Thursday 29 December 2016

रिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू!!!



'मायबोली' या मराठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला माझा हा लेख.
          

          दरवर्षी नोव्हेंबर-डिसेम्बर मध्ये मी माझ्या कुटुंबाला घेऊन भारतातील रमणीय स्थळी सात-आठ दिवस पर्यटनाला जात असतो. पण ह्यावर्षी काही अपरिहार्य कारणामुळे आमचा पर्यटनाला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.

          काल संध्याकाळी मी आणि सौ. अशाच घरगुती गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा आमच्या ह्यावर्षी रद्द झालेल्या पर्यटनाचा विषय निघाला. तेव्हा मी पर्यटन रद्द केल्याने फार वाईट वाटतंय असं म्हणालो. त्यावर सौ. लगेच म्हणाली. "का वाईट वाटून घेताय? त्यात काय एवढं? आता नाही जमलं तर नंतर जाऊ. अजून काही वर्षांनी तुम्ही रिटायर झालात ना, कि आपण दोघं मस्त मज्जा करू. सगळीकडे हिंडू फिरू, खाऊ पिऊ, अगदी धम्माल करू."

          त्यावर मी विचार करू लागलो, खरंच कि! नाहीतरी मी काही वर्षांनी रिटायर होणारच आहे. तेव्हा मस्तपैकी भारतच नाही तर अख्खं जग फिरून येऊ. सगळीकडचे स्थानिक उत्तमोत्तम पदार्थ खाऊ. जोडीने हिमालय चढू. माझे पोहणे आणि सौ.चे गायन शिकायचे राहिलंय तेही शिकू. दोघं मिळून नर्मदा परिक्रमा करू. कामाच्या रामरगाड्यात नातेवाईकांशी संबंध दुरावलेत ते पुन्हा जुळवायचा प्रयत्न करू. नाटक, सिनेमा आणि संगीतमैफिलींचा धूमधडाका लाऊन टाकू. मी निवृत्त झाल्यावर आमच्या मनात राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करू. जोडीने अगदी मज्जा मज्जा करू.           मग पुन्हा माझ्या मनात विचार आला कि खरंच! मी निवृत्त झाल्यावर आम्ही ठरवलेल्या आमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू का? मी निवृत्त होईल तेव्हा आमच्या दोघांचं वय चांगलंच वाढलेलं असेल. आमचे हातपाय थकलेले असतील. विविध प्रकारची आजारपणं मागे लागलेली असतील. शरीराची इंद्रिये काम करेनाशी झालेली असतील. तेव्हा विविध प्रकारची व्यंजने खाऊ शकू का? जगभर फिरायला, नर्मदा परिक्रमा करायला, हिमालय चढायला, नातेवाईकांकडे जायला हातपाय साथ देतील का?

          कारण आपल्याला असे बरेच निवृत्त झालेले दिसतात. ज्यांचं निवृत्ती नंतरचं पहिलं वर्ष स्थिरस्थावर होण्यामध्ये जाते. पुढचं वर्ष उत्साहाने विविध उपक्रम अंमलात आणण्यात जाते. मग पुढील काही वर्षात हळूहळू विविध कारणांमुळे उत्साह मंदावत जाऊन, शेवटी येणारा रोजचा दिवस, पूर्ण दिवसभर घरी बसून खिडकीबाहेर शून्यात बघण्यात जात असतो          येथे मायबोलीवरील बरेच सभासद निवृत्त झालेले असतील. किंवा काही जणांचे आईवडील किंवा त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे लोकं निवृत्त झालेले असतील. अशा सभासदांना मला काही विचारायचंय. आपणांस अशा काही निवृत्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव माहित आहेत का? ज्यांनी निवृत्त व्हायच्या दोन पाच वर्षे अगोदर मनात काही इच्छा, योजना आखल्यात, कि आपण निवृत्त झाल्यावर हे करू आणि ते करू, आणि आता त्याप्रमाणे निवृत्त झाल्यावर, पूर्वी आपल्या मनात असलेल्या इच्छा, योजना विविध अडचणी येऊनही ते त्या अंमलात आणत आहेत किंवा त्यांनी त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत.           मला स्वतःला अशी दोन चार उदाहरणं माहित आहेत. त्यांच्या विषयी सांगतो. माझ्या ऑफिसमध्ये एक डिसुझा नावाचे सहकारी होते. त्यांना धार्मिक गोष्टींची आवड होती. पण नोकरीमुळे ते त्या गोष्टीला जास्त वेळ देऊ शकत नव्हते. आता निवृत्तीनंतर गेले काही वर्षे ते पूर्णवेळ धर्म प्रसारकाचे काम करत असतात. दुसऱ्या एका सहकाऱ्यांना कामगार कायद्यात रस होता. निवृत्तीनंतर ते आता अन्याय झालेल्या कामगारांना मोफत कायदे विषयक सल्ला देण्याचे काम करीत असतात. दुसरे एक माझे नातेवाईक होते. त्यांना पूर्वीपासून शेतीत रस होता. पण नोकरीमुळे शेती करणेे शक्यच नव्हते. पुढे निवृत्तीनंतर जमीन विकत घेऊन ते बरीच वर्षे शेती करीत होते.

          आपणांसहि अशा लोकांची उदाहरणे माहित असतीलच, ज्यांनी निवृत्तीनंतर नुसतं घरी बसून न राहता, आलेले दिवस ढकलत न राहता, आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य, त्यांनी नोकरी करत असताना पाहिलेल्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करण्यात खर्च केले. अशी उदाहरणे आपण येथे दिलीत तर जे यापुढे निवृत्त होणार असतील, त्यांना त्यातून काही बोध घेता येईल. अशां उदाहरणांतून त्यांना काही प्रमाणात दिलासा, नवीन कल्पना, हुरूप आणि स्फूर्ती मिळेल.

Sunday 25 December 2016

मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय करावे लागते?

'मायबोली' या मराठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला माझा हा लेख.


          नमस्कार, मी सचिन काळे. एक नवलेखक! वास्तविक एवढी वर्षे माझा साहित्यलेखनाशी कधी संबंध आला नव्हता. हो! शाळेत बालपणी तेवढे 'मी मोठेपणी शिक्षक/पंतप्रधान/वैज्ञानिक झालो तर!!!' छाप निबंध लिहिल्याचे तेवढे आठवते. आणि त्या निबंधात मी तोडलेले तारे, शिक्षकांच्या डोळ्यांपुढे चमकल्याचे अजूनही आठवते. तसेच, अजून एकदा एका छोकरीला पत्रलेखन करण्याचा माझा प्रयत्न त्या मुलीच्या बापाने हाणून पाडून माझ्यातल्या लेखकाचा/कवीचा अंत केला होता. ज्याचा दुर्दैवी परिणाम एवढे दिवस आपल्यासारख्या साहित्यरसिकांना माझ्याकडून भविष्यात होऊ शकणाऱ्या साहित्यरचनेपासून दूर ठेवण्यात झाला. असो!

          तर सांगायचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वर्षांच्या कालखंडानंतर माझ्या साहित्यरचनेच्या प्रसववेदना पुन्हा सुरु झाल्या आहेत. नुकतेच माझ्याकडून प्रसूत झालेले दोन-चार लेख मी माबोकरांसमोर ठेवले. आणि ते आवडल्याचेही आपण प्रतिक्रिया देऊन कळविलेत.

          आणि इथेच घात झाला कि हो!!! मला तर आता वाटायला लागलेय कि मी छान छान लेख पाडतोय. मी नवलेखक नाही तर आता लेखकच झालोय. विशेषतः 'श्री. प्रकाश घाटपांडे' यांनी माझ्या 'HORN - (NOT) OK - PLEASE' ह्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हटलेय कि "हा लेख कोणत्या तरी वर्तमानपत्रात छापून यायला हवा" अहो!, आता हीच 'हवा' माझ्या डोक्यात शिरलीय ना!!!

          मलाही आता वाटायला लागलेय, कि माझेही लेख वर्तमानपत्रात, मासिकांत छापून यायला हवेत. हजारो नाही, लाखों लोकांनी ते वाचावेत. वेगवेगळ्या साहित्यस्पर्धांत त्या लेखांना प्रथम पारितोषिक मिळावे. एखादा 'बुकर', 'नोबल' नको पण गेलाबाजार राज्यशासनाच्या पुरस्काराकरिता तरी माझ्या लेखांचा विचार व्हावा. माझ्या लेखांनी लोकांचे मतपरिवर्तन व्हावे. जगाला बदलून टाकावे.

          पण इथेच तर माझं घोडं पेंढ खातंय ना! आमचा उभा जन्म गेला खालमानेने खर्डेघाशी करण्यात. हे साहित्यविश्व मला नवे आहे. आपले लेखनसाहित्य चार लोकांसमोर कसे आणावे? मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय आणि कसे प्रयत्न करावेत? याची मला काहीच कल्पना नाही. म्हणून मी मायबाप मायबोलीकरांसमोर माझी झोळी पसरून आलोय. कृपया माझ्या झोळीत पुढील माहिती टाकावी.

          वर्तमानपत्रांत/मासिकांत/स्पर्धेत आपले लेख कसे छापून आणावेत? त्यांच्याशी संपर्क कसा करावा? त्यांच्या कार्यालयात आपणांस खेटा घालाव्या लागतात का? त्यांच्याशी ओळखी काढाव्या लागतात का? त्यांना आपले लेखनसाहित्य कशा स्वरूपात पाठवावे लागते? लिखित, छापील कि इमेलद्वारे? साहित्य पाठवताना आपण कोणकोणती काळजी घ्यावी? साहित्य छापून आणायच्या व्यवहारात कोणती आणि कशी फसवेगिरी होण्याची शक्यता असते? काही मानधन वगैरे मिळते का? कोणत्या प्रकारे मिळते? कि नुसत्याच लष्करी भाकऱ्या भाजाव्या लागतात?

          तूर्त एवढेच प्रश्न मी लिहिलेत. पण मला जसे अजून प्रश्न पडतील तसे मी इथे लिहीन. आणि मला खात्री आहे कि समस्त मायबोलीकर हे प्रश्न सोडवायला मला नक्कीच मदत करतील. हो, ना!!?





ता. क. - सद्या तरी माझ्या साहित्यलेखनाच्या प्रसिद्धीकरीता मी माझा www.sachinkale763.blogspot.com नावाचा एक 'ब्लॉग' चालू केलाय. कृपया, मला जमलाय का ते कळवावे. धन्यवाद.

आकडेबाज मिशावाला


          अहो, मी नुसतं ओळखीच्याच नाही, तर अनोळखी लोकांचेही कौतुक करतो. बिनधास्त!! सहज एक गंमत आठवली ती सांगतो. एकदा मी लोकलट्रेनने प्रवास करीत होतो. गाडीत अगदी तुरळक गर्दी होती. माझ्या समोरच्या सीटवर एक पंचविशीचा तरुण आपल्या मित्राबरोबर बसला होता. त्या तरुणाच्या मिशा देशभक्त 'चन्द्रशेखर आझाद'च्या फोटोत दाखवतात ना, अगदी तशा किंवा जुन्या चित्रपटात फेटा बांधलेल्या गावच्या पाटलाच्या दाखवतात ना, अगदी तशा आकडे काढलेल्या होत्या. जो तो त्याच्या मिशांकडे चोरून चोरून पहात होता. मी सुद्धा बराच वेळ त्याच्याकडे पहात होतो. माझं उतरायचं स्टेशन आलं. मी उठून दरवाजात जाऊन उभा राहीलो. पण मला त्याच्या मिशा आणि त्याचा रुबाब एव्हढा आवडला होता, कि मला काही राहवलं नाही. मी हात हलवून त्याचे लक्ष माझ्याकडे वेधले. पैलवान आपल्या मिशांवर फिरवतात, तशी हाताची उलटी मूठ माझ्या मिशांवर फिरवून त्याला दाखवली. मग त्याच्या मिशांकडे बोट दाखवून, त्याला आपण हाताने 'छान! छान!' चा इशारा करतो ना, तस्सा तर्जनी आणि अंगठ्याचा गोल करून, बाकी तीन बोटे उभे ठेऊन त्याला नाचवून दाखवली. त्याला कळले कि मी हाताच्या इशाऱ्याने त्याच्या मिशांचे कौतुक करतोय ते!! इतका काही लाजला ना म्हणता तो!! कि यंव रे यंव!!!

एखाद्याचे आपण कौतुक का करावे?



         मी तर म्हणेन एखाद्याचे कौतुक का करू नये? जरका दुसऱ्याचे कौतुक केल्याने आपलाच फायदा होत असेल, तर एखाद्याचे कौतुक जरूर करावे. आता तुम्ही म्हणाल यात कसला आलाय फायदा? उलट नुकसानच दिसतंय.

          बरोबर आहे. वरकरणी आपल्याला यात नुकसानच दिसतं. पण जेव्हा तुम्ही मनापासून कोणाचे तरी कौतुक कराल तेव्हा आपल्या मनात होणाऱ्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुम्हाला जाणवेल कि, कोणाचेहि कौतुक करताना आपले मन भरून येत असतं. आपलं मन उचंबळुन येत असतं. आपल्या मनात गोड लहरी उठू लागतात. मनाच्या एका वेगळ्याच हव्या हव्याश्या भावनेत आपण तरंगायला लागतो. काय सांगू , किती सांगू , किती बोलू असं होऊन जातं.

          कोणाचंहि कौतुक केल्यावर आपल्याला असं वाटतं, जसं एखादे सृष्टीसौन्दर्य पाहिल्यावर वाटतं. जसं आपल्या प्रियजनांची भेट झाल्यावर वाटतं. जसं आकाशातले विविध रंग बघितल्यावर वाटतं. जसं गाढ झोपी गेलेल्या बाळाला झोपेत खुद्कन हसताना पाहिल्यावर वाटतं. जसा मुसळधार पाऊस कोसळताना पाहून वाटतं. जसं कुठल्याही पक्ष्याच्या पिल्लाला गोंजारताना वाटतं.

          अगदी तसंच आणि त्याहीपेक्षा अजून जास्त गोड गोड काहीतरी वेगळंच वाटतं. आणि हि मनाची नशा जो कोणी अनुभवतो, तो ह्या नशेचा गुलाम होऊन जातो. आणि जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तो कोणाचे तरी कौतुक करून ह्या नशेचं रसपान करू पहातो.
 
          मग सांगा दुसऱ्याचं कौतुक करण्यात फायदा कोणाचा आहे? आपलाच ना!!!?

Friday 23 December 2016

माझा प्रवास - 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा.

 
       
          Good morning म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा सकाळी भेटतात तेव्हा एकमेकांना नम्रपणे अभिवादन करताना बोलला जाणारा आंग्ल भाषेतील शब्द. एकमेकांशी बोलण्याकरीता काहीतरी विषय असावा म्हणून सकाळच्या उल्हासपूर्ण वातावरणाचा आपल्या अभिवादनात समावेश केला असावा. आपण जेव्हा कोणत्याही, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींना सामोरे जातो तेव्हा संभाषणाची सुरवात कुठून करावी हा प्रश्न पडतो. खरं तर दोघांनाही थोडेफार अवघडल्यासारखे होत असते. तेव्हा झालेली कोंडी फोडण्याकरिता एकमेकांना 'Good morning' अर्थात 'आजची सकाळ किती सुंदर आहे!!!' असं एकमेकांशी बोलून संभाषणाची सुरवात केली जाते. तसेच आपण जेव्हा कोणालाही Good morning बोलतो, तेव्हा आपण त्याला हेसुद्धा दर्शवित असतो कि माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही किंतु नाही. माझे मन स्वच्छ आहे. मी तुझ्याशी कधीही बोलायला तयार आहे. आणि मला वाटतं, Good morning बोलण्याचा हाच मोठा फायदा आहे. आपले एकमेकांशी संभाषण लगेच मनमोकळ्या आणि आनंदी वातावरणाने सुरु होते.

          शाळा संपून जशी नोकरी सुरु झाली तसा ह्या Good morning शी माझा जास्त संबंध येऊ लागला. कामावरच्या सहकाऱ्यांशी आणि साहेबांशी बोलताना, बाहेरील समाजात वावरताना, सोसायटीतील लोकांत मिसळताना, कुठल्याही समारंभांंना उपस्थित राहताना, फोनवर बोलताना माझी Good morning ची देवाणघेवाण होऊ लागली. संभाषण सुरळीत आणि उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात होऊ लागले.

          असेच दिवस जात होते. कधीकधी मराठी माणूस भेटला तर तो 'नमस्कार' बोलून संभाषणाला सुरवात करी. पण माझ्या तोंडून 'Good morning' च निघत असे. का कोण जाणे 'नमस्कार' बोलायला संकोच वाटत असे. तसं बघा!, ट्रेन, टेबल, स्टेशन, ऑफिस, हॉर्न हे आंग्ल शब्द मराठीत एवढे रुळलेत कि आगगाडी, मेज, फलाट, कार्यालय, कर्णा असं बोलणं आता आपल्याला शक्यही होणार नाही. अगदी आपण हे शब्द रेटून जरी बोलू लागलो, तर इतर लोक आपणांकडे कोणी परग्रहवासी असल्यासारखे पाहू लागतील. हळूहळू मला वाटू लागलं कि 'नमस्कार' बोलायला आपणाला संकोच का वाटायला हवा. हा तर आपल्या मराठी मातृभाषेतला शब्द आहे. आपण लहानपणी शाळेत असल्यापासून हा शब्द शिकत आलो आहे. मग तो व्यवहारात वापरायला संकोच का वाटायला हवा. झालं! तेव्हापासून कोणाच्याही 'Good morning' ला प्रतिसाद मी प्रयत्नपूर्वक 'नमस्कार'ने देऊ लागलो. 'नमस्कार' म्हटल्याबरोबर समोरची व्यक्ती जराशी स्तब्ध होई. पण नंतर लगेच 'नमस्कार'ने प्रत्युत्तर देई. मला ते फार आवडे.

          हळूहळू मी 'नमस्कार' बोलायलाही रुळलो. मग एकदा असेच वाटले कि सकाळी सकाळी आपण लोकांना 'नमस्कार' ऐवजी 'सुप्रभात' म्हणून अभिवादन केले तर!!? 'सुप्रभात' म्हटले कि माझ्या डोळ्यापुढे तो डोंगराआडून उगवणारा सूर्य, झुळूझुळू वाहणारे ओढ्याचे पाणी, तो गाईचा गोठा आणि वासरू, नांगर खांद्यावर घेऊन जाणारा तो शेतकरी, ते वाऱ्यावर डोलणारे शेत, असं प्रसन्न वाटणारे चित्र उभे राहिले. मला तो 'सुप्रभात' शब्द खूप आवडला.

          मग काय! सकाळी सकाळी मला जोही भेटे त्याला मी 'सुप्रभात'ने अभिवादन करू लागलो. समोरासमोर असो कि फोनवर, कुठल्याही ठिकाणी माझ्या तोंडून 'सुप्रभात'च निघू लागले. आता कोणीही 'Good morning' बोलो, कि 'नमश्कार'! माझा मात्र 'सुप्रभात' ठरलेला असतो. 'सुप्रभात' म्हणताना माझ्या मनात कुठेतरी सुखावल्याची, आनंदाची भावना येते. आताशा माझ्या ऑफिसमध्ये मला पाहून सगळेच 'Good morning' ऐवजी 'सुप्रभात' स्वतःच आवर्जून म्हणतात. आणि मला खात्री आहे कि ते इतर ठिकाणीसुद्धा 'सुप्रभात'च म्हणत असतील.

          असा आहे माझा 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा प्रवास.

अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो


          अहो! असं रोखून काय पाहताय माझ्याकडे? मी फक्त 'वाटतो' असं लिहिलंय. साधा फुगा फोडायला घाबरणारा मी, माझी काय हिंमत दुसऱ्या कोणाचा मोबाईल फोडायची. मला आपलं त्या 'अर्चना सरकार' यांच्या 'त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो' ह्या शिर्षकावरून स्फुरण चढलं आणि देऊन टाकलं तसलंच डेअरिंगबाज शीर्षक माझ्या लेखाला. असो.
          तर माझ्या मनात असा अतिरेकी विचार का उगवला ते सांगतो. त्याचं काय ए, कि स्टेशनपासून घराकडे चालत जाताना आमच्याकडे सहा-सात फूट रुंदी असलेला, एकूण पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतराएवढा सरळसोट, लवकर न संपणारा, 'I' (आय) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे. माटुंगा स्टेशनच्या वर्कशॉपवर 'Z' (झेड) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे ना, अगदी तस्सा!

          आता होतं काय, कि त्या ब्रिजवर आपल्या पुढे किंवा मागे चालत असणारी व्यक्ती ब्रिज संपेपर्यंत पूर्ण पाच मिनिटे आपल्याबरोबरच चालत असते. आणि जरका ती व्यक्ती मोबाईलवर बोलत असेल तर आपली काही धडगत नसते. पूर्ण पाच मिनिटे त्यांचं मोबाईलवरचं संभाषण आपल्या कानावर पडत रहातं. ना तुम्ही कान बंद करू शकता, ना त्यांचं संभाषण ऐकणं टाळू शकता. गुमान त्यांचे बोलणे ऐकत चालण्याची शिक्षा भोगावी लागते.

          अहाहा!! काय ते एक से एक, भारी भारी संवाद कानी पडत असतात. मोबाईलवर बोलणारी ती व्यक्ती ज्या वयाची, वर्गाची, लिंगाची, व्यवसायाची, स्वभावाची, पदाची, नात्याची आणि अशा बऱ्याच गोष्टींची असेल, त्याप्रमाणे संवादाचं स्वरूप बदलत रहातं. ऐकता ऐकता हळूहळू मी त्यांच्या संवादात अडकू लागतो. त्यांच्या बोलण्यात मनोमन भाग घेऊ लागतो. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या रंगरूपाची, तिथल्या परिस्थितीची कल्पना करू लागतो. मग जसा संवाद चालू असेल तसा माझा मूड बनू लागतो.

         कधी शाळकरी मुलगा मोबाईलवर आपल्या सवंगड्याशी बोलत असतो "आज शाळेतून मी कल्टी मारलेली सरांच्या लक्षातच आले नाही" तेव्हा मला त्याच्या भविष्याची चिंता वाटायला लागते. कधी एखादा कॉलेजकुमार आपल्या मित्राशी बोलत असतो "तू डरता क्यों है बे! मेरा बाप लाखों में कमाता है" हे ऐकून मला देशाचे भविष्य काळवंडताना दिसू लागतं. एखादी कॉलेजकन्यका कोणालातरी "मी नाही ज्जा! चावट कुठला!" म्हणते तेव्हा माझे कान टवकारून उभे रहातात. एखादी गृहिणी "अगं मी बाकीचं नंतर सांगते, माझं बाळ घरी वाट पहात असेल गं" म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आईची वाट बघून झोपी गेलेले बाळ दिसू लागते. एखादी म्हातारी बोलताना "बाळा, तू कधी येणार रे घरी?" अशी साद घालते, तेव्हा तिचा लष्करातला जवान मुलगा सीमेवर तैनात असलेला मला दिसू लागतो. एखादा यू पी वाला "भैसवाँ को बछडा भई गवां का?" विचारतो तेव्हा मला तबेल्यात रवंथ करणाऱ्या म्हशी दिसू लागतात. एखादा सुटेड बुटेड साहेब जोरात ओरडतो "I don't know anything! मुझे सुबह तक सब पेपर्स मेरे टेबलपर चाहिए, मतलब चाहिए" ते ऐकल्यावर मला हाग्यादम देणारा माझा साहेब डोळ्यापुढे नाचू लागतो. एखादा सिंधी बेपारी बोलत असतो "अरे साईं, तुम घबरता क्यो है? कितना माल चाहिए, सिर्फ बोलो नी!" कि मला made in usa चा माल बनवणारे कारखाने आणि त्यात काम करणारे कामगार दिसू लागतात. एखादा कष्टकरी बिगारी कामगार बोलत असतो " बोल माये बोल! म्या ऐकून राह्यलोय" कि मला चुलीवर भाकर थापणारी त्याची माउली दिसू लागते.

          एव्हढ्या वर्षांत कोणाकोणाची संभाषणं माझ्या कानी पडलीयत ती! अजून किती किती सांगू? मी घरी जायच्या घाईत, आपल्याच विचारात ब्रिजवर चालत असतो. पोटात भूक आणि जीवाला घरची ओढ लागलेली असते. आपल्या अडचणी आपल्याला काय कमी असतात, त्यात हे वेगवेगळ्या लोकांचे मोबाईलवरचे संभाषण आपण ऐकत चालायचे? कंटाळलो हो मी ह्या सर्व संभाषणांना! (कंटाळले गं बाई मी ह्या केसांना! (प्रकाशचे माक्याचे तेल) च्या चालीवर वाचा!) काय करू? कुठे जाऊ? कोणाला सांगू? (सहन होईना आणि सांगताही येईना! च्या चालीवर वाचा!) मी तुम्हाला विचारतो. तुम्हालाही असले अनुभव आलेलेे असतीलच ना? तुम्हीसुद्धा कोणा मोबाईलवर बोलणाऱ्याच्या तावडीत सापडला असालच ना? आणि काही कारणाने सुटका न झाल्याने, तुम्हाला त्यांचं संभाषण मुकाट ऐकत बसावं लागलं असेलच ना? मग मला खात्री आहे. तेव्हा तुमच्याही मनात नक्की हाच विचार आलेला असेल, कि "अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो."

Thursday 22 December 2016

टॅटू, मावळा, भिंगरी इत्यादी इत्यादी.

           सकाळी कामावर जाताना मी रोज लोकलने प्रवास करतो. आमच्या स्टेशनवरूनच गाडी सुटते. मी नेहमी ज्या सीटवर बसतो, त्याच्या समोरच्या सीटवर खिडकीजवळ दोन प्रौढ व्यक्ती बसतात. आणि तिसऱ्या सीटवर साधारण चार वर्षाची एक गोड छोकरी, मस्तपैकी शाळेच्या कडक छोटुकल्या गणवेशात आपल्या पप्पांसोबत बसलेली असते. त्या चौघांची आधीचीच ओळख असावी. पप्पा मुलीला हाताला धरून घेऊन आले कि त्या प्रौढ व्यक्तींपैकी एकजण चॉकलेट काढून मुलीच्या हातावर प्रेमाने ठेवणार आणि ती मुलगी ते गट्टम करणार, हा रोजचा शिरस्ता.

          त्यादिवशी गाडी सुटायला अवकाश होता. मी आणि त्या प्रौढ व्यक्ती सीटवर स्थापन्न झालो होतो. थोड्यावेळाने पप्पा मुलीला घेऊन आले. बघतो तर मुलीचा चेहरा नुकताच रडून हिरमुसलेला. नेहमीप्रमाणे एका प्रौढ व्यक्तीने एक चॉकलेट काढून मुलीच्या हातावर ठेवले. मुलीचे काहीतरी बिनसलेले होते. ती चॉकलेट काही खाईना. विचारलं तर काही उत्तर देईना. आता काय करायचं? सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले. तेव्हढ्यात त्या प्रौढ व्यक्तींना काही आठवलं. आणि ते मुलीला म्हणाले. "बघ तुला एक गंमत दाखवतो." असं म्हणून त्यांनी तिच्या हातातले चॉकलेट घेतलं. त्याचं वेष्टन काढलं. आतमध्ये चॉकलेट आणि प्लास्टिकचा कुठलंसं चित्र असलेला एक छोटासा तुकडा होता. त्यांनी त्या तुकड्यावर असलेलं कसलंस पातळ आवरण काढून ते मुलीला म्हणाले "जरा तुझा हात पुढे कर बघू." मुलीने मुसमुसतच उजवा हात पुढे केला. त्यांनी तो तुकडा मुलीच्या मनगटाच्या थोडासा वर हातावर ठेवला. आणि त्यावर तळहाताचा थोडासा दाब देउन दोन तीन हलक्याशा चापट्या मारल्या. मग त्यांनी तो तुकडा हळुवारपणे उचलला. आणि मग बघतो तर काय? त्या मुलीच्या हातावर एका हसणाऱ्या जोकरचे एक छानपैकी रंगीत 'टॅटू' उमटलेले होते. ते पाहताच मुलीचा उदास चेहरा लगेच खुलला. रडका चेहरा जाऊन तिथे गोड हास्य उमटले. ती पप्पांना हात पुढे करून करून 'टॅटू' दाखवू लागली. आणि ते पाहून आम्हां सर्वांच्या चेहरयावर हसू उमटले.

          हे पाहून मला माझ्या लहानपणी चॉकलेटमध्ये मिळणाऱ्या 'टॅटूची' आठवण झाली. त्यावेळी हे तंत्र एवढं विकसित झालं नव्हतं. त्या टॅटूचा जो छोटा कागद मिळायचा. तो प्रथम पाण्यात भिजवायला लागायचा. मग तो ओला कागद मनगटाच्या वरच्या भागावर ठेऊन त्याला कितीतरी वेळ चापट्या मारीत आणि दाबीत बसायचे. मग बऱ्याच वेळाने तो कागद हळूच उचलला कि हातावर अस्पष्ट 'टॅटू' उमटलेला दिसायचा. ते बघूनच किती तो आम्हाला आनंद व्हायचा.

          पूर्वी साखरेत घोळलेल्या बडीशेपच्या छोट्या छोट्या रंगीत गोळ्यांच्या पुडीत प्लास्टिकच्या भिंगऱ्या मिळत. भिंगरी जमिनीवर जोऱ्यात फिरवून, आपण स्वतःहि जमिनीवर लोळून भिंगरीचे निरीक्षण करणे चालायचे. आणि मग कपडे मळवले म्हणून घरच्यांची बोलणी खायची. कधी त्या पूडीत प्लास्टिकच्या शिट्ट्याही येत. मग काय! आमची स्वारी दिवसभर शिट्ट्या वाजवत घरच्यांचे डोके उठवायची.

          चॉकलेट गोळ्यांच्या पूडीतच अशा छोट्या भेटी मिळत असे नाही तर भेटींमध्येच कधी कधी चॉकलेट किंवा गोळ्या भरलेल्या असत. मला आठवतंय, त्यावेळी आईस्क्रीमच्या कुठल्याशा नविन कंपनीने एका कडक प्लास्टिकच्या छोट्या पिवळ्या रंगाच्या चेंडूतच आईस्क्रीम भरून विकायला आणले होते. माझ्याजवळ असे कितीतरी प्लास्टिकचे चेंडू जमा झाले होते. आमचा क्रिकेटचा सराव अशा प्लास्टिकच्या चेंडूवरच पक्का झालेला आहे.

          तेव्हा प्लास्टिकचे स्टिकर हा प्रकार नवीनच आला होता. आता नक्की आठवत नाही, पण मला वाटते कुठल्यातरी सुपारीच्या पूडीत अगदी छोटे छोटे छान छान नक्षी असलेले स्टिकर मिळत. आम्ही ते स्टिकर मनगटी घड्याळाच्या काचेवर मधोमध लावून मिरवीत असू. अजून कशात तरी नेमप्लेटवर असायची ती प्लास्टिकची पांढरी ABCD अक्षरे मिळत. ती तर मी पुष्कळ जमा केली होती. आणि काही अक्षरे आपल्याकडे असलेल्यापैकी पुन्हा मिळाली तर ती मित्रांबरोबर अदलाबदली करायचो.

          कधी कधी चॉकलेट गोळ्यांबरोबर असलेल्या भेटी ह्या वेगळ्या दिल्या जात. ह्या भेटी म्हणजे हिरो हिरोईनचे फोटो, क्रिकेटर्सचे फोटो. प्राणी, पक्षी यांच्या छोट्या प्रतिकृती असत. एकदा मला शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांच्या छोट्या प्लास्टिकच्या बाहुल्या भेट म्हणून मिळाल्याचे आठवते. दिवाळीत मी त्यांना शिवाजीच्या किल्ल्याच्या रक्षणाकरीता उभे केले होते.

          आता मागे वळून पहाताना असे जाणवते कि चॉकलेट गोळ्यांबरोबर मिळणाऱ्या ह्या छोट्या छोट्या भेटींनी आम्हाला बालपणी फार आनंद मिळवून दिला. चॉकलेट गोळ्या खाण्यापेक्षा त्याबरोबर भेट मिळणाऱ्या वस्तूंचेच आकर्षण अधिक असायचे. निरनिराळ्या भेटी जमा करताना मित्रांबरोबर भांडणंही केलीत. मित्रांकडच्या भेटी अजाणतेपणी ढापल्याही आहेत. तर काही आवडत्या मित्रमैत्रिणींना भेट म्हणून देऊन त्यांच्यावर जीवही लावला आहे. मानवी जीवनाचे वेगवेगळे गुणविशेष आहेत. जसे कि संग्रह करणे, वस्तूंच्या निरीक्षणातून आकलन करणे, परोपकार करणे, हेवेदावे करणे, मित्रमैत्रिणींला जीव लावणे, खेळ खेळणे. आपल्या जीवनात ह्या सर्व गुणांचे संवर्धन करण्यात बालपणी चॉकलेट गोळ्यांबरोबर मिळणाऱ्या ह्या अनमोल भेटींचा मोलाचा वाटा मला नक्कीच वाटतो.       







दूरदर्शनवरील 'रामायण' मालिकेची एक आठवण.


         
          पूर्वी दर रविवारी सकाळी दूरदर्शनवर रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका लागायची. ह्या मालिकेत जो सीन फक्त पाच मिनिटात दाखवून संपू शकतो, त्याला एवढं लांबण लावायचे कि एक अख्खा एक तासाचा एपिसोड त्यावर खर्ची पडायचा. मला आठवतंय, सर्वांना कल्पना आली होती कि आता पुढच्या एपिसोडमध्ये रावणवध होणार. रावणवध पहायला अवघा देश लागोपाठ पाच-सहा रविवार टीव्हीपुढे नजर लाऊन बसला होता. पण सागरसाहेब प्रत्येक वेळी रावणाला पुढच्या एपिसोडचं जीवदान द्यायचे. अखेर मग प्रसारमाध्यमात सर्वांना कळवून एका रविवारी 'रावणवधाचा' दिवस मुक्रर करण्यात आला. त्या रविवारी सर्व लहानथोर मंडळी टीव्ही पुढे जागा पकडून बसले होते. एका तासाकरीता अख्ख्या देशाचा व्यवहार बंद पडला होता. जे घराबाहेर होते, त्यांनी रावणवध पहायला जवळपासच्या अनोळखी असलेल्या घराचा आसरा घेतला होता. आणि त्यांना कोणी नकोसुद्धा म्हटले नव्हते. आपण पाणी पाजण्याचं पुण्यकर्म करतो तसं लोकांनी त्यांना 'रावणवध' दाखवण्याचं पुण्य पदरात पाडून घेतले होतं.आणि असा पाच सहा एपिसोड खर्चून एकदाचा रावणवध पार पडला.

          'रामायणात' लांबण कसे लावायचे ह्याचा अजून एक किस्सा सांगतो. सुग्रीव वालीला युद्धाचे आव्हान देण्याकरिता त्याच्या गुहेपुढे जाऊन त्याला लढायला बाहेर बोलावतो असा सीन होता. वास्तविक दोन तीनदा हाक ऐकल्यावर वाली बाहेर येऊन एका मिनिटात सीन संपणे अपेक्षित होते. पण येथे सुग्रीव किती वेळा आणि कसा हाका मारतो पहा. "वाली! बाहर आओ वाली! वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली! वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली! वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली! " एपिसोडचे जवळ जवळ दहा मिनिटे सुग्रीवाने वालीला नुसत्या हाका मारण्यातच खर्च केले होते. बरं त्या हाकाही ऐकून ऐकून आमच्या डोक्यात एव्हढ्या घुमायला लागल्या होत्या कि दुसऱ्या दिवशी शाळेत आम्ही पोरं एकमेकांना "वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली!" असं बोलून बोलून एव्हढी मज्जा घेतली होती कि विचारू नका! संपूर्ण शाळेत सर्व मुले एकच डायलॉग एकमेकांना बोलत होते. "वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली!"

          तुम्ही म्हणाल, मी सुद्धा येथे लांबण लावलीय, म्हणून आवरतं घेतो.

Wednesday 21 December 2016

HORN - (NOT) OK - PLEASE

         

          तुम्ही लेखाचं शीर्षक पुन्हा वाचून पाहिलंत ना? अहो, वाक्य चुकलेलं नाहीए. तुम्ही बरोबरच वाचलंय. OK च्या अगोदर मी NOT टाकलाय. NOT म्हणजे नाही, नको! झालंय काय कि 'HORN OK PLEASE 'ह्या वाक्याची लोकांना एवढी सवय झालीय कि सर्वांना वाटायला लागलंय कि HORN वाजवणं OK आहे. हॉर्न वाजवायला सर्वांचीच संमती आहे. कुठेही कधीही आपल्याला हॉर्न वाजवायचा परवानाच मिळालाय. त्यावर पुन्हा पुढे PLEASE चं आर्जव लावलंय. म्हणजे अगदी हातापाया पडून "हॉर्न वाजवा हो वाजवा" असं म्हटल्याचा फिल येतोय.

          हॉर्नचा इंग्रजीत अर्थ आहे, प्राण्यांचं शिंग. पूर्वीच्या काळी प्राण्यांचं पोकळ शिंग मिळवून त्यात जोरात हवा फुंकून ते वाजवलं जाई. आठवलं का? आपल्याकडे युद्धाचे रणशिंग फुंकले असा वाक्प्रचार आहे. मग कालांतराने पितळी धातूचे शिंग (बिगुल) बनवून ते फुंकून वाजवण्याची प्रथा आली. आणि आता त्याच शिंगांचे आधुनिक रूप वाहनात बसवलेय. पण नांव तेच राहिले. अहो कुठलं काय विचारता? HORN!

          हॉर्न वाजवण्याचं बाळकडू आपल्या आईवडिलांनीच आपल्याला आपल्या लहानपणी पाजलेलं असतं. आठवा तो प्लास्टिकचा बिगुल नाहीतर पिपाणी, जी आपण बेंबीच्या देठापासून फुंकत फुंकत सारी गल्ली डोक्यावर घेत असू. बालपणी झालेल्या सरावामुळेच आता जो तो हॉर्न वाजवत रस्त्यांवरच्या रणांगणावर जीवनाची लढाई लढायला सज्ज झालाय.

          आता हेच पहा ना! क्रॉसिंगला लाल सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत सर्व वाहनं थांबलेली असतात. आणि जसा लाल सिग्नल हिरवा होतो. जो तो हॉर्न वाजवायला सुरु करतो. जसं सर्व म्हणताहेत, "निघा! निघा! लवकर निघा! हिरवा सिग्नल पुन्हा लाल व्हायच्या अगोदर पुढे सटका." आणि चुकून त्यात जरका काही कारणाने एखाद्याने गाडी उचलायला थोडा जरी जास्त वेळ लावला, तर मागचे सर्व हॉर्नचा आरडा ओरडा करून रस्त्याला रणांगणाचे स्वरूप आणतात. तर कधी रिकामी रिक्षा असलेला रिक्षाचालक रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येक पादचाऱ्याच्या मागून पीss पीss असा हॉर्न मारून त्यांच्यात आपला भावी पाशींजर शोधत आपल्या पोटापाण्याची लढाई लढत असतो.

          अजून एक गंमत सांगतो. ज्या गोष्टी माणसांनी आपल्या तोंडाने बोलायच्या असतात त्याकरता लोकं आजकाल हॉर्नच्या गोंगाटाचा कसा वापर करायला लागलेत ते पहा! मुलांना शाळेत पोहचवणारे ते रिक्षावाले काका! बिल्डिंगच्या खाली आले, कि रिक्षाचा पीss पीss हॉर्न वाजवून बाळाच्या आईला जणू ओरडून सांगत असतात. "आणा!आणा! बाळाला लवकर खाली आणा. शाळेत जायला उशीर होतोय. एखादा हिरो आपल्या मित्र नाहीतर मैत्रिणीला बिल्डिंगच्या खाली येऊन जोरजोराने हॉर्न वाजवून सांगत असतो "ए! चल आटप लवकर. पिक्चरला जायला उशीर होतोय आपल्याला" तर कधी पिकनिकला जाणारे तयार होऊन गाडीत बसलेले अर्धे जण बाकीच्यांना हॉर्न वाजवून, जोरजोरात ओरडून सांगत असतात "ए आटपा रे लवकर! आमचा पिकनिकचा मूड घालवू नका" रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या कॉलेज कन्यकेच्या मागून येऊन एखादा मोटरसायकलस्वार कॉलेजकुमार मुद्दाम हॉर्न वाजवून तिचे लक्ष वेधायचा प्रयत्न करून जणू म्हणत असतो "अगं सुंदरी! तुझ्या नजरेच्या फक्त एका कटाक्षाला मी आसुसलोय गं!" अहो! मला वाटतं, अशा हॉर्न वाजवून बोलणाऱ्या लोकांना नक्की वाटत असेल कि ह्या हॉर्नला बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं. कमीतकमी पीss पीss पोंss पोंss असा हॉर्नचा विचित्र आवाज तर नसते काढत बसायला लागले असते.

          जगात शौकीन लोकं पुष्कळ दिसतात. त्यामध्ये नवनवीन प्रकारच्या हॉर्नचा शौक करणारेही दिसून येतात. त्यात पहिल्या प्रकारचे शौकीन येतात, ज्यांना वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने दिलेला हॉर्नचा आवाज पसंत नसतो. पुळचट आवाज वाटतो त्यांना तो! मग काय! नेतात वाहन कारागिराकडे आणि वाढवून आणतात त्याचा आवाज. आणि बोंबलत फिरतात, दणकट आवाज काढत गावभर.दुसऱ्या प्रकारचे तेे शौकीन असतात, ज्यांना वेगवेगळे आवाज काढणारे हॉर्न आवडतात. उदाहरणार्थ डुक्कर हॉर्न, गाढव हॉर्न, पिपाणी हॉर्न. कोणी बेसावध असताना मागून असा हॉर्न वाजवला तर तो जागच्या जागी फूटभर उडालाच पाहिजे. त्यातल्या त्यात आवाजाची रेंज वाढत जाणारे हॉर्न, म्युसिकल हॉर्न ऐकायला थोडंफार सहनेबल आहेत. पण हायवेवरच्या काही ट्रकड्रायव्हरने लावलेले प्रेशर हॉर्न! बापरे बाप! आवाजाने आपला कान फुटला नाही तरी बधिर नक्की होणार ह्याची पक्की ग्यारंटी मी लिहून देतो.

          आणि ते रिव्हर्स हॉर्न! अरारा! आणि त्यातली ती किंचाळणारी गाणी! सगळ्यात फेमस गाणं म्हणजे, मेरा मन डोssले, मेरा तन डोssले! वाहनांच्या पुढच्या हॉर्नचा त्रास काय कमी होता जो मागच्या बाजूला अजून एक लाऊन ठेवला. रात्री बेरात्री बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गाडया लावणाऱ्यांचे रिव्हर्स हॉर्नचे आवाज, नाहीतर पहाटे दोन तीन वाजता कॉलसेंटरमध्ये काम करणार्यांना सोडायला आलेल्या गाड्यांच्या रिव्हर्स हॉर्नचे आवाज, सोसायटीत आपल्या बिछान्यात गाढ झोपलेल्या लोकांच्या झोपेचं पार खोबरं करून टाकतात बुवा हे लोक!

          काही वर्षांपूर्वी कोणा एका विद्यार्थ्याने एक प्रिपेड पद्धतीचा हॉर्न बनवला होता. आपण जसं मोबाईलमध्ये जेवढ्या रुपयांचा टॉकटाईम टाकतो तेवढाच वेळ आपणांस बोलता येते. तसंच त्या हॉर्नमध्ये जेवढ्या रुपयांचा आपण रिचार्ज करू, तेवढाच वेळ तो हॉर्न वाजू शकत होता. त्यावेळी तो प्रयोग काळाच्या पुढे होता. मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबजावणी करणे शक्य नव्हते. पण आता जरका अशा प्रीपेड हॉर्नचं उत्पादन केले आणि सरकारने तो सर्वांना आपल्या वाहनावर लावण्याची सक्ती केली, तर आपले जास्त पैसे खर्च होतील ह्या भीतीने लोकं हॉर्नचा सांभाळून वापर करतील आणि लोकांच्या विनाकारण हॉर्न वाजवण्याच्या सवयींवर आपोआप नियंत्रण येईल.

          मला ट्रॅव्हलस् बसचा असा एक ड्रायव्हर माहित आहे, ज्याला एकदा 'No honking zone' मध्ये हॉर्न वाजवला म्हणून पोलिसाने पकडले होते. तेव्हा त्याने शपथ घेतली होती कि मी कधीही शहरात प्रवेश केल्यावर हॉर्न वाजवणार नाही. आणि आजपर्यंत तो आपण घेतलेली शपथ पाळत आलेला आहे. विशेष म्हणजे, शहरात हॉर्न वाजवत नसल्याने त्याचे आजपर्यंत काहीही बिघडलेले नाही.

          वाहनांना हॉर्न असूच नये असे माझे काही म्हणणे नाही. वाहनांना हॉर्न जरूर असावा. सर्वांच्याच सुरक्षिततेच्या दृष्टीने तो जरुरीच आहे. पण तो वाजवताना काहीतरी तारतम्य निश्चितच बाळगले जावे. हॉर्नचा कमीतकमी वापर होईल हे बघितले जावे, जेणेकरून ध्वनीप्रदूषण आटोक्यात राहील. हॉर्न वाजवण्याची गरज भासेल तेव्हा आपल्या वाहनाचा वेग कमी करून हॉर्न वाजवणे टाळता येईल. अहो, आपल्या वाहनाचाच आवाज एवढा येत असतो कि पादचाऱ्याला अगोदरच माहित असते कि आपले वाहन मागून येत आहे. ध्वनीप्रदूषण आटोक्यात ठेऊन, लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखणे हे आपल्यासारख्या सुबुद्ध नागरिकांचे कर्तव्यच नाही का?