Monday, 19 June 2017

आठवणींच्या हिंदोळ्यावर! (पुरवणी लेख)          मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.

          हे सांगण्याकरिता मी मूळ लेखावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला हा  पुरवणी लेख लिहिण्याचा विचार करावा लागला.

          <<< त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे >>> हे सर्व अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे वर्णन आहे. तेव्हा मी ६-८ वीत असेन. आमच्या बिल्डिंगमध्ये माझ्याच वयाचा माझा मित्र होता. बऱ्याचवेळा त्याच्याबरोबर मी आमच्या घराजवळील उडूप्याच्या हॉटेलमध्ये डोसा खायला जात असे. त्याकाळात आणि त्यावयात तीच आमची छानछौकीची कल्पना होती. त्यावेळी डोश्याबरोबर मिळणारा सांबार आणि चटणी पुन्हा मागितली असता त्याला एक्सट्रा चार्ज लागत नसे. पण सांबारची वाटी चमचा बुडेल इतपतच छोटी असायची. तसेच चटणीची वाटीसुद्धा छोटी आणि चपटी असे. पुन्हा सांबार मागितला असता मोठ्या भांड्यातून आपल्या टेबलावर असलेल्या वाटीतच चमच्याने सांबार दिला जाई. पण चटणीची वाटी प्रत्येकवेळी नवीन दिली जाई. साहजिकच चटणी आमची आवडती असल्याने आम्ही सहा सात वाट्या सहजच चापायचो. आणि टेबलावर बाजूला वाट्यांची चळत उभी करायचो. जितक्यावेळा चटणी मागवू तितक्यावेळा बिचाऱ्या वेटरला हेलपाटे पडत. त्यामुळे तो काही न बोलता आमच्याकडे खुन्नसने पाही. नाहीतर बोलवूनसुद्धा दुसरीकडे बघत आमच्याकडे दुर्लक्ष करी. आजही मला त्याचा रागाने भरलेला चेहरा आठवतोय. बरं! चूक की बरोबर हे समजण्याचं आमचं तेव्हा वयही नव्हतं. कदाचित आमच्यासारख्यांच्या त्रासानेच पुढील एकदोन वर्षातच हॉटेल असोसिएशनने एक्सट्रा सांबार आणि चटणीचा जादा चार्ज घ्यायला सुरुवात केली. खी:, खी:, खी:,

          <<< मी मुद्दाम इराण्यांची हॉटेलं कुठे दिसतात का ते बघत होतो. त्या हॉटेलांमध्ये असलेली पैसे टाकून गाण्यांची रेकॉर्ड ऐकायची मशीन मला आठवली >>> त्याकाळी, १९७५-७७ साली मुंबईत सर्व नाक्या नाक्यांवर इराण्यांची हॉटेलं होती. ती चांगलीच ऐसपैस असायची. गिर्हाईकांना कितीही वेळ हॉटेलात बसायची मुभा असायची. त्या हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात एक मोठ्ठा रेकॉर्डप्लेयर ठेवलेला असे. तुम्ही शुभ्रधवल सिनेमामधील गाण्यांमध्ये मोठ्ठा पियानो बघितला असेलच ना!! ज्यावर नायक किंवा नायिका विरहगीत आळवताना दिसत. अगदी तसाच तो रेकॉर्डप्लेयर असे. ज्यावर वरील काचेमध्ये साधारण पन्नासएक काळ्या रंगाच्या रेकॉर्ड लायनीत खोचलेल्या असत. त्याखाली त्या रेकॉर्डवरील गाण्याची माहिती आणि नंबर चिकटवलेला एक रोलर असे. आपल्या आवडीच्या गाण्याच्या नंबर आपण बाजूला असलेल्या बटनावर दाबायचा आणि बाजूला असलेल्या खाचेत चार आण्याचे नाणे टाकायचे. की लगेच रेकॉर्डप्लेयरची मशीन त्या नंबरची रेकॉर्ड बरोबर शोधून गाणे वाजवत असे. त्या रेकॉर्डप्लेयरमध्येच आतमध्ये मोठ्ठे स्पीकर बसवलेले असत. गाण्याचा आवाज पूर्ण हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरपर्यंत पोहचे. आम्ही लहान मुलं रस्त्यावर उभे राहून हॉटेलात वाकून वाकून रेकॉर्डप्लेयरच्या मशीनची कारागिरी पहात आणि फुकटची गाणी ऐकत असू. त्याकाळी इराण्यांच्या हॉटेलातील हा रेकॉर्डप्लेयर गिर्हाईक खेचण्याकरीता एक मोठाच आकर्षणाचा भाग होता.

          <<< जुनी थिएटरं पाहून तिथे तिथे अवघ्या तीन रुपये तिकिटात पाहिलेले पिक्चर मला आठवत होते. पिक्चरची तिकिटे काढायला मी तिथे लावलेल्या रांगा आणि दबलेल्या आवाजात तीन का चार म्हणत फिरणारे ब्लॅकवाले आठवत होते. >>> १९७५-७७ साली आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एक थिएटर होते. त्याकाळी थिएटरमध्ये स्टॉल, अप्परस्टॉल आणि बाल्कनी अशी रचना असे. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचे दर अनुक्रमे तीन रुपये, तीन रुपये तीस पैसे आणि तीन रुपये साठ पैसे असे असत. बाल्कनीत बसणारा प्रेक्षक उच्चभ्रू समजला जाई. त्यावेळच्या सर्व लहानथोरांप्रमाणे मलाही सिनेमाचा नाद होता. मी बऱ्याचदा ऍडव्हान्स बुकींग करून सिनेमा पाही. दोन दिवसांनंतरचं तिकिट मिळालेले असेल तरी ते दोन दिवस सिनेमा पहायच्या उत्सुकतेने आणि गोड हुरहुरीने निघत. कोणीही पुढे घुसू नये म्हणून तिकीट काढण्याकरिता असलेली रांग तिन्ही बाजूने लोखंडाची जाळी लावून बंद केलेली असे. तरीही रोजचे ब्लॅक करणारे जबरदस्तीने जाळीवर उलटे लटकून रांग मोडून पुढे जाऊन तिकीट काढत. एकदा आठवते मी जाळीच्या आत रांगेत उभा असतेवेळी ब्लॅकवाल्यांची थिएटर मॅनेजरशी काहीतरी बाचाबाची झाली आणि त्यांनी लांबून रांगेवर जोरात दगडफेक करायला सुरवात केली. मी रांगेत जाळीच्या आत अडकलो होतो. मला कुठेही पळता येत नव्हते आणि वरून जाळीवर दणादण मोठमोठे दगड पडत होते. तेव्हा नशिबानेच मी थोडक्यात बचावलो होतो.

          ह्या संबंधीचा मूळ लेख आपणांस पुढील लिंकवर टिचकी मारून वाचता येईल.

http://sachinkale763.blogspot.in/2017/06/blog-post_18.html?m=1

Sunday, 18 June 2017

आठवणींच्या हिंदोळ्यावर! अर्थात, ये है मुंबई मेरी जान!          माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती.

          जसे सायन मागे पडले आणि माझ्या ओळखीची मुंबईतली जुनी ठिकाणे जसजशी दृष्टीस पडू लागली, तसतशा माझ्या त्यासंबंधीच्या सर्व जुन्या आठवणी उचंबळून येऊ लागल्या. रस्त्याकडेच्या पूर्वीच्या जुन्या बिल्डींगी, दुकाने, बागा, पूल, चौक, हॉटेल, थिएटर पाहून जीव थोडा थोडा होऊ लागला. बस ट्राफिकमध्ये हळूहळू चालत होती आणि मी मान वळवून वळवून बाहेरील दृश्य पहात होतो. सारखं मनातून वाटायचं, अरे! इथे तर ते होतं, कुठे गेलं!!!? आणि इथे हे काय नवीन झालंय. पूर्वीचं ते शोधायला माझी नजर सारखी भिरभिरत होती.

          मी उजवी डावीकडे दिसणाऱ्या जुन्या गल्ल्या डोळे भरून पहात होतो. त्या गल्ल्यांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर दाखवले जाणारे सिनेमे पहायला रात्र रात्र मी उंडारलेलो आठवत होतो. काही बसस्टॉप तर वर्षानुवर्षे त्याच जागेवर अगदी तस्सेच ठाण मांडून होते. तर काहींचा सुंदर चकचकीत कायापालट झालेला होता. आता वाहतुकीच्या इतर पुष्कळ साधनसुविधा झाल्याने बसस्टॉपवर मात्र तुरळक गर्दी दिसत होती. मला बसस्टॉपवर असणारी पूर्वीची गर्दी आठवली. बस आली की तिच्यावर गुळाला मुंगळे चिटकावेत तसे माणसे तुटून पडत. काही हॉटेलं तर अजूनही एवढी वर्षे झाली तरी तिथल्या तिथेच होती. त्यातल्या एका हॉटेलात जाऊन मला मालकाला सांगावेसे वाटले, की "तुम्हाला माहितेय का? त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे." मला एवढी फुकटची चटणी खाताना पाहून एक वेटर बिचारा मी हाक मारली तर मला अजून द्यावी लागेल म्हणून तोंड फिरवून उभा रहायचा. मी मुद्दाम इराण्यांची हॉटेलं कुठे दिसतात का ते बघत होतो. पण ती काही दिसली नाहीत. त्या हॉटेलांमध्ये असलेली पैसे टाकून गाण्यांची रेकॉर्ड ऐकायची मशीन मला आठवली. जुनी थिएटरं पाहून तिथे तिथे अवघ्या तीन रुपये तिकिटात पाहिलेले पिक्चर मला आठवत होते. पिक्चरची तिकिटे काढायला मी तिथे लावलेल्या रांगा आणि दबलेल्या आवाजात तीन का चार म्हणत फिरणारे ब्लॅकवाले आठवत होते. काही थिएटर गायब झालेले पाहून वाईट वाटत होतं.

          रस्त्याच्या बाजूला दिसणाऱ्या पूर्वीच्या काही सरकारी इमारती आणि पोलीसस्टेशन्स अजूनही तिथल्या तिथेच आणि त्याच ऐतिहासिक अवस्थेत दिसले. ते पाहून त्यांच्याशी माझी जुनीच ओळख असल्यासारखे वाटले. तिथे कामानिमित्त मी मारलेले हेलपाटे मला आठवले. पूर्वीच्या दोनतीन मजली इमारतींऐवजी आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या टोलेजंग रहिवासी इमारतींची संख्या भरमसाठ वाढलेली दिसली. चौकातल्या काही बागा मोठ्या कंपन्यांनी प्रायोजित केल्याने अजूनही सुशोभित केलेल्या दिसल्या. पूर्वी त्या बागा शुष्क आणि चुकार, समाजकंटक मंडळींचा अड्डा असत. म्युनिसिपल इस्पितळं मात्र पूर्वी होती तशीच बकाल दिसली. गिरणकाळापासून असलेल्या लाकडाच्या चाळी एक दोनच दिसल्या. बाकीच्या सर्व नामशेष होऊन त्याठिकाणी बिल्डिंगची खुराडी उभी राहिली होती.

          एक मैदान अजूनही तसंच टिकून होतं. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती. रस्त्यावरच्या सिग्नलची संख्या बरीच वाढलेली होती. एका सिग्नलवर तर तीन वेळा सिग्नल हिरवा होऊन पुन्हा लाल झाला, पण माझी बस काही तो पार करू शकली नाही, एवढी ट्राफिक जाम होती. पण रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांची शिस्त वाखाणण्याजोगी वाटली. पूर्वी सगळीकडे लोकांची अनिर्बंध गर्दी जाणवे. मुंबईत उड्डाणपूलांची संख्या वाढलेली दिसली. बस उड्डाणपूलावरून जाताना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षित कठडे लावल्याचे दिसले. पूर्वी हे कठडे उंचीला फारच छोटे होते. बऱ्याचदा वाहने त्या बुटक्या कठड्यांना धडकत. त्यावरून मला मुंबईतला जे. जे. चा पहिला उड्डाणपूल आठवला, जो बांधकाम चालू असतेवेळीच कोसळला होता. खडापारशीचा पुतळा पाहून गहिवरलो. रस्त्यावर अजून काही पूर्वीचे पुतळे दिसले नाहीत. राजकीय पार्ट्यांचे एखाददुसरे फलक दिसले. पूर्वी रस्त्याच्या दोन्हीकडील इमारतींच्या भिंती राजकीय घोषणांनी रंगवून बरबटलेल्या असत. एक मात्र खरे! रस्त्यावर कचऱ्याचे ढीग काही दिसले नाहीत. पूर्वीच्यापेक्षा आता रस्ते फारच स्वच्छ आणि सुंदर होते.

          पेट्रोलपंप तर अजूनही पूर्वी होते तेवढेच आणि त्याच ठिकाणी कार्यरत होते. ह्या पंपांवर मी स्कुटरमध्ये पेट्रोल भरायला जायचो तेव्हा आसमंतात भरून राहिलेल्या पेट्रोलच्या वासाच्या आठवणीने आज मला पुन्हा धुंद करून सोडले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडांची संख्या पूर्वी होती तेवढीच आजही दिसली. काही मोजक्या ठिकाणी अजूनही टिकून असलेल्या पूर्वीच्या नावाजलेल्या कंपन्यांच्या आणि वर्कशॉपच्या प्रवेशद्वारांच्या पुन्हा दर्शनानेच माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. एवढी वर्षे खोदादादसर्कल जमिनीवरून पहात आलो, आज उड्डाणपुलावरून बर्ड व्हीव्युने पहायला मिळाले. पूर्वी दरवर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने तुंबणारी तीच ती ठिकाणे पुन्हा पाहून त्या पाण्यात मी अडकलेल्या दिवसांची आठवण आली.

          असाच मजल दरमजल करीत मी तब्बल दोन तासांनी कफपरेड येथे पोहोचलो. पण खरं सांगू!? मला ह्या प्रवासात अवघे दोन मिनीटेही कंटाळा आला नाही. हा प्रवास मी अनुभवलेल्या माझ्या जुन्या मुंबईची आठवण माझ्या मनात पुन्हा जिवंत करून गेला. बसमधून उतरताना मी मनातल्या मनात समाधानाने गुणगुणत होतो. "जरा हटके, जरा बचके, ये है मुंबई मेरी जान!!!"

Sunday, 11 June 2017

वयस्कर व्यक्तींचे आपल्या जीवनातील स्थानआपण कितीही म्हातारे झालो तरी आपल्या मानसिक गरजा पूर्ण करण्याकरिता आपणांस आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्तींची नेहमी गरज भासते.

आपल्या घरात आपल्यापेक्षा कोणीतरी वयस्कर व्यक्ती असल्यास तिचा आपणांस नेहमीच आधार वाटत असतो. आपल्याला आलेल्या अडचणींवर आपणांस तिचा सल्ला मागता येतो. तिने आयुष्यभर खपून गाठी बांधलेल्या अनुभवाचा आपणांस उपयोग होतो. सणासुदीला तीच्याकडून रितिरिवाज जाणून घेऊन आपल्याला सण उत्साहात साजरे करता येतात. तिला आपले दुःख सांगून आपल्याला आपले मन मोकळे करता येते. तीच्याकडून आपल्या मनाचं सांत्वन करून घेता येते. इतर कशाविषयी असलेला राग तीच्याजवळ व्यक्त करून आपले भडकलेले डोके शांत करता येते. आपल्याला झालेला आनंद तीच्याबरोबर वाटून घेऊन तो द्विगुणित करता येतो. आपण कधी निराश झालेलो असताना तीच्याकडून चार मोलाच्या गोष्टी ऐकून आपल्या मनाला उभारी आणता येते. आपल्या मनाला वाटणारी भीती तिला सांगून तिच्याकडून त्यावरचा उपाय जाणता येतो.

पण असेही आहे की, प्रत्येकवेळी वयस्कर व्यक्ती आपणांस आधार देतीलच असे नाही. उलट वयस्कर व्यक्तींकडे बराच मोकळा वेळ असल्याने त्यांनी आपल्या प्रत्येक गोष्टींत नाक खुपसण्याचा जास्त संभव असतो. सतत किरकिर करणारे, आपल्या जुनाट विचारांना चिकटून बसणारे, सतत आपल्याकडे लक्ष द्यावे असे वाटणारे, बदलत्या जमान्याशी तडजोड करू न शकणारे अशा वयस्कर व्यक्तीही असू शकतात. परंतु प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात, हे काही आपण नाकारू शकत नाही. अशा थोड्याफार त्रासाकडे दुर्लक्ष करणेच अंती आपल्या दोघांच्याही हिताचे ठरते.

आपल्या घरात असलेल्या आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती कदाचित आपली शारीरिक, आर्थिक नाही, पण आपल्या मानसिक आधाराची गरज नक्कीच भागवू शकतात. मग भले ते आपले आईवडील असोत किंवा आपल्या कुटुंबातील इतर कोणीही वयस्कर व्यक्ती. आपल्या जीवनातील त्यांचे स्थान अढळ आहे.

Thursday, 1 June 2017

खिडकीतला पाऊस!          दोन दिवसांपूर्वीच मुंबईत हळूहळू पावसाला सुरुवात झालीय. घामाची चिकचिक आणि उन्हाने त्रस्त झालेल्यांचा, आता पावसाचे आगमन होणार याची नांदी मिळाल्याने जीव सुखावला आहे. पावसाच्या सरी पडलेल्या पाहून मला तर आनंदाने नाचावासे वाटू लागले, आणि मी फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली. "पाऊस आया!!!.....एssss पावसामें नाचोssss!!!!...... ढिंगचॅक्! ढिंगचॅक्!! ढिंगचॅक्!!!......." मोराला आपला पिसारा फुलवून पावसात नाचताना जेवढा आनंद होत असेल तेवढाच मलाही पहिल्या पावसात भिजताना आनंद होतो.

          पहिल्या पावसाची मजा घेऊन झाल्यानंतरसुद्धा मला कधी पावसाचा कंटाळा येत नाही. जून, जुलै महिन्यात दणक्यात कोसळणारा पाऊस घरातल्या खिडकीजवळ असणाऱ्या दिवाणवर बसून तासंतास बघत बसणे, हा तर माझा लहानपणीचा अत्यंत आवडता छंद होता.

          खिडकीतून दिसणाऱ्या पावसाचीसुद्धा वेगवेगळी रूपे मला पहायला मिळत. धडाड्धूम करून ढग एकमेकांवर आपटल्याच्या आवाज हृदयात धडकी भरवे. तर कधी काड्कन वीज चमके, तेव्हा सर्व परिसर विजेच्या प्रकाशात न्हाऊन जाई. आणि मग दणकून पावसाला सुरुवात होई. कधी फक्त हलकेच बारीक भुरभुरणारा, कधी सरळ उभा पडणाऱ्या पांढराशुभ्र जाडसर थेंबाचा, कधी आडवा तिडवा धो धो कोसळणारा, तर कधी सरकत पुढे पुढे जाणाऱ्या तिरक्या धारांचा पाऊस पडे.

          खिडकीच्या गजांवर लटकणाऱ्या पाण्याच्या टपोऱ्या थेंबाना मी सर्रकन बोट फिरवून टपाटप खाली पाडत असे. खिडकीसमोर एखादी तिरकी जाणारी वायर लटकलेली असे. त्यावरून हे पावसाचे थेंब एकमेकांशी स्पर्धा करीत धावत जात. खिडकीवरील गजांना माकडासारखे लटकून कोसळणारा पाऊस बघण्यातसुद्धा मला एक वेगळीच गंमत येई. त्याचवेळी पावसाने ओलसर झालेल्या गजांना तोंडात पकडताना थोडीशी गंजलेल्या लोखंडाची चव लागे. बाहेर कोसळणाऱ्या पावसाने खिडकीच्या काचा आतल्या बाजूने बाष्पामुळे धुरकट होत. त्याच्यावर बोटांनी रेघोट्या ओढायला फार मजा येई. नाहीतर त्या धुरकट काचांना बोटांनी एक गोल करून, त्याला डोळा लावून मी काचेबाहेरचे दृश्य बघत बसे. ओलसर काचेवर पलीकडच्या बाजूने हाताचा पंजा दाबून धरल्यावर अलीकडच्या बाजूने पंज्याचा दबलेला आकार विचित्र दिसे. पावसाची जोराची झड खिडकीच्या आत आल्यावर उडणारे थंडगार तुषार मी दोन्ही हात पसरून चेहऱ्यावर घेई. उडणारे तुषार कधी कधी दिवाणवरची गादीसुद्धा भिजवत. पावसात भिजलेले कावळे आणि चिमण्या आपले ओले पंख फडफडवत खिडकीवर येऊन चिडीचूप बसत.

          खिडकीतून डावीकडे दिसणाऱ्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यापासून स्वतःला वाचवायला उडालेली लोकांची तारांबळ दिसे. फटाफट लोकांच्या छत्र्या उघडल्या जात. काही रंगीत, काही काळ्या कुळकुळीत तर काही काडी मोडक्या छत्र्या दिसत. पावसात रेनकोट आणि टोप्या घातलेली आणि आतमध्ये पाठीवर दप्तर घेऊन तुरुतुरु चालणारी शाळेची लहान मुलं दिसत. रस्त्यावरच्या कार आणि बसेसचे वायपर डावीकडे आणि उजवीकडे नाचू लागत. कधी कधी वाहनं पावसात अंदाज न आल्याने एकमेकांना धडकत. मग पावसात भिजत वाहनमालकांची आपापसात वादावादी चाले. कधी कधी पहिल्या पावसात पहाटेच्या अंधारात सायकलीवरचे दूधवाले घसरून पडत. अशावेळी डांबरी रस्त्यावर त्यांच्या किटलीतून सांडलेले दुध पावसाच्या पाण्यात मिसळताना दिसे. आणि काळा डांबरी रस्ता पांढरा फटक पडे. जोरात पाऊस पडत असताना फुटपाथच्या कडेकडेने वाहणारा पाण्याचा जाड ओघळही दिसे, ज्यात लहान मुले 'छपाक छै!' खेळताना दिसत.

          खिडकीच्या उजवीकडच्या कोपऱ्यातून एक मस्तं हिरवंगार गवत असलेली बाग दिसायची. जोरदार झालेल्या पावसाने बागेत सगळा निसरडा चिखल झालेला असे. खास त्या चिखलात आवडीने फुटबॉल खेळणारी मुले दिसत. आणि वरून जरका पाऊस कोसळत असेल, तर पावसात फुटबॉल खेळताना त्यांच्या उत्साहाला पारावार रहात नसे. अशा वेळी प्रतिस्पर्ध्याला मुद्दाम पाय आडवे घालून चिखलात पाडले जाई. बागेतून शॉर्टकट् मारणारे कित्येक मोठे बाप्ये त्या निसरड्या चिखलावरून घसरून चारीमुंड्या चित होत. बागेतल्या एका कोपऱ्यात असलेल्या घसरगुंडीवर काही मुले घसरगुंडीवरून खाली वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर घसरत घसरत खाली येत. शेजारी असणाऱ्या झोक्यांवर काही मुलांची भर पावसात उंच झोका घेण्याची शर्यत लागे. तर एकीकडे पावसात आबादुबी खेळणारी मुले कोणा एका मुलालाच चेंडूचे जोरदार फटके देत खिदळत असत. पाऊस थांबे आणि लख्ख उजेड पडे तेव्हा कधीकधी आकाशात इंद्रधनुष्याचे मनमोहक दर्शनसुद्धा होई.

          बालपणी मी त्या खिडकीतून अनुभवलेल्या पावसाच्या वेगवेगळ्या रूपाच्या आणि प्रसंगाच्या दर्शनानेच माझे पावसाशी असलेले नाते घट्ट झाले आहे. या लेखाच्या निमित्ताने मी माझ्या बालपणी पाहिलेला 'खिडकीतला पाऊस' आज मला पुन्हा मनोमन अनुभवता आला.

Sunday, 28 May 2017

साधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा!!!          पावसाच्या वर्षावात न्हायला सर्वांनाच आवडतं. पण मी तुम्हाला आता एक असा खरा घडलेला प्रसंग सांगणार आहे, ज्यात अशा एका गोष्टीच्या वर्षावात काही जणांना न्हायचा योग आला होता, ज्याची कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकणार नाही.

          त्याचे असे झाले, की मी एकदा लोकलट्रेनने सकाळी साधारण सात साडेसात वाजता गर्दीच्या उलट दिशेने प्रवास करीत होतो. अशावेळी गाडीत अगदी तुरळक माणसे असतात. त्यातले बरेचसे रात्रपाळी करून, डुलक्या काढत घरी जाणारे असतात. आणि जे जागे असतात तेही पेंगूळलेल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर बघत शांत बसलेले असतात. गाडी सुसाट पळत असते. नुकताच सूर्योदय होत आलेला असतो. मस्त गार वारा अंगाला झोंबत असतो.

          तर अश्या या रम्य वातावरणात मी गाडीच्या डब्यात तिसऱ्या सीटवर कडेला बसलो होतो. मध्ये, माझ्या बाजूला छान कडक इस्त्री केलेला सफारी घातलेला एक तरुण, आणि त्याच्या बाजूला सुंदर शालू नेसलेली एक तरुणी खिडकीत बसलेली होती. त्यांच्या एकंदर अभिर्भावावरून त्यांचं नुकतंच लग्न झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. ते जोडपं एवढं सजून धजून कदाचित कोण्या नातेवाईकाकडे किंवा देवदर्शनाला चाललेले वाटत होते.

          आणि आमच्या समोरच्याच सीटवर खिडकीच्या कोपऱ्यात एक साधू एकटाच बसलेला होता. काय त्याचे राजबिंडे रूप वर्णावे!! अगदी गोरागोमटा, चांगली सहा फूट उंची, घारे डोळे, डोक्याचे टक्कल केलेले, छोटुशी शेंडी, तुळतुळीत दाढी, बारीक काड्यांचा चष्मा, नाकाच्या मध्यापासून थेट कपाळाच्या सुरवातीपर्यंत चंदनाचा जाडसर गंध ओढलेला, अंगात भडक भगवा सदरा, गळ्यात प्रिंटेड उपरणे आणि कंबरेला धोतर गुंडाळलेले होते. तो लोकलट्रेनमध्ये अगदी नवखा वाटत होता. सारखा बावरून खिडकीबाहेर भिरभिरत्या नजरेने पहात होता. कुठे उतरायचं होतं कोण जाणे त्याला? मी आणि माझे सहप्रवासी अधूनमधून हळूच त्याला चोरट्या नजरेने दबकून पहात होते.

          स्टेशनांमागून स्टेशनस् जात होती. माझ्या बाजूच्या जोडप्याचं आपसात लाडेलाडे बोलणं चालू होतं. माझ्या डोळ्यांवरसुद्धा पेंग यायला लागली होती. गाडी हळूहळू मुलुंड स्टेशनवर येऊन गचका देऊन थांबली. आणि अचानक ते घडलं.....

          त्या साधूने गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. आणि आपल्या समोरील जोडप्यातील तरुणाला विचारलं. "Mulund?" तरुणाने होकारार्थी मान डोलावली. त्याबरोबर तो साधू एकदम बावचळला. गाडी आता सुरू होणार होती. त्याला मुलुंड स्टेशनवरच उतरायचे होते. तो ताडकन् उभा राहिला. काहीतरी आठवल्याबरोबर पुन्हा सीटवर बसला. आणि आपल्या सीटखाली ओणवा झाला. दुधवाल्यांकडे असते तशी, पण साधारण पाच सहा लिटरची, प्योर चकचकीत स्टीलची, धरायला गोल कडी असलेली किटली त्याने सीटखाली ठेवलेली होती. त्याने उतरायच्या घाईत किटलीच्या कडीला धरले आणि किटली पट्कन जोरात बाहेर ओढली.

          आणि हाय रामा!!! जे कधी आयुष्यात पाहिले नव्हते असं आक्रीत घडलं. त्याने किटलीच्या कडीला धरून ओढल्याबरोबर, किटलीच्या झाकणाचे उंच टोक सीटच्या कडेला अडकून फट्कन झाकण उडाले आणि किटलीला जोराचा झटका बसल्याने किटली तिरकी ओढली जाऊन आत असलेला जवळ जवळ निम्मा द्रवपदार्थ समोर बसलेल्या कडक सफारी घातलेल्या आणि सुंदर शालू नेसलेल्या, तरुण आणि तरुणीच्या अंगावर उपडा झाला. कोणता होता तो द्रवपदार्थ सांगू!!!?

          त्या तरुण आणि तरुणीच्या अंगावर उपडा झालेला द्रवपदार्थ होता....आंब्याचा गारेगार रस....'आमरस'....!!!!! होय! तो घट्ट आमरसच होता. ज्यात तो तरुण आणि तरुणी नखशिखांत माखून निघाले होते. त्याचा सफारी आणि तिचा शालू आमरसात पार चिंब भिजले होते. डब्यात सर्वत्र आंब्यांचा सुगंध पसरला. अचानक झालेल्या ह्या 'आमरसाच्या अमृतधारे'च्या वर्षावाने दोघेही अवाक् झाले. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेना. किटली आपटल्याच्या आवाजाने आणि आंब्यांच्या सुवासाने डब्यातल्या सहप्रवाशांचीही डोळ्यावरची झोप उडाली. सर्व एकमेकांकडे काय झाले म्हणून बघू लागले. उपासतापास करणारा एखादा साधू एवढा पाच सहा लिटर आमरस घेऊन प्रवास करत असेल ह्यावर कोणाचाही विश्वास बसेना. कुठे नेत असेल तो एवढा आमरस? कोणाकरिता नेत असेल? एवढया आमरसाचं तो काय करणार असेल? सर्वांनाच प्रश्न  पडला होता. घडलेला प्रसंग पाहून काहींच्या चेहऱ्यावर हसू फुटायचेच तेवढे बाकी राहिले होते.

          झालेल्या गोंधळाचा त्या साधूने फायदा घेतला. त्याला समजायला वेळ नाही लागला, की आपण 'सॉरी' बोलायला थांबलो तर आपणच अडचणीत येऊ. त्याने पडलेली अर्धी रिकामी किटली उचलली. त्याला झाकण लावले. आणि तो उतरण्याकरिता दरवाज्याकडे पळाला. तोपर्यंत गाडीने हळूहळू धावायला सुरवात केली होती. पण त्या साधूने चालू गाडीतून रिकाम्या किटलीसकट स्टेशनवर झट्कन उडी मारली.

          आता आम्हां सर्वांचे लक्ष त्या तरुण आणि तरुणीकडे लागले, जे आपल्याकडील रुमालाने आपल्या अंगावरचा आमरस स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होते. पण पाण्याशिवाय तो स्वच्छ होणे कठीण होते. त्यामुळे पुढील ठाणे स्टेशन आल्याबरोबर दोघांनी गाडीतून उतरून घेतले. आणि इथे गाडीच्या डब्यात आम्ही सर्व एकमेकांना एकच प्रश्न विचारत होतोे. "वो साधू इतना आमरस लेके कहाँ जा रहा था?" नंतर कितीतरी वेळ डब्यात हास्याचा धबधबा कोसळत होता.

          अशातऱ्हेने आम्हाला 'आमरसाच्या अमृतधारां'चा वर्षाव अनुभवायला मिळाला. इतक्या वर्षांनंतर अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या चेहऱ्यावर हसू उमटते.


Saturday, 20 May 2017

माझ्या आठवणीतील रीमा लागू.रीमा लागू यांच्याविषयी माझ्या मनातून कधीच न पुसली जाणारी एक आठवण आहे, जी मी आपणां सर्वांबरोबर शेयर करू इच्छितो. १९८५-८६ साली मी मुंबईत डिग्री कॉलेजमध्ये शिकत होतो. माझे साहित्यिक वाचन भरपूर होतं. सिनेमे, नाटकंही तेवढीच पहायचो. नाटक सादर करताना प्रेक्षकांशी समोरासमोर होणाऱ्या सुसंवादाच्या आकर्षणापायी तेव्हा मला नाटकात काम करण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. मी कॉलेजमध्ये सादर होणाऱ्या नाटकात भाग घेई. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या श्री.कृ.रा.सावंत यांचा 'नाट्य प्रशिक्षण कोर्स'ही मी यशस्वीरित्या पूर्ण केला होता. नाट्याभिनय क्षेत्रात शिरण्याचा माझा मानस असल्याने मी लोकांच्या ओळखी काढत होतो. तेव्हा माझी अशा एका व्यक्तींची ओळख झाली ज्यांची व्यावसायिक नाट्यक्षेत्रात असणाऱ्या निर्मात्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्या व्यक्तींच्या ओळखीने मी एका हॉलमध्ये चालणाऱ्या व्यावसायिक नाटकांच्या तालमी पहायला रोज हजर रहात असे.

असेच एके दिवशी माझी नाटकाची आवड पाहून तालमीत असणाऱ्या एका बॅकस्टेज आर्टीस्टने शिवाजी मंदिर येथे 'सविता दामोदर परांजपे' या नाटकाचा प्रयोग बॅकस्टेजने पहाण्याची मला संधी दिली. नाट्यगृहात मी उशिरा गेलो तेव्हा प्रयोग अर्धा होत आला होता. स्टेजच्या बाजूच्या अंधाऱ्या विंगेमध्ये 'प्रकाश योजना' करणारी व्यक्ती आपल्या साहित्यानीशी हजर असते. त्याच्याबाजूला उभ्याने मी प्रयोग पहात होतो. विंगेमध्ये सर्वत्र अंधार होता. स्टेजवर रीमा लागू आणि राजन ताम्हाणे यांचा प्रवेश चालू होता. संवादांची आतिषबाजी होत होती.

आणि अचानक तो क्षण आला. रीमा लागू यांचा प्रवेश संपला. त्यांनी स्टेजवरून एक्झिट घेतली आणि विंगेमध्ये अंधारात मी उभा होतो तेथून अवघ्या सातआठ फुट पलीकडे त्या सरसर येऊन उभ्या राहिल्या.

बापरे!! काय रोमांचक क्षण होता तो!! गूढ नाटक असल्याने स्टेजवर रंगीबेरंगी प्रकाशात चाललेला राजन ताम्हाणे यांचा गूढ अभिनय आणि संवाद. नाट्यगृह तुडुंब भरलेले असूनही भांबावून चिडीचूप बसलेला एकूणएक प्रेक्षक. बाजूला विंगेच्या आतमध्ये अंधारात उभा असलेला प्रकाशयोजनाकार आणि त्याच्या बाजूला हबकून उभा असलेला मी. आणि माझ्यापासून अवघ्या सात आठ फुटांवर माझ्याकडे रोखून पहाणाऱ्या, पांढऱ्या शुभ्र साडी परिधान केलेल्या रीमा लागू......

तेव्हा त्या ऐन तिशीत असाव्यात. किती करारी आणि लोभसवाणं व्यक्तिमत्त्व दिसत होतं त्यांचं. मला माझ्या काळजाची धडधड जोरात ऐकू येऊ लागली होती.

रीमा लागू यांचा लगेच पुन्हा स्टेजवर प्रवेश होता. फक्त एका मिनिटाकरिता त्या विंगेमध्ये माझ्यासमोर काही न बोलता स्तब्ध उभ्या होत्या आणि मग पुन्हा स्टेजवर गेल्या.

झालेल्या प्रसंगाचे माझ्या मनावर एवढे दडपण आले की मी गुपचूप मागच्यामागे बॅकस्टेजच्या बाहेर पडून नाट्यगृहाच्या बाहेर आलो.

एवढ्या वर्षांनंतरही विंगेच्या अंधारात एका मिनिटाकरिता पाहिलेली रीमा लागू यांची छवी माझ्या डोळ्यांपुढे अजूनही तशीच्या तशी दिसते आहे.

मी रीमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Friday, 19 May 2017

बर्गर आणि वडापाव.ती : "का रे बोलावलंस मला या बागेत? असं काय महत्वाचं सांगायचं आहे म्हणालास? फोनवर बोलता आलं नसतं का आपल्याला? संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी बॉस काही मला सोडायला तयार होत नव्हता. एक अर्जंट लेटर टाईप करूनच जा म्हणत होता. शेवटी आले मी त्याला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं सांगून. त्यालाही माहीत आहे ना, आईच्या कॅन्सरचं! जा म्हणाला."

तो : "अगं हो! हो! जरा दम खाशील की नाही? बस की जरा या बेंचवर. बघ समोरच्या झोपाळ्यावर कशी लहान बाळं खेळताहेत. आणि ते बघ ती मुलगी फुलपाखराच्या मागे पळतेय. अरे! अरे! बघ कशी धपकन् पडली ना ती!!"

ती : "अरेरे! लक्ष कुठे असतं कोण जाणे त्यांच्या आयांचं? हो सरक त्या बाजूला. हुश्श! दमले रे बाबा! बसच्या गर्दीतला प्रवास अगदी नकोसा होतो. तुम्हां आयटीवाल्यांचं बरंय रे! ऑफिसला आणायला, सोडायला तुम्हा लोकांना कॅब असते. आणि कॅब आली नाही तर तुला ऑफिसला पोहोचवायला तुझ्या घरची गाडी आहेच की. मला माझ्या वडिलांचे आश्चर्य वाटतं, मिलमधून रिटायर होईपर्यंत ते सायकलवरूनच जात येत होते. घे! ह्या पुडीतला एक वडापाव खा. येताना त्या नेहमीच्या गाडीवाल्याकडून घेतलाय."

तो : "नको मला. कितीवेळा सांगितलंय रस्त्यावरचं मी काही खात नाही."

ती : "नको तर नको. माहितेय मला. डॉक्टर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ना तू! तुला रस्त्यावरचा वडापाव कसा चालणार. आपलं लग्न झाल्यावरसुद्धा मी गाडीवरचा वडापाव खायचं सोडणार नाही हं! आधीच सांगून ठेवते. मला नाही आवडत बाई तो बर्गर बिर्गर. अरे हो! तू तुझ्या मम्मीपप्पांना आपल्या लग्नाचं विचारणार होतास ना, काय झालं त्याचं?"

तो : "हो, तेच सांगायला मी तुला इथे बोलावलं होतं. तर तुझं आपलं कधीचं वडापावपुराणच चाललंय."

ती : "बरं बाबा! सांग. अरे, परवा मला आपल्या मम्मीपप्पांना भेटवायला घेऊन गेला होता तेव्हा काय भांबावला होतास रे तू. आणि माझा ड्रेस तुझ्या मम्मीला आवडला नाही वाटतं? किती वेळ निरखून बघत होत्या त्या माझ्या ड्रेसकडे. तेव्हढाच तर एक भारीवाला ड्रेस आहे माझ्याकडे."

तो : "अगं पण इस्त्री तरी करून घालायचा होता."

ती : "इस्त्री बिघडलीय. ह्या पगाराला नवीन घेणारच होते. आणि हो! तुझ्या आईच्या हातचे पराठे आवडले हं मला. मस्तं झाले होते."

तो : "हो! पराठ्याबरोबरचं लोणचं तू जसं चटकमटक करून खात होतीस, त्यावरून समजत होतंच की."

ती : "अपना तो बाबा वोह स्टाईलीच है. अरे! चहापण बशीत घेऊन फुरक्या मारून प्यायल्याशिवाय मला गोड लागतच नाही. आणि हो! माझ्या आईचा इलाज तुमच्या ओळखीने स्वस्तात कुठे होतो का बघा, असे मी विचारल्याबरोबर तुझ्या मम्मीपप्पांचा चेहरा किती गोरामोरा झाला होता!"

तो : "अगं पहिल्याच भेटीत असं विचारायचं असतं का कधी?"

ती : "अस्सं होय! मग कधी विचारायचं असतं? आपलं लग्न झाल्यावर का? अरे हो!! ते राहिलंच की? तू सांगणार होतास ना! काय म्हणाले मम्मीपप्पा आपल्या लग्न करण्याविषयी? पण थांब! नको सांगू. मलाच तुला काहीतरी सांगायचंय."

तो : "मला सांगायचंय? काय!!!?"

ती : "मला आठवतंय तो दिवस जेव्हा आपली पहिली भेट झाली होती. एका संध्याकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे सर्व बसेस बंद पडल्या होत्या."

तो : "आणि मी माझ्या कारमध्ये चार जणांना लिफ्ट दिली होती. त्या चौघांमध्ये तूसुद्धा होतीस."

ती : "हो! शेवटचं मला घराजवळ सोडताना मी तुला चहा पिण्याकरीता घरी चलण्याचा आग्रह केला होता."

तो : "आणि मग मी फक्त तुला भेटण्याकरिता काहीना काही निमित्त काढून वरचेवर तुझ्या घरी येत रहायलो."

ती : "हळूहळू आपण एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे समजलंच नाही. आणि एक दिवस तू मला लग्नाची मागणी घातली. आणि मीसुद्धा भावनेच्या भरात तुला हो म्हटलं."

तो : "भावनेच्या भरात!!? म्हणजे म्हणायचं काय आहे तुला?"

ती : "परवा आपल्या मम्मीपप्पांना भेटवायला तू मला घेऊन गेलास. तुझं ते मोठं घर पाहून तर मी प्रथम हबकूनच गेले. तुझ्या घरातल्या महागातल्या वस्तू, तुमचं श्रीमंती राहणीमान, तुमच्या चालीरीती हे सर्व माझ्या कल्पने पलीकडले होते. त्यात तुझ्या मम्मीपप्पांचं माझ्या बरोबरीचं कोरडं वागणं, माझ्या मनाला कुठेतरी टोचलं रे!! नाहिरे!! मी तुमच्या बरोबरीची नाहीए!! आपल्या लग्नानंतर मी तुमच्या घरात सामावू शकणार नाही. आणि म्हणूनच खूप विचार करून मी एक निर्णय घेतलाय."

तो : "कोणता?"

ती : "तुझ्याशी लग्न न करण्याचा!!!"

तो : "काय म्हणतेस!!!!?"

ती : "हो! तुझ्या मम्मीपप्पांनी आपल्या लग्नाला दिलेला नकार मला ऐकवणार नाही. म्हणून मी तुला त्याआधीच सांगतेय. मला विसरून जा. आणि जमलं तर मला माफ कर. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही."

तो : "होय! तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. परवा तू घरी येऊन गेल्यावर मम्मीपप्पांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली. आणि आपले लग्न होणे कदापि शक्य नाही असं मला ठाम शब्दात सांगितलं. आता मम्मीपप्पांचे मन मोडणे मला तर शक्य नाही. म्हणून लग्नाचा नकार तुला कसा कळवायचा याचीच मला चिंता पडली होती. बरं झालं तूच आपल्या लग्नाला नकार दिलास. माझ्या मनावरचं किती मोठं ओझं उतरवलंस तू."

ती : "काय!!!!? खरं म्हणतोयस का तू हे?"

तो : "अगदी खरं!"

ती : "मग मी जाऊ म्हणतोस आता?"

तो : "जातेस तर जा!"

ती : "आपल्यातले संबंध संपले असं समजू का मी?"

तो : "असंच समज. पण ते तुझं रडू थांबव पाहू आता. हा घे रुमाल. डोळे पूस. नाहीतर आपल्याला बघणाऱ्या लोकांना काही तरी भलताच संशय यायचा."

ती : "बरं मी जाते."

तो : "ठीक आहे. पण मम्मीपप्पांनी आपल्या लग्नाला नकार दिल्यानंतर काय घडले ते तर ऐकून जा."

ती : "काय घडले?"

तो : "मी मम्मीपप्पांची फार विनवणी केली. मी त्यांना सांगितलं, की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी लग्न करेन तर तुझ्याशीच. नाहीतर आजन्म अविवाहित राहीन. तरी ते ऐकेना. मग मी त्यांच्याशी अबोला धरला. अन्नपाणी सोडले. आणि मग काय झाले सांगू?"

ती : "काय?"

तो : "आज सकाळी त्यांनी मला बोलाविले. मला म्हणाले, तू आमचा एकुलता एक मुलगा आहे. तुला दुःखी झालेले पाहून आम्हाला राहवत नाहीए. आणि म्हणून आम्ही तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहोत."

ती : "काय!!!?"

तो : "हो! पण एका अटीवर. तुझ्या होणाऱ्या बायकोने आपल्या राहणीमानाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आणि आम्हीसुद्धा तिच्या राहणीमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. तिने एक पायरी वर चढावी, आम्हीसुद्धा एक पायरी खाली उतरू. मग! तू माझ्याकरीता एवढं तर करशील ना?"

ती : "हो! करेन ना मी. तुझे मम्मीपप्पा माझ्याकरीता एवढी तडजोड करत आहेत, तर मी का नाही करणार? पण आपल्या लग्नाला मम्मीपप्पा तयार झालेत, हे तू मला अगोदरच का नाही सांगितलंस? जातेस तर जा म्हणून उगाच रडवलंस ना मला?"

तो : "मग तुसुद्धा मला सोडून जायचं म्हणत होतीस ते!! मनात म्हटलं जरा तुझीपण गंमत करावी. मला माफ कर. मग सांग ना! करशील ना माझ्याशी लग्न?"

ती : "हो रे राजा! मी तुझ्याकरिता काहीही करायला तयार आहे?"

तो : "आणि मीसुद्धा तुझ्याकरिता काहीही करायला तयार आहे? अगदी रस्त्यावरच्या गाडीचा वडापावही खाऊन दाखवेन. हा! हा! हा!"

ती : " आणि मीसुद्धा बर्गर खात जाईन. हा! हा! हा!"