविवारी रेखा आणि निहारिकाला तो बागेत फिरवून आणे. त्यांना कधी जेवायला हॉटेलात तर कधी सिनेमाला नेई.

        संजय आपल्याकडे आकृष्ट झालेला रेखाला स्पष्ट जाणवत होते. तिलाही हे सर्व हवेहवेसे वाटत होते. रेखाच्या घरची पिढीजात गरिबी असल्याने हे तिला सर्व नवे होते. आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण येतील याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिला आताशा प्रदीपची आठवणही येईनाशी झाली होती. मनातल्या मनात ती प्रदीप आणि संजयची तुलना करू लागली होती.

     आणि एक दिवस तिच्या अपेक्षेप्रमाणे संजयने तिला लग्नाची मागणी घातली. आईविना पोरकी झालेल्या निहारिकाला आईचा आधार देण्याची विनंती केली. रेखा जणू ह्याच क्षणाची वाट पहात होती. तिने त्याला आनंदाने होकार दिला. काही कारणाने संजयने सहा महिन्यानंतर लग्न करायचे ठरवले.

       आताशा प्रदीप रेखाच्या फोनवर तुटक बोलण्याने तर कधी फोन न उचलण्याने चिंतीत झाला होता. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. एक दिवस त्याने रजा काढून रेखाची भेट घेतली. रेखाने आपले लग्न ठरल्याचे सांगितले. प्रदीपने रेखाला आपल्या प्रेमाची आठवण करून दिली. पण रेखाने त्याच्याशी लग्न करून आयुष्यभर गरिबीचे चटके खात जगायला नकार दिला. भावनेच्या भरात वहावत गेल्याची आणि प्रदीपला शब्द देऊन बसल्याची तिने कबुली दिली. प्रदीप निराश होऊन आपल्या नोकरीच्या शहरी निघून गेला.

        रेखाचे आता संजयच्या घरी येणे जाणे वाढले. निहारिकाची काळजी घेण्याच्या निमित्ताने तिचे कधीकधी दोन दोन दिवस संजयच्या बंगल्यावर रहाणे होई. बऱ्याचदा संजय रात्री उशिरा घरी परते तेव्हा तिला त्याच्या तोंडाला दारू सिगरेटचा उग्र दर्प जाणवे. कधी त्याच्या मित्रमंडळींबरोबर बंगल्यावर पार्ट्या होत तेव्हा रेखाला काही हवं नको ते बघायला रात्री बंगल्यावर थांबायला लागे. रेखाला हे सर्व नाईलाजाने सहन करायला लागे.

      एक दिवस रेखा निहारिकाच्या शाळेच्या पिकनिकची तयारी करायला भल्या पहाटे संजयच्या बंगल्यावर पोहचली तेव्हा संजयच्या बेडरूममधून बाहेर पडणाऱ्या एका भडक हावभाव करणाऱ्या स्त्रीशी तिची गाठ पडली. रेखाला संजयच्या बाहेरख्यालीपणाची जाणीव झाली. तिने संजयला जाब विचारताच त्याने रेखापुढे सपशेल नांगी टाकली. पुन्हा असे न करण्याचे वचन दिले. रेखानेही झाल्यागोष्टीबद्दल संजयला माफ केले.

        पण एके दिवशी रेखाने पुन्हा एकदा संजयला एका बाजारू स्त्रीबरोबर मॉलमध्ये मजाहजा करताना पकडले. आता मात्र रेखाचे डोके भडकले. संजय घरी येताच तिने त्याला फैलावर घेतले. त्यावर संजयने तिलाच चार शब्द सुनावले. त्याचे राहणीमान असेच आहे आणि यापुढेही असेच राहील. निहारिका आणि बंगल्याचा सांभाळ करायला, घरी आल्यागेल्याचं बघायला कोणीतरी स्त्री हवी आहे म्हणून तो रेखाशी लग्न करतोय असे निर्लज्जपणे सांगून त्याच्या कारभारात अजिबात लक्ष घालू नकोस अशी रेखाला त्याने स्पष्ट तंबीच दिली.

         झाल्या प्रसंगाने रेखा कोसळून पडली. सुखी आणि श्रीमंत संसाराची तीने जी स्वप्ने पाहिली होती ती सर्व तिला भंगताना दिसू लागली. आपण संजयशी लग्न केले तर आपली त्या घरात फक्त मोलकरणीएवढीच लायकी असेल याची तिला जाणीव झाली. त्या घरात आपली काडीचीही किंमत असणार नाही हे तिला कळून चुकले. नवऱ्याचे प्रेम आणि सुख मिळणे ही तर दुरचीच गोष्ट राहिली.

        रेखाच्या मनात द्वंद्व सुरू झाले. विचार करकरून डोके फुटायला आले. आणि शेवटी तिला तिच्या मनानेच उत्तर दिले. संजयशी लग्न केल्याने मिळणाऱ्या श्रीमंतीपेक्षा तिला तिच्या गमवावे लागणाऱ्या स्वाभिमानाचे मोल जास्त असल्याचे समजून आले. तिने संजयशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले.

      आता रेखा परत एकटीच जीवन जगतेय. गेल्या वर्षभरात तिच्या आयुष्यात झालेल्या वादळाने ती कोलमडून पडलीय. रात्र रात्र ती बिछान्यात तळमळत असते. क्षणभरही डोळ्याला डोळा लागत नाही. स्वतःच्या गरीब परिस्थितीमुळे संजयच्या श्रीमंतीला भुलून रेखाने केलेल्या प्रदीपच्या प्रेमाच्या विश्वासघाताने ती स्वतःच्या मनातून पार उतरून गेलीय. आता ती सतत प्रदीपचाच विचार करीत असते. प्रदीपबरोबरचं आपलं वागणं चूक होतं की बरोबर याचा ती निर्णय करू शकत नाहीये. रेखाने ज्या संजयकरिता प्रदीपच्या प्रेमाचा अव्हेर केला, त्याच संजयला सोडण्याचे रेखाच्या नशिबी आले. नियतीने आपले एक वर्तुळ पूर्ण केले होते.